मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ५

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ५ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 5 - Marathi Katha - Page 4

सर्व आत्मे मुक्त झाल्याची खात्री पटताच श्रीनिवासने आपल्या हातातील भाल्याला एक जोराचा झटका दिला आणि गोठलेल्या कनिष्कच्या देहाचे शेकडो तुकडे बाथरूमच्या फरशीवर इतस्त: विखुरले. पण अजूनही कार्य पुर्ण झाले नव्हते. अमावस्या सुरु व्हायला फक्त दोन मिनिटे बाकी होती. बाथरूमच्या फरशीवर आधीच अंथरलेल्या प्लॅस्टीकच्या शीटमध्ये कनिष्कच्या शरीराचे झालेले तुकडे त्याने गुंडाळले आणि बाहेर धावला. त्यासरशी त्याची असिस्टंट 'दिव्या कुलकर्णी' त्या आरशाच्या मागे गेली आणि आत्म्याच्या जगाशी संपर्क स्थापित करणारा दरवाजा उघडण्यासाठी तिने मंत्र म्हटला.

कनिष्कच्या देहाची परत जुळण्याची सुतराम शक्यताही उरू नये म्हणुन त्याच्या तुकड्यांनी भरलेली ती शीट श्रीनिवासने त्या आरशातून आत फेकून दिली. पाठोपाठ दिव्याने तो दरवाजा बंद होण्याचा मंत्र म्हटला आणि तो दरवाजा बंद होताच क्षणी अमोलने तो भाला त्या आरशावर नेम धरून फेकला. पण त्या आरशावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ते पाहून श्रीनिवासला आपल्या पूर्वजांनी राजा यशवर्धनाला सांगितलेले वाक्य आठवले आणि तो ओरडला, “अमोल, हा आरसा तुझ्या हातून नष्ट नाही होणार, त्यासाठी एक राजाध्यक्षच पाहिजे.”

एवढे बोलून त्याने जमीनीवर पडलेला तो भाला उचलला आणि संपुर्ण ताकदीनिशी त्या आरशामध्ये घुसवला. त्यासरशी मोठा आवाज करत त्या आरशाची काच तडकली आणि तिचे तुकडे खळाळत जमीनीवर कोसळले. ते पाहताच श्रीनिवासने ते सर्व तुकडे लागलीच गोळा करून एका मोठ्या बॉक्स मध्ये बंद करून त्यावर सुरक्षेसाठी मंतरलेला धागा बांधला आणि जमीनीत खोलवर पुरण्यासाठी जयेशच्या ताब्यात दिला व समाधानाचा निश्वास सोडला.

श्रीनिवास मुळे आपल्या मागचे शुक्लकाष्ट आता पूर्णपणे नाहीसे झाले आहे याची खात्री पटताच प्रियाच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. तिने धावत जाऊन कृतज्ञतेने श्रीनिवासचे पाय धरले. श्रीनिवासने तिला उठवले आणि म्हणाला, “अगं माझ्या कसले पाया पडतेस? तुझ्या मदतीशिवाय मी हे अवघड कार्य कधीच करू शकलो नसतो. कितीतरी स्त्रियांच्या आत्म्यांनी तुला आशीर्वाद दिले असतील. प्रिया मॅडम! आता परत असला आरसा वगैरे आला तर मंत्र वगैरे म्हणु नका बरं, नाहीतर कनिष्कपेक्षा कोणीतरी भयानक आत्मा या जगात यायचा आणि आमची सगळ्यांचीच पळता भुई थोडी व्हायची, काय?” असे श्रीनिवास म्हणताच प्रिया ओशाळली आणि सर्वजण हसण्यात सामील झाले.

अशा तर्हेने आपल्या पूर्वजांनी अर्धवट सोडलेले कार्य श्रीनिवास राजाध्यक्षने आपली अक्कल हुशारी तसेच आध्यात्मिक व टेक्निकल नॉलेजच्या बळावर पुर्ण केले. प्रिया सरदेशमुख व शेकडो वर्षे बंदिवासात असलेल्या राजस्त्रियांच्या आत्म्याची मुक्तता केल्यावर श्रीनिवास राजाध्यक्ष एक नवा अनुभव गाठीशी बांधुन आपल्या सहकाऱ्यांसमवेत तिथून मार्गस्थ झाला. जाता जाता तो प्रियाला नवी उमेद, नवे स्वप्न, नवे उद्दिष्ट आणि जगण्यासाठी नवी प्रेरणा देऊन गेला. हळूहळू प्रिया शारीरिक आणि मानसिक दृष्टीने पूर्ववत झाली. पुढे तीने श्रीनिवासच्या घोस्ट हंटर ग्रुपमध्ये आणि त्याच्या हृदयात देखील आपले स्थान पक्के केले व सौ. प्रिया श्रीनिवास राजाध्यक्ष बनली. अमोलही आपला पिढीजात व्यवसाय, आपले घर, आई, बायको आणि दोन्ही जुळ्या मुलांना उत्तम रीतीने सांभाळू लागला.

जुन्या वस्तु, वास्तु वगैरे खरेदी करण्यापूर्वी त्यांचा पुर्वातिहास जाणणे किती गरजेचे आहे हे वाचकांच्या एव्हाना लक्षात आले असेलच. आपण सर्वाना कथा आवडली असावी अशी आशा करतो आणि एक अल्पविराम घेतो पुढच्या खिळवून ठेवणाऱ्या कथेसाठी...

शुभं भवतु...!


मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - कथेचे सर्व भाग