प्रतिशोध

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० ऑगस्ट २०१५

प्रतिशोध - मराठी कथा | Pratishodh - Marathi Katha

प्रतिशोध ही कथा केदार कुबडे यांच्या सुड या कथेचा दुसरा भाग आहे.
आपल्या मुलाचा विश्वासघाताने खून करवणाऱ्या त्याच्या मित्राचा, आपल्या मुलाच्या आत्म्याला साहाय्य करुन सुड घेणाऱ्या भगवानदासांची कहाणी म्हणजेच प्रतिशोध.

आपल्या पंचविशीतील एकुलत्या एक मुलाचा मृत्यु तोही हृदयविकाराच्या झटक्याने व्हावा हे जरी पोस्टमॉर्टम चा रिपोर्ट सांगत असला तरी भगवानदासांच्या काळजाला ते पटणे अशक्य होते.

गोपाळरावांच्या मृत्युची बातमी भगवानदास आणि कुटुंबियांना आंतर्बाह्य हलवून गेली. कितीही बिघडला तरी आपले संस्कार आपल्या मुलाला एक ना एक दिवस योग्य मार्गावर आणतील अशी भगवानदासांना खात्री होती पण गोपाळरावांच्या मृत्युच्या बातमीने त्यांच्या या विश्वासालाच सुरुंग लागला होता. भगवानदासांच्या खापर पणजोबांपासून सर्वजण दिर्घायुष्य भोगुन गेले होते त्यामुळे आपल्या पंचविशीतील एकुलत्या एक मुलाचा मृत्यु तोही हृदयविकाराच्या झटक्याने व्हावा हे जरी पोस्टमॉर्टम चा रिपोर्ट सांगत असला तरी भगवानदासांच्या काळजाला ते पटणे अशक्य होते. कुठे तरी पाणी मुरतंय हे त्यांचे मन ओरडून ओरडून सांगत होते.

इकडे गोपाळरावांच्या पत्नीची अवस्था तर फार बिकट झाली होती. पतिच्या मृत्युवर रडावं की नियतीच्या क्रुर चेष्टेवर हसावं हेच तिला कळत नव्हतं. तिच्या पदरात तीन वर्षांचा लहानगा रोहित आणि सगळ्या जवाबदाऱ्या टाकून तिचा नवरा निघुन गेला होता. ज्या मुलीने संसाराची रंगीबेरंगी आणि मखमली स्वप्न पहायची तिच्या नशीबात विधवेची बेरंगी साडी यावी याहुन दुसरा दैवदुर्विलास तो कोणता? शुन्यात नजर लावून बसलेल्या आपल्या पांढऱ्या कपाळाच्या सुनेला पाहीले की भगवानदासांना कोणीतरी सणसणीत चपराक लगावल्यासारखे वाटे. जणू तिची ती भकास नजर ओरडून ओरडून सांगतेय की, “तुम्ही मारलत माझ्या नवऱ्याला, वडीलकीच्या नात्याने त्यांना वाऱ्यावर न सोडता योग्य मार्गावर आणले असतेत तर आज हा दिवस पहावा लागला नसता”.

गोपाळरावांच्या अंत्ययात्रेला सारा गाव लोटला होता. लोक भगवानदासांच्या तरण्या ताठया मुलाच्या अकाली मृत्युमुळे खुप हळहळत होते. त्यांना सहानुभुती देत होते. भगवानदासांनी भरल्या डोळ्यांनी गोपाळरावांच्या चितेला भडाग्नि दिला. मुलाने त्यांना अग्नी देण्याऐवजी, आपल्याच मुलाला अग्नी देणे त्यांच्या नाशिबी आले होते. आज त्यांच्याएवढा दुर्दैवी बाप जगात दुसरा कोणीही नव्हता. पिंडाला काही केल्या कावळा शिवेना. गोपाळरावांच्या आवडत्या वस्तु ठेवल्या, तुझ्या बायको मुलाचा सांभाळ करू, त्यांना अंतर देणार नाही, हे ही सांगुन झाले पण व्यर्थ. वाट पाहुन सर्वच वैतागले, शेवटी दर्भाचा कावळा करुन पिंडाला शिववला. घरातील सुतकी वातावरण जीव नकोसा करुन टाकत होते, पण कोणाच्या जाण्याने आयुष्य थोडेच थांबते? नाशिबाला दोष देत सुन आणि सासरे छोट्या रोहितकडे पाहुन गोपाळरावांच्या आठवणींसोबत आयुष्य कंठायच्या तयारीला लागले.

काही महिने गेल्यावर सर्वजण थोडे सावरतात तोच एक दिवस दुपारी रोहितच्या खोलीतून हसण्या खिदळण्याचे आवाज ऐकुन गोपाळरावांच्या पत्नी राधाबाई बेडरूमच्या दारातून आत डोकावल्या आणि जागीच थबकल्या. रोहित हवेत अधांतरीच वर खाली होत होता जणू कोणी त्याचे हात धरले होते आणि पाठीवर झोपुन त्याला आपल्या पायांवर उभे करुन हवेत उडवत होते. रोहितचे असे हवेत तरंगणे पाहुन राधाबाई मोठ्याने ओरडल्या, “रोहित”! त्याबरोबर रोहितचे हवेत वर खाली होणे थांबले आणि तो धावत जाऊन आईला बिलगला. त्याला पटकन उचलुन घेऊन राधाबाई किचनमध्ये पळाल्या. रोहितवरून मीठ मोहरी काढुन त्याला छातीशी धरून त्या बाहेरच्या खोलीत आल्या. झाल्या प्रकाराने त्या खुप घाबरल्या होत्या. रोहितच्या काळजीने त्या माऊलीचा जीव बेचैन झाला होता. सोफ्यावर बसवुन त्यांनी रोहितला कोणाशी खेळत होतास असे विचारल्यावर तो म्हणाला, “पप्पांशी”! तशी एक थंड शिरशिरी तिच्या पुर्ण शरीरातून दौडत गेली.