सप्तपदी भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ सप्टेंबर २०१६

सप्तपदी भाग २ - मराठी कथा | Saptapadi Part 2 - Marathi Katha - Page 14

आकाशाची आई त्यांच्या समोर आली आणि हात जोडुन म्हणाली, "वामनराव आम्हाला माफ करा. आई म्हणून कर्तव्यात मी चुकले आणि शिक्षा मात्र तुम्हाला भोगावी लागली. कसाही असला तरी आनंद माझा मुलगा होता, माझ्या काळजाचा तुकडा होता. पैशाच्या लोभाने त्याच्या सोबत मीच काय सगळे कुटुंब आंधळे झाले होते. त्या हव्यासापायी मी माझा मुलगा गमावला. आणि तुम्ही तुमची मुलगी गमावण्याच्या आत मला माझी चुक सुधारायची आहे कारण आता जो परत आलाय तो माझा मुलगा नक्कीच नाही." "आई तु शुद्धीवर आहेस का? काय बोलतेस ते तुझे तुला तरी कळते का?" आकाश गुरगुरला. तेव्हा आकाशाची आई त्याच्याकडे पाहात म्हणाली, "शुद्धीत तर मी आता आले आहे. सोन्यासारखी मुलगी घरात सुन बनुन आली आणि मी तिला आपल्या मुलीप्रमाणे वागवायचे सोडुन तिचा सासुरवास केला, तिला उपाशी ठेवले. कामे करून घेतली. नाही नाही ते बोलले. माझी चुक झाली, पण आता मला ती सुधारायची आहे. आकाश, आपल्याला आनंदला मुक्त केले पाहिजे बाळा! नाहीतर तो होत्याचे नव्हते करून टाकेल. रागाच्या भरात तो आपल्या कुटुंबालाही देशोधडीला लावेल. महादेव आम्हाला भेटायला आला होता, त्याने आमचे डोळे उघडले. आपण आनंदला तर गमावले पण आता वामनरावांनी तरी त्यांची मुलगी गमावता काम नये. माझे ऐक आकाश, आनंदला मुक्त कर. त्यातच सगळ्यांचे भले आहे. कष्टाची भाकरीच चांगली. हरामाच्या पैशानी मिळालेले अन्न विषासारखेच असते? अस्मिताला काही झाले तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. जा. तिला वाचवायला वामनरावांना मदत कर." सुमननेही आपल्या सासुची बाजु घेतली आणि अस्मिताला वाचवण्यासाठी आकाशला गळ घालु लागली. क्षणभर विचार केल्यावर आकाशलाही ते पटले. परिस्थिती आपल्या बाजुने वळतेय हे लक्षात येताच वामनरावांनी आपल्याला आता घाई केली पाहिजे असे आकाशला सुचवले. त्यावर आकाश त्यांना म्हणाला, "वामनराव माझ्या आईने माझे डोळे उघडले, आम्हाला सगळ्यांनाच माफ करा." अस्मिताच्या काळजीने चिंताक्रांत झालेले वामनराव काकुळतीला येत म्हणाले, "ते सगळे ठीक आहे पण आनंदने महादेवला गाठायचा आत तो कलश त्याब्यात घेऊन अस्थी विसर्जित करणे अत्यावश्यक आहे. लवकर चल."

यावर आकाशची आई म्हणाली, "कुठेही जायची गरज नाही. महादेव जो कलश घेऊन गेला आहे तो रिकामा होता, अस्थी असलेला कलश कपाटात मागे ठेवला आहे." ते ऐकुन वामनरावांचा जीव भांड्यात पडला. "काळोख बराच झालाय पण मला एक शॉर्टकट माहित आहे, त्याने आपण नदीवर लवकर पोहोचु आणि आनंदच्या अस्थींचे विसर्जन करू." असे म्हणत आकाशने आनंदच्या अस्थी असलेला कलश बाहेर काढला आणि सर्वजण नदीच्या दिशेने निघाले. इकडे महादेव नदीकाठी पोहोचणार इतक्यात वळणावर समोर आलेल्या ट्रकपासुन वाचण्याच्या प्रयत्नात महादेवची कार रस्ता सोडुन खाली उतरली. खड्ड्यात चाक गेल्यामुळे एका बाजुला कलंडली आणि उलटी झाली. सिटबेल्ट लावलेला असल्यामुळे आनंदला खुप मोठी दुखापत झाली नसली तरी जोराच्या झटक्याने त्याची मान मात्र चांगलीच दुखावली. काळोख झाल्यामुळे घाटावर चिटपाखरूही नव्हते त्यामुळे ऍक्सिडंट झालेला कोणाच्या लक्षातही आले नाही. कोणी मदतीला येण्याची वाट न पाहता महादेव गाडीतुन कसाबसा बाहेर आला आणि सोबत कलश घेऊन घाटाच्या दिशेने जाऊ लागला. आनंदचा आत्मा त्याच्या पाठोपाठ होताच. कारमधुन बाहेर पडण्याच्या कसरतीत महादेवच्या कपाळावरील स्वामी समर्थांचा अंगारा पुसून गेला होता आणि त्याचा फायदा उचलत आनंदने महादेवाला अलगद उचलले आणि लांब फेकून दिले. महादेव वेडावाकडा जमीनीवर आदळला. त्याला चांगलाच मार लागला. त्याच्या हातातील कलशही बाजुला पडला, तो घेण्यासाठी महादेव खुरडत खुरडत पुढे सरकत होता. तो कलशापर्यंत जाऊन पोहोचतो तोच त्याला आपल्यामागे कोणीतरी उभे असल्याची जाणीव झाली. त्याने कष्टाने मागे वळुन पाहिले. आनंद आपल्या हातात भलामोठा दगड उचलुन त्याच्या डोक्यात घालण्याच्या तयारीत त्याला दिसला. हातातील कलाशावरील कापड महादेवने दूर केले आणि कलश आनंदसमोर उलटा केला. त्यातुन अस्थी बाहेर न पडल्यामुळे आनंदचा आत्मा संभ्रमात पडला. ते पाहुन महादेव कुत्सितपणे हसु लागला त्यामुळे आनंदचा आत्मा आणखीनच गोंधळला.

"आत्तापर्यंत असे वाटत होते की महादेव अस्थी विसर्जित करेल आणि आनंदला मुक्ती मिळेल पण अस्थींचा कलश तर शिवलकर कुटुंबीयांकडे आहे. दुर्दैवाने महादेवचा ऍक्सिडंट झाला, त्यात अस्थी कलशात नाहीत हे पाहुन खवळलेला आनंदचा आत्मा पुढे काय करेल? आता महादेवला आनंदच्या आत्म्यापासुन एखादा चमत्कारच वाचवु शकेल. महादेव या संकटाचा बळी ठरेल की तोच आनंद सारख्या चोरावर मोर होईल? जाणुन घेण्यासाठी पुढे वाचा!