प्रतिक्षा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ फेब्रुवारी २०१८

प्रतिक्षा - मराठी कथा | Pratiksha - Marathi Katha

तालुक्याचे एक प्रमुख ठिकाण म्हणून अनंतनगरची फार पूर्वीपासूनची ओळख होती. गावचा उंबरा साडेतीन हजार घरांचा. हिरव्यागार गर्द वनश्रीने नटलेला हा परिसर होता. शहरात प्रवेश केला की त्याचे सर्वांनाच प्रत्यंतर येत असे. गावापासून काही अंतरावर विस्तारलेले नदीचे पात्र. नदी नेहमीच दुथडी भरून वाहणारी. सकाळी गावातील पोरं व बापय पोहण्यासाठी नदीवर त्याचवेळी बायांची कापडं धुण्यासाठी गर्दी झालेली. थोडयाच अंतरावर गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी मोठी बाजारपेठ. शहराचे रूप पालटण्यासाठी अविरत कष्ट घेणाऱ्या कै. वसंतराव गोखले यांचा पूर्णाकृती पुतळा. त्यांच्या योगदानाचा विचार करून पुतळ्याचा परिसर पालिकेने सुशोभित केलेला होता.

पुतळ्याजवळ पालिकेने सार्वजनिक सभेसाठी एक कायमस्वरूपी तयार केलेले व्यासपीठ होते. त्याचा मुक्त वापर केला जात होता. निवडणूक सभा, श्रद्धांजली सभा, गौरव सभा सारे एकाच ठिकाणी. गावात तमाशाचा फड आला तरी त्यांच्यातील जुगलबंदी येथेच चालत असे. भजनी मंडळाच्या भजनाचा ताल येथेच धरला जात असे. त्यामुळे या परिसरात नेहमीचीच धावपळ अन्‌ गडबड.

विविध राजकीय पक्षांच्या जाहीर सभा घेण्याचे हे एकमेव ठिकाण होते. गावातली मंडळी शेतातच दिवसभर काबाडकष्ट करणारी त्यामुळे कार्यक्रमांची वेळ शक्यतो रात्रीचीच असे. सततचा वर्दळीचा भाग असल्याने पालिकेने मोठ्या दिव्यांची रचना केलेली होती. त्यामुळे रात्री देखील हा परिसर शांततेचा भंग करणारा ठरत होता. लोकांच्या चर्चेत असलेला भाग त्यामुळे येथे सतत काही न काही नवीन घडत असे.

पुतळ्याच्या एका बाजूला मोकळी जागा असल्याने सततची भटकंती करणाऱ्या लोकांच्या आसऱ्याचे जणू काही हे हक्काचे ठिकाणच होते. दिवसभर वणवण भटकायचं अन्‌ रात्री निवाऱ्याला येथे यायचे हा जणू प्रघातच होता. भटक्या लोकांचा एक दोन दिवसांचा मुक्काम असल्याने त्यांना कोणी येथून हटकत नसे.