सप्तपदी भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ सप्टेंबर २०१६

सप्तपदी भाग २ - मराठी कथा | Saptapadi Part 2 - Marathi Katha - Page 13

आपण काय विचार करत होतो आणि काय होऊन बसले. वामनरावांच्या पायातील त्राणच निघुन गेले आणि ते मटकन खालीच बसले. त्यावेळी महादेवने त्यांना सावरले. तो म्हणाला, "काका, हीच तर खरी परीक्षेची वेळ आहे, आत्ता हात पाय गाळुन कसे चालेल? आपल्याला उपाय तर समजला आहे, आत्ता फक्त गरज आहे ती तो अमलात आणण्याची. आपण नक्की यशस्वी होऊ. पण तांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे वेळ थोडा राहिला आहे, घाई केली पाहिजे. चला उठा." असे म्हणत महादेव वामनरावांना धीर देत उठवु लागला. वामनराव भानावर आले. काही झाले तरी अस्मिताला आनंदपासून कायमची मुक्ती मिळवुन द्यायचीच, त्यासाठी आपला जीव गेला तरी बेहत्तर असा पक्का इरादा त्यांनी केला. तिथेच एक चिता रचुन त्या दोघांनी तांत्रिकाच्या मृतदेहाला भडाग्नी दिला. तांत्रिकांचे मन:पूर्वक आभार मानुन आणि त्याच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी प्रार्थना करून महादेवने आपली कार आनंदच्या घराच्या दिशेने भरधाव सोडली. तासाभरातच ते आनंदच्या घराजवळ पोहोचले पण महादेवने आपली कार आनंदच्या घरापासुन थोडी दूरच उभी केली. वामनरावांना तिथेच थांबण्यास सांगुन महादेव एकटाच आनंदच्या घराकडे गेला. साधारण अर्ध्या तासाने तो परत आला. वामनराव चिंतातुर झाले होते. "कुठं गेला होतास? आपल्याला अस्थी कलश ताब्यात घ्यायचा आहे ना?" असे त्यांनी विचारताच "थोडा धीर धरा. योग्य वेळ आली की आपण आत जाणारच आहोत." दोघेही कार मध्ये बसुन आनंदच्या घराकडे लक्ष ठेऊन होते. पुढच्याच क्षणाला आनंदची आई आणि वाहिनी घरातुन बाहेर पडले. त्या दोघी दूर जाताच महादेवने आपली कार आनंदच्या घराच्या समोर उभी केली. निर्णायक वेळ जवळ आली होती. आनंदच्या आत्म्याकडुन विरोध होणार हे तर स्पष्टच होते, पण त्यांनी हिम्मत गोळा केली आणि दरवाजा ठोठवला. पण आतुन काहीच प्रतिसाद मिळाला नाही. वामनरावांनी पुन्हा दरवाजा ठोठवण्यासाठी हात उचलला पण दरवाजा उघडच होता त्यामुळे तो आत ढकलला गेला. वामनराव आणि महादेव दोघांनी एकमेकांकडे पहिले. महादेवने खुणेनेच वामनरावांना आश्वस्त केले आणि आत चालण्यास सांगितले. दोघेही उघड्या दरवाज्यातून आत शिरले. घरात अर्धांगवात झालेले आनंदचे वडील कोपऱ्यात एका कॉटवर पडून होते. बाकी सर्वजण आपापल्या कामावर गेले होते. वामनराव हॉलमध्ये, आणि महादेव किचनमध्ये आनंदच्या अस्थी शोधु लागले. अचानक दरवाजा धाडकन बंद झाला. त्या आवाजाने दोघेही दचकले पण एकमेकाला धीर देत त्यांनी शोध सुरुच ठेवला. शोधता शोधता ते दोघे आनंदच्या वडिलांच्या कॉट समोरील भिंतीवर असलेल्या फडताळामध्ये अस्थी शोधु लागले आणि अचानक त्यांच्या खांद्यावर दोन हात पडले. काही कळायच्या आत वामनराव आणि महादेव मागच्या मागे फेकले गेले. दोघेही चांगलेच आपटले. महादेव तरुण असल्यामुळे त्याने तो दणका झेपवला पण वामनरावांसाठी मात्र तो दणका जबरदस्त ठरला. त्यांची कंबर, कोपरं आणि डोके सणकुन आपटले. पडल्या पडल्या दोघांनी समोर पहिले तर तिथे आनंदचे वडिल पाठमोरे उभे होते.

स्वामी समर्थांचा अंगारा लावला असल्यामुळे आनंद त्या दोघांना स्पर्श करू शकत नव्हता त्यासाठी त्याला मानवी शरीराचे माध्यम हवे होते आणि तिथे एकमेव माध्यम होते ते म्हणजे त्याचे वडिल. अर्धांगवाताने अंथरुणाला खिळलेला माणुस उभा कसा राहील? आणि एकावेळी दोन पुरुषांना उचलुन कसा काय फेकु शकेल? हा विचार मनात येतो न येतो तोच आनंदचे वडिल त्यांच्या समोर उभे ठाकले. त्यांनी महादेवाला उचलुन आपल्या कॉटवर फेकले. महादेव कॉटवर आदळताच कॉटला लागुन असलेल्या भिंतीतील कपाटावर त्याची लाथ बसली आणि जर्जर झालेले खिडकीचे तावदान खाडकन तुटले. आत ठेवलेला अस्थी कलश महादेवला दिसला. त्याने खुणेनेच वामनरावांचे लक्ष तिकडे वेधले. आणि त्यांना नजरेने खुणावले की मी अस्थी विसर्जनाचे बघतो तुम्ही आनंदला रोखा. त्याचा इशारा लक्षात येताच वामनरावांनी आनंदच्या वडिलांच्या अंगावर झेप घेतली आणि त्यांना खाली पाडले. त्याचवेळी महादेवने चपळाईने कलश हस्तगत केला आणि दरवाज्याकडे धावला. आनंदच्या हे लक्षात येताच त्याने आपल्या वडिलांचे शरीर सोडले आणि महादेवच्या पाठीमागे गेला. महादेवने कलश गाडीत टाकला आणि गाडी सरळ नदीच्या दिशेने सुसाट सोडली. आनंदचा आत्मा पाठोपाठ होताच. वामनराव सावरून दरवाज्यातुन बाहेर पडणार इतक्यात आकाश घरात शिरला. त्याच्या घरातुन बाहेर पडलेल्या महादेवला कार वेगाने घेऊन जाताना पाहून त्याला संशय आला म्हणुन तो पटकन घरात शिरला तर समोर वामनरावांना पाहुन त्याचा संशय अजुनच बळावला. त्याची नजर भिंतीमधील कपाटाकडे गेली. त्याचे तुटलेले तावदान आणि गायब झालेला अस्थी कलश पाहताच तो प्रचंड भडकला. त्याने वामनरावांनी कॉलर पकडली आणि त्यांच्यावर हात उगारला. त्याच्या हात, घरात शिरणाऱ्या त्याच्या आईने वरच्यावर पकडला. त्यामुळे आकाश आश्चर्यचकित झाला. तो रागाने आपल्या आईवर ओरडला, तसे त्याच्या आईने त्याच्या मुस्काटात ठेऊन दिली. सुरु असलेला प्रकार आकलनाच्या बाहेर असल्यामुळे वामनराव शांतपणे काय घडतंय ते समजुन घ्यायचा प्रयत्न करत होते.

"हे तर अजबच घडले. आकाशच्या आईने त्याच्या कानाखाली वाजवली तिही वामनरावांसाठी! हे काय नवीन प्रकरण आहे? महादेव आनंदच्या अस्थी सोबत तर घेऊन गेला पण तो त्या विसर्जित करू शकतो का? की या प्रकरणाला अजुन काही वेगळीच कलाटणी मिळते? ते जाणण्यासाठी पुढे वाचा."