प्रतिशोध

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० ऑगस्ट २०१५

प्रतिशोध - मराठी कथा | Pratishodh - Marathi Katha - Page 2

“माझे लेकरु माझ्याकडे आपला जीव वाचवण्यासाठी विनवणी करत असते आणि मी त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही”.

रात्री जेवण झाल्यावर त्यांनी झालेला सर्व प्रकार आपल्या सासऱ्यांना सांगितला. ते ऐकुन भगवानदास म्हणाले, “म्हणजे मला झालेला तो भास नव्हता तर, गोपाळ खरच आला होता”! ते काय म्हणतात ते न समजल्याने राधाबाई त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागल्या. ते लक्षात येताच भगवानदास सांगु लागले, गेले काही दिवस रोज मला एकच स्वप्न पडतंय. स्वप्नात मला माझा गोपाळ, “बाबा मला वाचवा” असे ओरडत जमिनीवर हात पाय बांधलेल्या अवस्थेत पडलेला दिसतो. तो कशाला तरी खुप घाबरलेला असतो. अचानक कोणी तरी त्याचा गळा दाबल्यासारखा तो तडफडु लागतो. त्या पकडीतून सुटायचा तो खुप प्रयत्न करतो पण त्या शक्तिपुढे त्याची ताकद तोकडी पडते. त्याचा श्वास उखडू लागतो आणि काही क्षणात त्याची धडपड थांबते. एक शेवटचा आचका देऊन त्याचे शरीर निष्प्राण होते”. क्षणभर भयाण शांतता पसरते आणि त्या स्तब्ध वातावरणात भगवानदासांचे कातर शब्द घुमतात. “माझे लेकरु माझ्याकडे आपला जीव वाचवण्यासाठी विनवणी करत असते आणि मी त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही”. राधाबाई आणि भगवानदास दोघांच्याही डोळ्यातून अश्रुंचे पाट वाहू लागतात.

दु:खाचा भर ओसरल्यावर भगवानदास म्हणाले, “परवा रात्री हेच स्वप्न पडल्यावर मी जागा झालो तर माझ्या पायांवर हातांचा स्पर्श मला स्पष्ट जाणवला जणू कोणी माझे पाय चेपत होते. उठून पाहीले तर कोणीच नव्हते. इतक्यात मला माझ्या खोलीचा दरवाजा उघडुन कोणीतरी बाहेर गेल्यासारखे वाटले म्हणुन मी कोण आहे ते बघायला बाहेर आलो तर हॉलमध्ये मला गोपाळ ऊभा असल्यासारखे वाटले, मी पुढे गेलो तसा तो किचन मध्ये गेला त्याच्या मागोमाग मी ही किचनमध्ये गेलो तर तिथे कोणीच नव्हते. मला भास झाला असेल असे वाटुन मी परत माझ्या खोलीत जाऊन झोपलो. पण तु जे सांगतेस त्यावरून मला आता असे वाटतेय की मुलाच्या ओढीने तो परत आला असावा पण तसे असेल तर जेव्हा तुझ्या बायको मुलाचा आम्ही सांभाळ करू त्यांना अंतर देणार नाही असे म्हटले तेव्हा कावळा शिवायला पाहिजे होता पण नाही शिवला. काहीतरी दुसरेच कारण आहे आणि त्यामुळेच गोपाळचा आत्मा भटकतोय. मी त्याला वाचवु तर नाही शकलो पण त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळवून देण्यासाठी मी काय वाटेल ते करेन. तु काळजी करू नकोस. जा बिनधास्त झोप. तुला आणि रोहितला तो काहीही करणार नाही”.

दुसऱ्याच दिवशी भगवानदास दुकानातील एका अनुभवी वयोवृद्ध नोकरासमवेत गावातील भगताकडे गेले. भगताला त्यांनी दररोज पडणारे स्वप्न आणि आपला दिवंगत मुलगा आपल्या घरात वावरत असताना पाहिल्याचे सांगितले. ते ऐकताच भगताने देवीला कौल लावला. जवळ जवळ दोन तास तो देवीशी झगडत होता. शेवटी त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर त्याने गोपाळरावांना मुंबई जवळील एका बाबाने गोपाळरावांच्या आत्म्याला बंधनात बांधले असुन गोपाळरावांचा मृत्यु त्याच बाबाने पाठवलेल्या एका खविसामुळे झाला असल्याचे सांगितले. तसेच गोपाळरावांच्या मुक्तीसाठी त्या बाबाची गाठ घ्यावी लागेल असेही सांगितले. हे सर्व समजताच भगवानदासांनी आपला विश्वासु नोकर महादेवसह मुंबई गाठली. गोपाळरावांच्या मृतदेहाचा पंचनामा ज्या इन्स्पेक्टरने केला होता त्याला पैसे दाबून गोपाळरावांचा मृतदेह ज्या लॉजमधुन हस्तगत केला होता त्या लॉजचा पत्ता मिळवला. नंतर इन्स्पेक्टरला सोबत घेऊन लॉजवर चौकशी केली असता त्यात गोपाळरावांना भेटायला सतत एक व्यक्ती येत असल्याचे समजले. CCTV Footage तपासल्यावर त्यात गोपाळरावांसोबत असलेल्या व्यक्तीला त्या लॉजमधे काम करणाऱ्या एका रुमबॉयने ओळखले.

CCTV Footage मधे दिसणाऱ्या व्यक्तीच्या फोटो कॉपीज सर्व पोलीस ठाण्यात पाठवण्यात आल्या. भगवानदासांना त्या व्यक्तीला कुठे तरी पाहिल्यासारखे वाटले. बराच वेळ आठवायचा प्रयत्न करत असताना अचानक ते उद्गारले, ‘अरे हा! हा माणुस तर आपल्या दुकानात येऊन गेलाय, गोपाळची चौकशी करायला आला होता आणि त्याने आपण गोपाळचा शाळेतील जुना मित्र असल्याचे सांगितले होते’. ही लिंक लागताच गोपाळराव आपल्या मेंदुला ताण देत विचार करू लागले की कोण बरं असावा हा! खुप उशीर झाल्याने त्यांनी त्याच लॉजमध्ये रात्र काढायचा विचार केला. रात्रभर ते विचार करत होते पण त्या व्यक्तीचे नाव काही केल्या त्यांना आठवेना. सकाळी सवयीने ते लवकरच उठले प्रार्तविधी उरकुन चहा घेत असताना त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली हा सात्विक तर नव्हे.