प्रतिक्षा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ फेब्रुवारी २०१८

प्रतिक्षा - मराठी कथा | Pratiksha - Marathi Katha - Page 4

मात्र बापय गडी समदेच पिले असल्याने त्याचं ओरडणे कोणाला ऐकू गेलं नाही. बायांनी त्याची अवस्था पहिली पण गर्दीतून त्याला वाट काढत हॉस्पिटलला नेणे शक्य न्हवते. उपचाराआभावी म्हातारं शिवाप्पा जागीच मरण पावला. कुटूंबातील प्रमुखच गेल्याने सर्वजण हताश झाले. बायका तर धाय मोकलून रडू लागल्या मात्र स्पीकरच्या आवाजात त्यांचा आवाज दबला गेला. त्यांनी बापय गडयांची झिंग उतरवली. दारूचा हा प्रकार काही त्यांना नवीन न्हवता. शिवाप्पाच्या मरणाची बातमी त्यांनी बाप्यांना सांगितली. बाप्यांना पण कळंना असं कसं झालं. त्यांनी अंत्यसंस्काराची तयारी करण्यास सुरुवात केली. तिरडीचे साहित्य जमा केले. शिवाप्पाला शेवटची आंघोळ घालण्याची व्यवस्था केली. टोपलीतील राहिलेली गुलाबाची फुले कोणाचं लक्ष नाही असे पाहून काढून घेतली.

सभेसाठी तुडूंब गर्दी असल्याने सारेजण सभा संपण्याची वाट पहात बसले होते. म्हातारा कसा चांगला होता हे आठवत सारेजण बसले होते. इकडे प्रमुख वक्ते असणाऱ्या मंत्री महोदयांचे आगमन झाले. नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी तासभर उशीर केला. विरोधी पक्षावर टीकेची झोड उठवली. शाब्दिक कोट्या करून सर्वाना हसवून ठेवले. मंत्री म्हणाले, ‘लोकहो काय नाही केलं आम्ही तुमच्यासाठी. गावाचा विकास साधला. तुमच्या हाताला काम दिले. जेष्ठ समाजसेवक वसंतराव यांच्या मागणीप्रमाणे गावात संपूर्ण दारूबंदी केली. बायकांचं कुंकू शाबूत राखले. पूर्वी या गावात दारू पिऊन माणसं मरत हुती. आता ते थांबलं.’

पुतळ्याचा परिसर हास्यसागरात बुडून गेला. शिवाप्पाचे कुटूंबीय मात्र दुःख सागरात होते. त्यांना शोक आवरत न्हवता. मंत्री महोदय भाषण आटोपते घेईनात त्यामुळे त्यांना ते शिव्यांची लाखोली वहात होते. एकाने जाऊन संयोजकांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्याने ऐकले न एकल्यासारखे केले अन्‌ विषय सोडून दिला. डोळ्यात प्राण आणून सभा संपण्याची ते आतुरतेने वाट पहात होते. अखेर त्यांचे भाषण संपले.

सभा संपल्याने गाड्यांचा ताफा निघून गेला. कार्यकर्त्यांसह सर्वजण घराकडे जाण्याच्या गडबडीत होते. स्पीकर बंद झाला. मोठे लाईट बंद झाले. प्रकाश अंधुक झाला. विजेच्या दिव्यांची जागा आता चंद्राच्या प्रकाशाने घेतली. वातावरणात पूर्णतः बदल झाला होता. पौर्णिमेचा बदल अचानक अमावस्येत झाला.