प्रतिक्षा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ फेब्रुवारी २०१८

प्रतिक्षा - मराठी कथा | Pratiksha - Marathi Katha - Page 2

निवडणुकीचा हंगाम असला की येथील वातावरण आणखीनच बदलून जाई. रात्री जाहीर सभांच्या गराड्यात हा परिसर वेढलेला असे. लोकांचा हा करमणुकीचा जणू काही अड्डाच होता. गावात आज अशीच एका प्रमुख पक्षाची प्रचाराची जाहीर सभा होती. सकाळपासूनच कार्यकर्ते ये - जा करीत होते. एका मोठ्या मंत्र्याचे गावात आगमन होणार होते. मार्गदर्शनाची ती सभा होती. त्याची सर्वत्र पोस्टर झळकत होती. सभा रात्री असली तरी सकाळीच परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यात आला होता.

त्याच दिवशी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दहा जणांचा एक तांडा पुतळ्याजवळ आसरा घेण्यासाठी आला. सुरवातीला कार्यकर्त्यांनी त्यांना हटकले. मात्र म्होरक्याने गयावया करून कशी तरी रात्री तेथे मुक्कामाची सोय करून घेतली. दहा माणसांची सभेला भर पडेल या अपेक्षेने त्यांना परवानगी देण्यात आली. त्या मंडळींनी पुतळ्याच्या आडोशालाच पाल उभी केली. मोकळ्या जागेत त्यांनी आपले बस्तान बसवले. त्या ताड्यांत शिवाप्पा नावाचा ७० वर्षे वयाचा एक म्होरक्या होता. त्याचा शब्द हा प्रमाणभूत होता. त्याच्यासह सहा बापय व चार बाया तांड्यात होत्या. बायांनी तेथेच दगडाची चूल मांडून स्वयंपाकाची व्यवस्था केली. बापय गड्यानी गावात जाऊन सामान आणले. दुपारचं जेवण केलं अन्‌ समधी माणसं आपापल्या कामासाठी निघून गेली. शिवाप्पा वयोवृद्ध असल्याने तो एकटाच पुतळ्याच्या बगलला विश्रांती घेत पडला होता.

पाच वाजण्याच्या सुमारास ज्या पक्षाची जाहीर सभा होती त्या पक्षाचे कार्यकर्ते सभेची व्यवस्था करण्यासाठी तेथे आले. त्यांनी सभेचे व्यासपीठ सजवले. फुलांच्या माळा लावल्या. गुलाबाच्या फुलांची टोपली आणली. दोन्ही बाजूला दोन मोठे स्पीकर लावले. कटाऊट उभारले. खुर्च्या मांडल्या. सभा रात्री नऊ वाजता होती. ज्या जागेत कष्टकरी तांड्याने मुक्काम केला होता तेथे अंधाराचे साम्राज्य होते. उर्वरित भाग मात्र दिव्याच्या लख्ख प्रकाशाने उजळून निघाला होता.