प्रतिशोध

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० ऑगस्ट २०१५

प्रतिशोध - मराठी कथा | Pratishodh - Marathi Katha - Page 3

सात्विकची ओळख पटताच पोलिसांनी त्याची गचांडी धरून त्याच्या मुसक्या आवळल्या.

इकडे रुमबॉय कडुन बऱ्याचदा गोपाळराव आणि ती व्यक्ती दारुच्या नशेत रात्री अपरात्री लॉजवर आल्याचे इन्स्पेक्टर जाधवना कळले. कोणा रुबीबद्दल बोलताना आपण ऐकल्याचेही त्याने सांगितले. दोघांच्या बोलण्यातून ती बारगर्ल असावी असे वाटते, असेही तो म्हणाला. इतक्या गोष्टी इन्स्पेक्टर जाधवना आपला तपास पुढे न्यायला पुरेशा होत्या. त्याने जवळपासच्या डान्सबारमधे रुबीची काही माहिती मिळते का ते पाहायला आपली माणसे पाठवली सोबत त्या व्यक्तीचा फोटो पण दिला. लवकरच रूबी ज्या डान्सबारमधे काम करता करता आपले सावज पटवायची तो डान्सबार सापडला. तिथल्या वेट्रेसनी रूबीचा सिलेंडरच्या स्फोटात मृत्यु झाल्याचे सांगितले तसेच फोटोतील व्यक्तीला ओळखले पण त्याचे नाव मात्र कोणालाच माहीत नव्हते. दर शनिवारी रात्री तो तिथे येत असल्याची महत्वपुर्ण बातमी पोलिसांना मिळाली. भगवानदासांनी, त्या व्यक्तीचे नाव कदाचित सात्विक कुलकर्णी असावे असे इन्स्पेक्टरना फोन करुन सांगितले. त्यानुसार इन्स्पेक्टर जाधवांनी आपले खबरी सोडले. शनिवारी संध्याकाळी आठ वाजल्या पासुन साध्या वेशातील पोलीस त्या डान्सबार मध्ये आणि अवती भवती सात्विकला पकडण्यासाठी फिल्डिंग लावुन होते. रविवारी सकाळचे सहा वाजले तरी सात्विक डान्सबारकडे फिरकलाही नाही त्यामुळे इन्स्पेक्टर जाधवांची खुप चिडचिड झाली. रविवारी रात्री लावलेली फिल्डिंगपण बेकार गेली आता खबऱ्यांमार्फत मिळणारी माहितीच त्यांचा पुढचा आठवडा वाचवु शकणार होती.

मंगळवारी रात्री १२:३० वाजता इन्स्पेक्टर जाधवांचा मोबाईल खणाणला. सात्विकला अप्सरा डान्सबार मधे पाहिल्याचे एका खबरी कडुन समजताच इन्स्पेक्टर जाधव साध्या वेशातील निवडक पोलीसांना सोबत घेऊन जीप मधुन तडक निघाले. सात्विक चिल्ड बियरचे घोट घेत गोपाळरावांचे पैसे तिथल्या पोरीँवर उडवत होता. गोपाळरावांचा त्या बाबामार्फत बंदोबस्त केल्यामुळे तो एकदम निर्धास्त होता. पोलीस कधी आपल्यापर्यंत पोहोचतील हा विचारही त्याच्या मनाला शिवला नव्हता. स्वत:च्या हुशारीवर त्याला जास्तच गर्व होता. सात्विकची ओळख पटताच पोलिसांनी त्याची गचांडी धरून त्याच्या मुसक्या आवळल्या. सात्विक सापडल्याचे इन्स्पेक्टर जाधवांनी भगवानदासांना कळविले, तसे ते लगबगीने पोलीस स्टेशनला आले. लॉकपमधे इन्स्पेक्टर जाधवांनी सात्विकचा योग्य तो पाहुणचार करताच तो पोपटासारखा बोलू लागला. भगवानदासांनी बालसुधार गृहात रवानगी केल्यापासून ते बाबाच्या मदतीने गोपाळराव आणि रूबीचा काटा काढण्यापर्यंत सर्व काही त्याने पोलिसांना सांगितले. ते सर्व ऐकल्यावर भगवानदास मट्‍कन खालीच बसले. महादेवाने त्यांना सावरले. सुडापायी सात्विकनेच गोपाळरावांची हत्या करवली हे कळताच त्यांच्या मनातील सात्विकवरील पहिल्यापासून असलेल्या रागाची जागा आता द्वेषाने घेतली. कबुलीजबाबावर सात्विकची सही घेतल्यावर इन्स्पेक्टर जाधव भगवानरावांकडे वळणार इतक्यात भगवानदासांनी जाधवांच्या कंबरेला असलेल्या पट्टयातील पिस्तुल खेचुन सात्विकवर गोळी झाडली ती त्याच्या डाव्या कानाला उडवत डोक्याला चाटून गेली. भगवानदास दुसरी गोळी झाडणार इतक्यात इन्स्पेक्टर जाधवांनी झडप घालुन ती पिस्तुल काढुन घेतली.

जखमी सात्विकला त्वरीत हॉस्पिटलमधे भरती करण्यात आले. त्याचा डावा कान जरी उडाला असला तरी त्याच्या जीवाला कोणताच धोका नव्हता. पण कोर्टात केस उभी राहिल्यावर वकीलांनी डोक्यात गोळी लागल्यामुळे सात्विकच्या मेंदुवर परिणाम झाल्याने तो कोर्टात हजर राहण्यास शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या असमर्थ असल्याचे सिद्ध करुन जो पर्यंत तो ठीक होत नाही तोपर्यंत केस पुढे ढकलण्याची विनंती कोर्टाला केली. सात्विकची मेंटल कंडीशन ठीक नसल्याचे डॉक्टरांनी सुद्धा सांगितल्यामुळे कोर्टाने सात्विकला तो ठीक होईपर्यंत पुढील उपचारांसाठी मेंटल असायलम मधे ठेवण्याचे आदेश दिले. अशा रितीने सात्विक कायद्याच्या हातावर तुरी देऊन तात्पुरता का होईना पण निसटला होता, त्यामुळे इतर साक्षीदारांची उलट तपासणी पण रद्द झाली. आता जो पर्यंत डॉक्टर सात्विक ठीक असल्याचा निर्वाळा देत नाहीत तोपर्यंत केस पुढे सरकणे अशक्य होते.