प्रतिक्षा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ फेब्रुवारी २०१८

प्रतिक्षा - मराठी कथा | Pratiksha - Marathi Katha - Page 3

कामासाठी गेलेली मंडळी आता परतली होती. त्यांना शिवाप्पाने येताना जेवणापूर्वीची व्यवस्था करून येण्यास बजावले होते. त्यामुळे सर्व तयारीनिशी बापय आले होते. त्यांना वातावरणातील बदल जाणवला. सभेला माणसं जमण्यासाठी स्पीकरवर त्या मंत्र्यांचे गेल्या निवडणुकीतले भाषण लावून ठेवले होते. ते ऐकत काही मंडळी तंबाखूचा बार भरत होती. त्या मंत्र्याच्या भाषणाला हसत हुती. दिलेले एकही आश्वासन पूर्ण झालेले न्हवते. सभेचे भाषण म्हणजे करमणूक असल्याने बाप्यानी लवकर येऊन जागा धरल्या होत्या.

इकडे तांड्यातील बायांनी स्वयंपाक करण्यास सुरुवात केली. वीस एक भाकऱ्या बडवल्या. मोठं पातेले भातासाठी ठेवले. माशाचं झणझणीत कालवण केले. शिवाप्पासह बापय गड्यांनी पिण्याचा कार्यक्रम उरकला. जेवणापूर्वी खच्चून दारू ढोसली. दरम्यान स्पीकरवर गाणी सुरू झाली. गाण्यावर पोरांनी ताल धरला. इकडं दारूच्या नशेत त्यांनी देखील ताल धरला. माणसं लई जमा झाली तर आपल्याला हाकलून लावतील या भीतीने तांड्यातील मंडळींनी भराभर जेवून घेतले. झोपेचं सोंग घेऊन ती पडून राहिली. त्यांचं सारं लक्ष सभेकडे असल्याने झोप काही कोणाला येत न्हवती.

सभेला सुरवात झाली. हार - तुरे झाले. गुलाबाची राहिलेली फुले एका कार्यकर्त्याने टोपलीत भरून ती कोपऱ्यात आणून ठेवली. एकेका वक्त्याला बोलायला जोर चढू लागला. सभेत काय थापाच मारायच्या होत्या अन्‌ त्यात ही मंडळी तरबेज होती. शिवाप्पा भाषण ऐकत ऐकत डोळ्याला डोळा लावण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र त्याला दारूची नशा चांगलीच चढली होती. कसंतरी होऊ लागल्यानं म्हातारं सर्वांना हाक मारू लागलं. ‘आरं ये, मला काय पाजलंय’ असं सारखं म्हणू लागलं. ‘झोपा गप’ म्हणून त्याला बायांनी दटावलं. त्यांनी जी दारू ढोसली होती ती बनावट होती. म्हाताऱ्याला हृदय विकाराचा झटका आला होता. ते तडफडत हुतं.