सप्तपदी भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ सप्टेंबर २०१६

सप्तपदी भाग २ - मराठी कथा | Saptapadi Part 2 - Marathi Katha - Page 10

वामनराव गडबडीने घरी पोहोचले ते डॉक्टरांना सोबत घेऊनच. अस्मिताला तपासुन डॉक्टरांनी मलमपट्टी केली व काही औषधे, गोळ्या व मलम लिहुन दिले. डॉक्टर जायला निघाले तोच त्या रूम मधील वातावरण पुर्वीसारखेच बदलुन गेले. अस्मिता भिरभिरत्या नजरेने इकडे तिकडे बघु लागली. जणु काही ती कोणाला शोधते आहे. “तो आलाय! तो मला जीवंत सोडणार नाही! मी मरणार! तो कोणालाच सोडणार नाही! बाबा मला वाचवा!” म्हणुन ती वामनरावांना बिलगु लागली. ती पुरती भेदरली होती. काही कळायच्या आतच त्या डॉक्टरच्या पोटात एक सणसणीत ठोसा बसला. त्या ठोशाने तो डॉक्टर कमरेतुन पुढे वाकला त्यासरशी एक जबरदस्त लाथ त्याच्या पार्श्व् भागावर बसली आणि तो सात आठ फुट दूर उडून तोंडावर पडला. अस्मिताच्या पाठीवर उठलेल्या वळांसारखेच वळ त्याच्या हातापायावर व पाठीवर उठु लागले. तो जोरजोरात ओरडु लागला. त्यासरशी एक भयाण अमंगळ अमानवी हास्य अस्मिताच्या रूममध्ये घुमु लागले. वामनरावांसह सर्वच जण होत असलेला प्रकार लाचारपणे पाहत उभे होते. कोणी काहीच करू शकत नव्हते आणि डॉक्टरच्या ओरडण्याबरोबर त्याला आणखीनच जोरात फटके पडत होते. एकवेळ डॉक्टरने उठून दरवाज्याकडे पळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला तर जवळच असलेले एक छोटे लाकडी स्टूल हवेत उडाले आणि डॉक्टरच्या पायांवर आदळले त्यासरशी तो डॉक्टर कोलांटी उडी मारून जमीनीवर आदळला. तसा हसण्याचा आवाज अधिकच भेसूर झाला. एखाद्या उंदराला मांजर जसे खेळवते तसा आनंदचा आत्मा त्या डॉक्टरला खेळवत होता. त्याला वामनरावांना दाखवुन द्यायचे होते की तो काय करू शकत होता. त्याचे समाधान झाल्यावर तो त्या डॉक्टरला उद्देशून म्हणाला, "डॉक्टर परत जर का या घरात आलास तर येशील आपल्या पायावर पण जाशील चार खांद्यांवर. समजलास? चल निघ. आणि बरं का सासरेबुवा! ही तर सुरवात आहे, आगे आगे देखो होता है क्या!" असे म्हणुन त्याने आपली एक झलक दाखवली आणि एक गडगडाटी हास्य करून तो गायब झाला. सगळेजण थिजल्यासारखे जागेवर उभे होते. आनंदच्या आत्म्याने आपले अस्तित्व दाखवुन दिले होते. त्याचे ते भयानक रूप पाहुन वामनरावांसकट सर्वांचाच घसा सुकला. कोणाच्याही तोंडुन शब्दच फुटेना. पुर्ण घरात भयाण शांतता पसरली होती. इतक्यात वामनरावांचा मोबाईल फोन खणखणला आणि सगळेचजण दचकले. वामनरावांना सावरायला काही वेळ गेला. फोनवर महादेव होता.

वामनरावांचा खोल गेलेला आवाज ऐकुन महादेव सावध झाला आणि काही तरी गंभीर समस्या उद्भवली आहे हे त्याने ताडले. फोनवर बोलणेही वामनरावांना कष्टप्रद वाटत होते. त्यामुळे फोनवर बोलणे शक्य नसल्यास प्रत्यक्ष भेटुन बोलुया असे सुचवुन वामनरावांना भेटण्यासाठी तो त्यांच्या घरी येत आहे असे त्याने सांगितले. तेव्हा घरी नको ऑफिसला ये! असे सांगुन वामनरावांनी फोन ठेवला. पुढच्या अर्ध्या तासात महादेवची कार वामनरावांच्या ऑफिस समोर थांबली. चौथ्या मजल्यावरील आपल्या ए.सी केबिन मध्ये घामाघुम झालेले वामनराव शुंन्यात नजर लावुन बसले होते. महादेव आल्याचे त्यांच्या ध्यानातही आले नाही एवढे ते अंतर्बाह्य हादरले होते. “काय झाले काका? तुम्ही एवढे घाबरलेले का दिसत आहात? anything serious?”, महादेवच्या प्रश्नाने भानावर आलेल्या वामनरावांनी त्यांच्यावर गुदरलेला प्रसंग शांतपणे महादेवाला सांगितला व म्हणाले, "मला वाटले होते तो चांडाळ मेला आणि माझी अस्मि त्याच्या तावडीतुन सुटली पण नाही. तो माझा भ्रम होता. जीवंतपणी त्याने माझ्या काळजाच्या तुकड्याला एवढा त्रास दिला. आता तर तो भुत बनला आहे. माझ्या पोरींचे काय हाल करेल याचा विचार करूनही मला कापरे भरतय. माझा राग तो माझ्या पोरीवर काढतोय. तो जीवंत असता तर मी त्याचा काही तरी बंदोबस्त केला असता पण आता तर मी असहाय आणि लाचार झालोय. माझं डोकंच काम करेनासे झालय. महादेवा माझ्या पोरीला वाचव रे!" असे म्हणुन वामनरावांनी महादेव समोर हात जोडले. "अहो काका असे हातपाय गाळुन कसे चालेल? या आधीही आपण आलेल्या संकटांवर उपाय शोधुन काढला होताच ना? मग याही संकटावर उपाय सापडेलच की! फक्त तुम्ही हताश होऊ नका. मला थोडा विचार करू दे. मी काही ना काही मार्ग शोधुन काढेनच." असे म्हणुन महादेव ऑफिस मधुन बाहेर पडला. वामनरावांना जरी त्याने सांगितले असले की तो काही ना काही मार्ग शोधुन काढेल तरी त्यावेळेस त्याला स्वतःलाच कळत नव्हते की काय करावे. भुतापुढे सामान्य माणसांचे काय चालणार? तो विचारात पडला. त्याला काहीच सुचेना तेव्हा त्याने आपल्या वडिलांशी या विषयावर बोलायचे ठरवले. आतापर्यंत जेव्हा जेव्हा त्याला एखाद्या अडचणीतुन बाहेर पडण्याचा मार्ग सापडला नव्हता तेव्हा तेव्हा त्याला त्याच्या वडिलांच्या मार्गदर्शनाचा खुप फायदा झाला होता.

खचलेले वामनराव महादेवला भेटायला बोलावतात. महादेव त्यांना धीर देतो आणि आलेल्या समस्येवर उपाय शोधण्याचे आश्वासन देतो. अस्मिताच्या काळजीने चिंताग्रस्त असलेला महादेव आपल्या वडिलांचा सल्ला घ्यायचे ठरवतो. त्याचे वडील त्याची मदत करतात का? महादेवाला अस्मिताला वाचवण्यासाठी उपाय सापडतो का? हे जाणुन घेण्यासाठी पुढे वाचा.