प्रतिक्षा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ फेब्रुवारी २०१८

प्रतिक्षा - मराठी कथा | Pratiksha - Marathi Katha - Page 6

हास्याची जागा आता आक्रोशाने घेतली. मंद प्रकाशात शिवाप्पाची डेड बॉडी रस्त्यावर आणण्यात आली. त्याला शेवटची आंघोळ घालण्यात आली. तिरडी बांधली गेली. जेथे काही वेळापूर्वी मंत्र्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला त्याच परिसरात एका मृतदेहाला फुले वाहून अखेरचा निरोप देण्यात आला. बाया बाप्यानी एकच आक्रोश केला. त्या आक्रोशाने समाजसेवी वसंतराव यांचे मन पुतळ्याच्या रूपाने हेलावून गेले. ‘रामनाम सत्य हे’ असे म्हणत तांड्यातील मोजक्याच लोकांनी शिवाप्पाला खांदा दिला. पहाट होताच दुःख सागरात लोटलेला तांडा सारे दुःख विसरण्याचा प्रयत्न करून पुढच्या प्रवासाला निघाला.

दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात सभेची फोटोसह लांबलचक बातमी आली. मंत्री महोदयांनी केलेल्या शाब्दिक कोट्या त्याला मिळालेली दाद याच्या चौकटी होत्या. मात्र शिवाप्पाच्या मृत्यूची चौकट त्यात नव्हती. तांड्यातील मृताच्या बाबतीत एकाही ओळीचा उल्लेख न्हवता. माणसं वर्तमानपत्र वाचीत होती. आपण फोटोत कुठं दिसतो का पहात होती. सभा किती छान झाली याचे रसभरीत वर्णन केले गेले होते. मात्र त्याच ठिकाणची दुसरी घटना मात्र सर्वजण विसरले होते. त्याची कल्पना देखील बहुतेक जणांना न्हवती. तांड्यातील लोक मात्र शिवाप्पाच्या मृत्यूचे दुःख मनाशी बाळगून पोट भरण्यासाठी फिरतच होते.

त्यांच्या दृष्टीने मंत्र्याची सभा गौण होती. शिवाप्पाच्या मृत्यू मात्र त्यांच्या मनाला चटका लावून जाणारा होता. बघता बघता म्हातारा मरण पावला होता. त्याच्या मृत्यूची ना कोणी पोलिसात वर्दी दिली ना कोणी त्याच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिले. नेहमीप्रमाणे सामान्यांचा आवाज दबूनच गेला. फुले, गुलाल रस्त्यावरच होता. तो मंत्र्यांचा स्वागताचा होता की शिवाप्पाच्या अंत्ययात्रेचा होता हे मात्र कोणालाही कळले नाही.