MarathiMati.com - Android App on Google Play Store

समंध

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ जून २०१५

समंध - मराठी कथा | Samandh - Marathi Katha

एका समंधाने तिला धरले. घरी येईपर्यंत काही जाणवले नाही परंतु घरी येताच त्या समंधाने आपले अस्तित्व दाखवायला सुरवात केली. सगळे झोपल्यावर पहाटे साधारण ३ वाजता सलमा ओरडु लागली. त्या आवाजाने सलीम जागा झाला आणि तिला काय झाले ते पाहायला त्याने लाइट लावला तर तिला पाहुन त्याची बोबडीच वळली. सलमाचे डोळे पूर्ण फिरले होते...

कन्याकुमारीचे भाडे संपुन कधी एकदा शहनाजला भेटतो असे सचिनला झाले होते. सचिनची मारुती ओमनी त्याने भाड्याने लावली होती आज १५ दिवसानंतर तो त्याच्या लाडक्या शहनाजला भेटणार होता. होय, सचिन हिंदू होता तर शहनाज मुस्लिम तरीही त्यांच्यामधे प्रेम फुलले होते. शहनाज सचिनच्या मित्राची, सलिमची बहिण होती. सचिन आणि सलिमचे एकमेकांकडे नेहमी जाणे येणे होते. सतत होणाऱ्या भेटीमुळे हळूहळू सचिन आणि शहनाज एकमेकांकडे आकृष्ट झाले. सुदैवाने सलीमचा आणि त्याच्या घरच्यांचा या नात्याला विरोध नव्हता पण सचिनच्या घरून मात्र याला प्रचंड विरोध होता. आपली बहिण आपल्या मित्राची पत्नी होणार याचा सलिमला आनंदच होता कारण सचिन एक चांगला मेहनती आणि सुस्वभावी मुलगा होता आणि तो त्याच्या घरचा सदस्य असल्यासारखाच वागायचा त्यामुळे मोहल्ल्यातही तो सगळ्यांना आवडायचा.

सचिन परत आल्यावर तडक शहनाजला भेटायला गेला. शहनाजच्या घराबाहेर जमलेली गर्दी पाहुन त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. सचिनला आलेले पाहुन सलीम घराबाहेर आला आणि त्याला मिठी मारून रडु लागला, त्याने सचिन आणि गोंधळला. सलिमचा आवेग ओसरल्यावर सचिनने त्याला विचारले की, ‘काय झालंय?’, तेव्हा सलिमने त्याला बाजूच्या घरी नेले तिथे शहनाज उदास बसली होती. सचिनला पाहताच तिला भरून आले पण सलीम समोर असल्याने तिने स्वत:ला सावरले.

त्याचे झाले असे की, सलिमची पत्नी सलमा आणि शहनाज एका नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. लग्न झाल्यावर परत येत असताना सलीमच्या पत्नीला खुप जोरात लघुशंका लागली. असह्य झाल्याने एका आडोशाला तिने उरकुन घेतले आणि तिथेच घात झाला. एका समंधाने तिला धरले. घरी येईपर्यंत काही जाणवले नाही परंतु घरी येताच त्या समंधाने आपले अस्तित्व दाखवायला सुरवात केली. सगळे झोपल्यावर पहाटे साधारण ३ वाजता सलमा ओरडु लागली. त्या आवाजाने सलीम जागा झाला आणि तिला काय झाले ते पाहायला त्याने लाइट लावला तर तिला पाहुन त्याची बोबडीच वळली. सलमाचे डोळे पूर्ण फिरले होते, आतील बुब्बूळ गायब होऊन फक्त पांढरे डोळे दिसत होते. हे एवढ्यावरच थांबले नाही तर तिचे हात पाय उलटे फिरले होते आणि ती भिंतीवर उलटी चढत जाउन छताला चिकटली आणि दात दाखवत भयाकारी आवाजात हसत होती.

हा सगळा गोंधळ ऐकून सलिमचे आई - वडील काय झाले ते पाहायला आले आणि समोरचे दृश्य पाहुन दारातच थिजल्यासारखे झाले. त्यांच्या पाठोपाठ शहनाज पण तिथे आली आणि आपल्या वहिनीची अवस्था पाहुन मोठ्याने किंचाळली. शहनाजला आलेले पाहताच सलमाने आपली मान विचित्र पद्धतीने फिरवली जणू काही तिच्या मानेत मणकेच नव्हते आणि फार भयंकर आवाजात विक्राळ हास्य करत पुरुषी आवाजात म्हणाली की, ‘अब तुम्हारी बारी। में तुम्हे भी नहीं छोड़ूंगा सलमा के साथ तुम्हे भी ले जाऊँगा’।

MarathiMati.com - Android App on Google Play Store