सप्तपदी भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ सप्टेंबर २०१६

सप्तपदी भाग २ - मराठी कथा | Saptapadi Part 2 - Marathi Katha - Page 11

सयाजीराव काळे हे बिल्डर लॉबीतले नावाजलेले प्रस्थ होते. सुरुवातीपासुनच त्यांनी महादेवला मित्रवत वागवले होते त्यामुळे महादेव कधीच त्यांच्यापासुन काही लपवत नसे. महादेवचा चिंताक्रांत चेहरा पाहुन ते मनातुन समजले की काही तरी प्रॉब्लेम आहे. त्यांनी महादेवला प्रेमाने विचारले, "काय चिरंजीव! कसले एवढे टेन्शन आलंय आपल्याला? माझ्याशी शेयर केले तर चालेल." त्यावर आतापर्यंत घडलेली हकीकत महादेवने आपल्या वडिलांना न संकोच करता सांगितली. "आता या सगळ्यातुन अस्मिताला कसे वाचवावे तेच मला कळत नाही", महादेवच्या आवाजातील चिंता स्पष्टपणे व्यक्त होत होती. अच्छा! म्हणजे इथे मामला दिलका आहे तर! सयाजीराव महादेवची टेर उडवत म्हणाले. यावर महादेव थोडा वैतागत म्हणाला, "काय हो बाबा! मी इथे टेन्शनमध्ये आहे आणि तुम्हाला चेष्टा सुचतेय." सयाजीराव हसत हसत म्हणाले, “बरं बरं! या आधी वशीकरणातुन त्या मुलीची सुटका करण्यासाठी त्या तांत्रिकाने मदत केली होती म्हणालास ना? मग यावेळीही तो मदत करेलच की!”, “बाबा, यु आर ग्रेट! हे माझ्या लक्षातच आले नाही! मी आत्ता वामन काकांना फोन करतो” महादेव आनंदुन म्हणाला. त्याने तडक वामनरावांना फोन लावला आणि त्याला उपाय सापडल्याचे सांगितले. वामनरावांच्या उतरलेल्या चेहऱ्यावर आशेचे किरण चमकु लागले. महादेवाला भेटण्यासाठी ते तातडीने निघाले. दरवाज्यात त्यांचा लाडका कुत्रा टायगर त्यांची वाट अडवुन उभा होता. ते त्याला चुचकारून पुढे जायचा प्रयत्न करू लागले तर तो त्याच्या आडवा आडवा जाऊन त्यांच्यावर भुंकू लागला. गडबडीत वामनरावांच्या लक्षात आले नाही की टायगर त्यांना काहीतरी सांगु पाहतोय, वैतागुन त्यांनी त्याच्यावर कोपऱ्यातील काठी उगारली तरीही तो त्यांना जाऊ देईना. शेवटी टायगरला ढकलून ते कारच्या दिशेने गेले तर टायगर परत त्यांना आडवा गेला व कारकडे पाहत जोरजोरात भुंकू लागला. तसे वामनरावांचे लक्ष कारच्या मागच्या सीटकडे गेले. तिथे सीटवर एक काळी आकृती बसलेली त्यांना दिसली.

क्षणात त्यांना टायगरच्या विचित्र वागण्यामागचे कारण लक्षात आले. ते समजले की आनंद त्यांना दगाफटका करायची वाटच बघतोय. त्यांना आपल्या इमानी कुत्र्याचे खुप कौतुक वाटले. आपल्या काहीच लक्षात आलेले नाही असे दाखवत ते टायगरवर ओरडत परत घरात गेले. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचा अंगारा त्यांनी अस्मिताच्या, आपल्या पत्नीच्या आणि स्वतःच्या कपाळावर लावला आणि थोडा पुडीतही बांधुन घेतला. तोंडाने श्री स्वामी समर्थ म्हणत ते कारच्या दिशेने निघाले. अचानक कारचा मागचा दरवाजा धाडकन उघडला गेला आणि एक काळी आकृती त्यातुन वेगाने बाहेर निघुन जाताना त्यांना दिसली. आपली आयडिया उपयोगी ठरल्याचे त्यांना समाधान वाटले. स्वामी समर्थांचे आभार मानत ते पटकन कारमध्ये बसले आणि त्यांनी कार महादेवच्या ऑफिसच्या दिशेने दामटली. "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" हे कारच्या मागच्या काचेवर लिहिलेले वाक्य जणु आनंदला वाकुल्या दाखवत होते. तो खुप चिडला होता, रागाच्या भरात त्याने लोखंडी गेट वाकवुन टाकले. रागाने धुसफुसत तो अस्मिताच्या रूममध्ये गेला पण त्याला अस्मिताच्या जवळही जाता आले नाही. अंगाऱ्याने आपले काम चोख बजावले होते. रागाने बेभान होत तो वामनरावांच्या मागे गेला. वामनरावांना किंवा त्यांच्या गाडीला तो स्पर्शही करू शकत नव्हता हे लक्षात आल्यावर त्याने समोरून येणाऱ्या कारच्या चालकाला आपले हिडीस रूप दाखवले त्यामुळे घाबरून त्याने कारचे स्टेरिंग वळवले आणि त्याची कार थेट वामनरावांच्या कारला जाऊन भिडली. टक्कर जबरदस्त होती पण वामनरावांच्या सुदैवाने त्यांना खरचटण्यापलीकडे फारसे काही लागले नाही. गर्दी जमली. वामनरावांना पाहुन अनेकजण मदतीला आले. वामनरावांनी फोन करून महादेवला आणि आपल्या ड्रायव्हरला तिथे बोलावुन घेतले. ते दोघे तिथे येताच ड्रायव्हरला पुढचे निस्तरायला सांगुन महादेवसह ते पुढे निघाले.

आपल्या इमानी कुत्र्यामुळे आणि स्वामी समर्थांच्या कृपेमुळे जीवघेण्या संकटातुन वामनराव थोडक्यात बचावले होते. महादेवसह ते त्या तांत्रिकापर्यंत सुखरूप पोहोचतात का? तो त्यांची मदत करायला तयार होतो का? हे जाणण्यासाठी पुढे वाचा.