सप्तपदी भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ सप्टेंबर २०१६

सप्तपदी भाग २ - मराठी कथा | Saptapadi Part 2 - Marathi Katha

सप्तपदी पुर्वांर्ध (सप्तपदी कथेचा पहिला भाग) - “आनंद अस्मिताला वशीकरणाद्वारे आपल्या जाळ्यात ओढतो आणि तिच्याशी देवळात लग्न करतो. पैशासाठी तो आणि त्याचे कुटुंब तिचा अनन्वित छळ करतात. आनंदने अस्मिताला भुलवून कसे वश केले ते महादेव, आनंदकडुन हुशारीने जाणुन घेतो. तो आणि वामनराव, तांत्रिकाच्या मदतीने अस्मिताला वशीकरणातुन मुक्त करतात. नंतर अनपेक्षितरित्या आनंदचा गुंडांकडुन पैशासाठी खुन होतो. आनंदच्या खुनाची बातमी कळताच महादेव, आणि वामनराव अस्मिताची आनंदच्या त्रासातुन विना कटकट सुटका झाली असे समजुन सुटकेचा निश्वास सोडतात पण अस्मिताला मात्र खुप दुःख होते.” पुढे चालु...

आनंदचा खुन झाला त्या रात्री खुप ऊशीरा शिवलकरांच्या घराचा दरवाजा ठोठवला गेला. आनंद आला असेल असे समजुन त्याच्या आईने दरवाजा उघडला. दारात पोलिस आलेले पाहिल्यावर तिच्या छातीत धस्स झाले. आनंदने रागाच्या भरात अस्मिताचे किंवा वामनरावांचे काही बरे वाईट तर केले नाही ना? अशी शंकेची पाल तिच्या मनात चुकचुकली. तिने आकाशला हाक मारली. दारात पोलिसांना पाहुन तोही जरा घाबरलाच. “आनंद शिवलकर इथेच राहतात का?” पोलिसांचा प्रश्न. “हो. पण तो आत्ता घरात नाही. काय झाले?” आकाश आणि त्याच्या आईच्या चेहर्‍यावर काळजीचे ढग दाटले होते. “आम्हाला एक बॉडी मिळाली आहे, ती आनंद शिवलकर यांची असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बॉडीची ओळख पटवण्यासाठी तुम्हाला आमच्याबरोबर यावे लागेल.” पोलिसांच्या या वाक्याने त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. आनंदच्या आईने तिथेच ऊर बडवुन घ्यायला सुरवात केली. त्या आवाजाने सुमन पण बाहेर आली. “आई तु जरा शांत हो गं! आधी मी जाऊन बघुन येतो. तो आनंदच असेल कशावरून? सुमन तु आईला घेऊन आत जा. मी आलोच थोड्या वेळात.” असे म्हणुन आकाश जीपमध्ये बसला. “मी सुद्धा सोबत येते, माझा जीव राहणार नाही” असे म्हणत त्याची आई सुद्धा जीपमध्ये चढली.

गोंधळलेल्या सुमनला काहीच न सांगता आकाश व त्याची आई पोलिसांच्या जीप मधुन सरकारी रुग्णालयात गेले. तिथे शवागारात एका मृतदेहावर पांढरी चादर घातलेली त्यांना दिसली. डोक्यात दगड घालुन खुन केल्यामुळे चेहरा ओळखण्याच्या पलीकडे गेला आहे, तेव्हा अंगावरचे कपडे आणि शरीरावरील खुणांवरून मृतदेह ओळखा असे पोलिसांनी त्यांना सांगितले. थरथरत्या हातांनी त्यांनी चादर मृतदेहावरून दूर केली. मृतदेहाच्या अंगावरील कपडे त्यांनी ओळखले आणि दोघेही आनंदच्या नावाने रडु लागले. त्यांचा भर ओसरल्यावर शरीरावरील इतर काही खुणा माहित असल्यास त्या पण बघुन घ्या म्हणजे खात्री पटायला मदत होईल असे पोलिसांनी सांगितले, तसे आनंदच्या उजव्या दंडावरील लहानपणी भाजल्यामुळे झालेल्या जखमेच्या खुणेला ओळखुन आनंदच्या आईने तो मृतदेह आनंदचाच असल्याचे सांगितले आणि ती मटकन खालीच बसली. आकाश तिला सावरायला गेला आणि दोघेही एकमेकाला मिठी मारून रडु लागले. मृतदेहाची ओळख पटल्यावर, “पोस्टमॉर्टेम झाली की उत्तरक्रियेसाठी मृतदेह ताब्यात देण्यात येईल, उद्या सकाळी जबानीसाठी पोलिस स्टेशनला या.” असे पोलिसांनी सांगितले. रडुन रडुन सुजलेल्या डोळ्यांनी ते दोघे जीप मधुन उतरले. आनंदचा खुन झाल्याचे कळताच सुमन आणि आनंदचे वडिल त्या दोघांसोबत विलाप करू लागले.

“आनंदच्या मृत्यूमुळे घरातील एक कमावता सदस्य गेला, त्याचबरोबर त्याच्या पाठोपाठ अस्मिताच्या वडिलांकडुन मिळणारे पैसेही गेले. दुःख आणि सुड भावनेने पेटलेल्या शिवलकर कुटुंबीयांनी कुलकर्णी कुटुंबाला त्रास देण्यासाठी काय केले ते आता पुढे वाचा.”