सप्तपदी भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ सप्टेंबर २०१६

सप्तपदी भाग २ - मराठी कथा | Saptapadi Part 2 - Marathi Katha - Page 12

"काका, हा ऍक्सीडन्ट कसा काय झाला? तुम्हाला काही लागले तर नाही ना?" या महादेवच्या प्रश्नावर "आनंदमुळे ऍक्सीडेन्ट झाला पण स्वामींची कृपा म्हणुन वाचलो" असे म्हणत वामनरावांनी स्वामी समर्थांचा अंगारा महादेवच्या कपाळावर आणि गाडीच्या डॅशबोर्डवरही लावला. "हा! आत्ता बोल. तुला कोणता उपाय सापडलाय?" वामनरावांनी उत्सुकतेने महादेवला विचारले. ज्या तांत्रिकाने अस्मितावरील वशीकरण दूर करण्यासाठी आपल्याला मदत केली होती आपण त्याच्याकडेच जात आहोत. तुम्हाला आठवते? तो आपल्याला म्हणाला होता की कधी गरज वाटली तर माझ्याकडे बिनधास्त या म्हणुन. आज ती वेळ आली आहे. आणि माझी खात्री आहे या संकटातुनही तोच आपल्याला वाचवेल." महादेव उत्साहाने म्हणाला. "अरे हो! हे तर माझ्या लक्षातच आले नाही. तु भारी डोकं चालवलंस." वामनराव लहान मुलासारखे उसळत म्हणाले. "हे माझे नाही माझ्या वडिलांचे डोके आहे. इतक्या सहजपणे ते बोलुन गेले की मलाही तुमच्याच सारखे वाटले की अरे हे माझ्या का लक्षात आहे नाही? त्या तांत्रिकाला तर मी विसरूनच गेलो होतो.." महादेव उत्तरला. "कोण सयाजीराव! त्यांना हा सगळा विषय माहित आहे?" या वामनरावांच्या प्रश्नावर महादेवने हसत होकारार्थी मान डोलावली. तुमच्या कुटुंबाचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत." वामनराव कृतज्ञतेने म्हणाले.

गाडी वेगाने तांत्रिकाची झोपडी जवळ करत होती. तासभर गाडी चालवल्यावर ते दोघे त्या वडाच्या झाडाजवळ पोहोचले. तिथे कार पार्क करून पायवाटेने चालत ते तळ्याच्या बाजुने पुढे गेल्यावर पिंपळाच्या झाडाजवळ आले. झोपडीच्या बाहेर उभे राहुन त्यांनी तांत्रिकाला आवाज दिला. पण पुर्वीप्रमाणेच त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. कण्हण्याचा आवाज ऐकुन त्यांनी आत डोकावुन पहिले तर तांत्रिक अर्धमेल्या अवस्थेत जखमी होऊन जमिनीवर पडला होता. तो शेवटचे श्वास घेत होता. ते पाहुन दोघेही त्याच्या मदतीला धावले. त्याला उठवुन बसते केले आणि महादेवने जवळच्याच मातीच्या गेळ्यातील पाणी त्याला पाजले. मोठ्या कष्टाने तो तांत्रिक बोलु लागला. तुम्हाला घाई करावी लागेल. वेळ थोडा आहे. आनंदचा आत्मा खुप शक्तिशाली झाला आहे. तो तुमच्या मुलीला आपल्या सोबत घेऊन जायच्या प्रयत्नात आहे. त्याच्या भावाने त्याचे शरीर तर जाळले पण त्याच्या अस्थी विसर्जित केल्या नाहीत त्यामुळे आनंदच्या आत्म्याला मुक्ती मिळाली नाही. त्यात मरताना त्याच्या मारेकऱ्यांचा आणि तुमचा सुड घेण्याची त्याची प्रबळ इच्छा असल्यामुळे ती इच्छाच त्याचे सामर्थ्य बनले आहे. तुमच्या मुलीला वशीकरणातुन मुक्त करण्याचा उपाय सुचवल्यामुळे आधीच तो नाराज होता त्यात तुम्ही त्याच्यापासुन आपल्या मुलीची सुटका करून घेण्यासाठी माझ्याकडे येत आहात हे कळल्यावर त्याने मला ठार मारायचा प्रयत्न केला. माझ्या जप सामर्थ्याने मी त्याचा प्रतिकार केला पण तो मला वरचढ ठरला. तुम्ही लवकरात लवकर आनंदच्या अस्थी विसर्जित करा म्हणजे त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळेल आणि तेव्हाच तुमची मुलगी त्याच्या त्रासातुन कायमची मुक्त होईल. एवढे बोलुन त्या तांत्रिकाने प्राण सोडले.

"ज्याच्या भरवशावर महादेव आणि वामनराव आनंदच्या आत्म्याविरुद्ध लढाई पुकारू पाहात होते तोच अचानक त्यांना अर्ध्यावर सोडुन गेला. एकीकडे आनंदचा आत्मा अधिकाधीक शक्तिशाली होत चालला होता तर दुसरीकडे तांत्रिकाचा मृत्यू झाल्यामुळे महादेव आणि वामनराव एकदम कमकुवत झाले होते. काय होणार पुढे? आनंदच्या आत्म्याला महादेव आपल्या बुद्धीसामर्थ्यावर मात देऊ शकेल का? अस्मिताची या दुष्टचक्रातुन सुटका होते का? जाणण्यासाठी पुढे वाचा."