प्रतिशोध

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० ऑगस्ट २०१५

प्रतिशोध - मराठी कथा | Pratishodh - Marathi Katha - Page 5

‘मला माफ कर मी चुकलो’ असे ओरडायचा तर कधी दिवसभर रडत राहायचा. वॉर्डबॉय त्याला पाहून म्हणु लागले की हा कामातुन गेला! ठार वेडा झाला.

सात्विक आपल्याला वेड लागले आहे हे इतरांना पटवण्यासाठी मधेमधे वेडेचाळे करुन दाखवायचा, आरडा ओरडा करायचा. असाच एक दिवस तो मेंटल असायलम मधे आपल्या सेलमधील कॉटवर स्वत:च्या अक्कल हुशारीवर स्वत:चीच पाठ थोपटत बसला होता. अचानक त्याला आपल्या सेलचा दरवाजा उघडुन वेगात बंद झाल्यासारखे वाटले. आपल्याला भास झाला असेल असे समजुन त्याने दुर्लक्ष्य केले. त्याच रात्री कोणीतरी आपली मान दाबत असल्यासारखे वाटल्याने सात्विक जागा झाला. आधी त्याला स्वप्न असावे असे वाटले पण गळ्याभोवती अजुनही दबाव जाणवत असल्यामुळे तो घाबरला आणि हातपाय झाडत ओरडू लागला. रोजचेच असल्यामुळे वॉर्डबॉयनी प्रथम दुर्लक्ष केले पण जसा त्याचा आवाज वाढला तसे वैतागुन दोन वॉर्डबॉय त्याच्या सेल पाशी आले आणि सात्विकच्या गळ्यावरील दबाव नाहिसा झाला. त्याबरोबर तो एकदम शांत झाला. पण भांबावल्यासारखा सर्व रूममधे काही तरी शोधु लागला. तो शांत झाल्याचे पाहून ते वॉर्डबॉय तिथुन निघुन गेले पण सात्विक आंतरबाह्य हादरला होता.

रात्रभर त्याला झोप लागली नाही सारखा दचकुन जागा व्हायचा कधी त्याची कॉट हलायची तर कधी सेलमधील दिवे अचानक लागायचे, कधी खुर्ची सरकायची तर कधी टेबलचे ड्रॉवर अचानक आत बाहेर व्हायचे. सात्विकला सकाळी उशीरा झोप लागली. दुपारी त्याची कॉट एका बाजूने उचलली गेली आणि दाणकन खाली आपटली. धक्क्याने तो जागा झाला तर त्याच्या डाव्या कानाखाली एक सणसणित चपराक बसली. सात्विकच्या मस्तकात वेदनेचा आगडोंब उसळला. मोठ्या मुश्किलीने त्याने आपल्या वेदना सहन केल्या. दुसऱ्या दिवशी तो आंघोळीला गेला असताना कोणी तरी त्याची मान धरून त्याचे डोके बादलीत बुडवून दाबून धरले. नाकातोंडात पाणी गेल्यामुळे सात्विक पुरता घुसमटला. पाच एक मिनिटे तो खोकत होता. मोठ्या मुश्किलीने त्याचा श्वास ताळ्यावर आला. त्या क्षणापासून त्याची खात्री झाली की कोणी तरी आपल्या जीवावर उठलाय. पण कोण? विचार करुन त्याचे डोके फुटायची पाळी आली होती.

त्या दिवसापासून तो सतत भेदरलेला असायचा. त्याने त्याच्या वकीलांशी संपर्क करायचा प्रयत्न केला पण त्यांनी अजुन काही दिवस तरी मेंटल असायलम मधेच काढायचा सल्ला दिला. असाच एक दिवस तो त्याच्या सेल मधे बसला असताना त्याला गोपाळरावांचा आत्मा सेलच्या बंद दरवाजातून आरपार होत आत आलेला दिसला तसा सात्विक कॉटवर अंग आकसुन बसला. वातावरण एकदम थंड झाले होते इतके की सात्विक कुडकुडु लागला होता. गोपाळरावांचा पुरता बंदोबस्त केला असुनही हा इथे कसा? हा प्रश्न सात्विकच्या मेंदुला पोखरू लागला. अचानक गोपाळरावांचा चेहरा एकदम भेसुर झाला आणि त्यांनी कॉट सकट सात्विकला उचलुन फेकुन दिले. समोरच्या भिंतीवर सात्विक सणकुन आपटला पुन्हा एकदा त्यांच्या डोक्यात वेदनेचा डोंब उठला. त्याने कसाबसा उठायचा प्रयत्न केला पण त्याला उठताच येईना, त्याचा पाय मोडला होता. मोठा आवाज ऐकल्यामुळे वॉर्डबॉय धावत आले तसे गोपाळराव गायब झाले. सात्विकला हॉस्पिटल मधे भरती केले गेले. पायाला प्लास्टर घालुन डिस्चार्ज मिळाल्यावर परत असायलम मधे जायच्या विचाराने सात्विक इतका घाबरला की तो असायलम मधे परतायला तयारच नव्हता. सतत ‘गोपाळराव मला मारून टाकेल मी असायलम मधे परत जाणार नाही’ असे काही बाही बरळु लागला. वॉर्डबॉय नी त्याला जबरदस्ती असायलममध्ये न्यायचा प्रयत्न केल्यावर त्याने खुपच अकांडतांडव केले.

आपल्या सेलच्या दरवाजाला पाठ टेकुन सात्विक तासनतास एकटक समोर पाहात राहायचा, कधी किंचाळायचा तर कधी स्वत:च्या तोंडात मारून घ्यायचा, ‘मला माफ कर मी चुकलो’ असे ओरडायचा तर कधी दिवसभर रडत राहायचा. वॉर्डबॉय त्याला पाहून म्हणु लागले की हा कामातुन गेला! ठार वेडा झाला. गोपाळरावांचा आत्मा सात्विकबरोबर उंदीर मांजराचा खेळ खेळत होते. सात्विकला ना ते खाऊ-पिऊ देत होते ना झोपु देत होते. सतत भयानक रुपे घेऊन घाबरवत होते. आठवडयाभरातच सात्विकची हाडे दिसु लागली, डोळे खोल गेले. तो खुप अशक्त झाला होता. असे करत करत ती तारीख आली ज्या तारखेला गोपाळरावांचा मृत्यु झाला होता. पहाटेचे तीन वाजले होते. डोळे फिरलेल्या अवस्थेतील सात्विकचे शव डॉक्टर स्ट्रेचर वरून पोस्टमॉर्टम साठी घेऊन जात होते. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने सात्विकचा मृत्यु झाला होता. डोळे पुर्ण फिरलेला आणि आपला गळा आपल्याच हातानी दाबून धरलेला, वेड्या वाकडया अवस्थेतील सात्विक, डॉक्टरना त्याच्या कॉटवर सापडला होता. जणू काही श्वासाअभावी प्रचंड तडफडून त्याचा मृत्यु झाला होता. मरण्याआधी सात्विक खुप वेदना आणि पिडेतून गेला होता. गोपाळरावांनी आपला प्रतिशोध घेतला होता. सात्विकच्या मृत्युबरोबरच गोपाळरावांना सुद्धा मुक्ती मिळाली होती. भगवानदासांनी आपल्या सुनेला दिलेला शब्द आज खरा ठरुन एक सुडचक्र पुर्ण झाले होते, खरच?