मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ५

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ५ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 5 - Marathi Katha - Page 3

इकडे वाड्यातून बाहेर पडलेला कनिष्क, अमोलने प्रियाला बाहेर आणण्याची वाट पाहत होता. जसे ते बाहेर आले तसे त्याने प्रियाला वश करण्यासाठी सूक्ष्म रूप धारण केले आणि तिच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अमोलची दूरदृष्टी आणि समयसूचकता उपयोगी पडली. त्याने गोपाळच्या गळ्यातून खाली पडलेली रुद्राक्षांची माळ प्रियाच्या गळ्यात घातली होती त्यामुळे एखादा शॉक बसावा तसे कनिष्कला झाले आणि तो चरफडत प्रियापासून दूर झाला.

रमेशने अमोलची गाडी वेगाने बंगल्याच्या दिशेने दामटली. वाटेत कनिष्कने त्यांचा रस्ता अडवण्यासाठी नाना प्रयत्न केले पण त्यावर मात करत रमेशने मोठ्या शिताफीने गाडी बंगल्यापर्यंत आणली. अमोल प्रियाला घेऊन घाईघाईत बंगल्यात शिरला पाठोपाठ रमेश आणि जयेशही शिरले आणि कनिष्क तिथे येऊन धडकला. श्रीनिवासला कनिष्कला संपवण्यासाठी प्रियाची मदत लागणार होती त्यासाठी कनिष्कला काही काळ थोपवून धरणे आवश्यक होते म्हणूनच त्याने ते सुरक्षाचक्र बनवले होते आणि त्या सुरक्षाचक्राने त्याचे काम चोख बजावले होते.

बंगल्यात कुठूनही प्रवेश करता येत नसल्याचे लक्षात येताच कनिष्क प्रचंड चवताळला, आणि तेच श्रीनिवासला हवे होते. संतापलेला कनिष्क अलगद आपल्या जाळयात सापडेल याची त्याला खात्री होती. त्याच्या वडीलांच्या सल्ल्याप्रमाणे त्याने कनिष्क सोबत आलेल्या इतर आत्म्यांना आधी त्या आरशातून त्यांच्या जगात परत जाण्यास भाग पडले आणि मंत्र उच्चारुन तो आरसारूपी दरवाजा बंद केला. प्रियाच्या रूममध्ये श्रीनिवासने कनिष्कच्या स्वागताची जय्यत तयारी करून ठेवली होती. आज काही झाले तरी कनिष्कचा वासनेचा खेळ कायमचा संपवायचेच असे त्याने ठरवले होते. त्यामुळे प्रियाच नव्हे तर कनिष्कच्या वासनेचे बळी जाणारे इतर अनेक दुर्दैवी स्त्रियांचे आत्मे कायमचे मुक्त होणार होते.

डॉक्टर कुलकर्णीनी प्रियाची नाडी तपासली आणि तिला काही औषधे दिली, साधारण तासाभरात प्रिया शुद्धीत आली. तिच्या शरीरात खूप अशक्तपणा होता पण ती सावरली होती. डॉक्टरांनी संमत्ती दिल्यावर श्रीनिवासने प्रियाला आपला प्लॅन समजावून सांगितला व तो पूर्णत्वास नेण्यास एकच संधी मिळणार असल्याने चुकीला जागाच नसल्याचे सांगितले. आधी प्रियाने थोडे आढेवेढे घेतले. पण प्रियाच्या मदतीने हे कनिष्क नावाचे संकट कायमचे दूर होऊ शकते असे समजावल्यावर प्रियाने उसने अवसान गोळा केले व मदत करायचे कबुल केले.

ठरल्याप्रमाणे प्रियाला आपल्या रूममध्ये एकटे सोडून श्रीनिवास व इतर सर्व जण बंगल्यातून बाहेर पडले. त्यांना जाताना पाहून कनिष्कचा आत्मा खुश झाला. आता त्याला प्रियाला आपल्यासोबत घेऊन जाता येणार होते. पण बंगल्यात शिरायचे कसे हा प्रश्न होता, तोही श्रीनिवासनेच सोडवला. बाहेर पडताना त्याने ते सुरक्षा चक्र तोडले होते त्यामुळे कनिष्कचा बंगल्यात शिरायचा मार्ग सुकर झाला. त्याने सूक्ष्म रूपाने बंगल्यात प्रवेश केला. क्षणात तो प्रियाच्या रूममध्ये शिरला. प्रिया पलंगावर पहुडली होती. तो तिच्या जवळ गेला व दृश्य स्वरूपात आला.

त्याला पाहताच प्रियाने एक मोहक हास्य केले आणि आपले हात पसरून त्याला मिठीत घेण्यास सुचवले. कनिष्कला आश्चर्य वाटले की आपल्या पासून दूर पळणारी प्रिया आता स्वतःच आपल्याला कशी काय बोलावते आहे. कनिष्कने प्रियाला आपल्या मिठीत घेतले आणि दोघांनी धुंद प्रणय केला. प्रियाच्या प्रतिसादाने कनिष्क प्रचंड खुश झाला. आता प्रियाच्या आत्म्याला तिच्या शरीरातून मुक्त करायची वेळ जवळ आली असल्याने कनिष्कची बोटे प्रियाच्या गळ्यावर फिरू लागली.

तसे लाडाने त्याचे हात आपल्या गळ्यावरून दूर करत प्रियाने फ्रेश होण्यासाठी शॉवर घ्यायला जात असल्याचे सांगितले आणि बाथरूम मध्ये गेली. कनिष्क तिच्या पाठोपाठ बाथरूम मध्ये गेला. तो योग्य जागी पोहोचताच प्रिया चपळाईने बाजुला झाली आणि तिने शॉवर चालू केला आणि पाण्याच्या जागी लिक्विड नायट्रोजन बरसू लागला. कनिष्क दृश्य स्वरूपात असल्यामुळे लिक्विड नायट्रोजन त्याच्या अंगावर पडताच कनिष्क गोठू लागला.

प्रियाची चलाखी कनिष्कच्या लक्षात आली पण त्याला खूप उशीर झाला होता. काही सेकंदात कनिष्क जागेवरच पूर्णपणे गोठला. त्याने अदृश्य होण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. प्रियाने श्रीनिवासला काम झाल्याचे कळवले तसा ‘परकायाबंध मंत्र’ म्हणत तो बाथरूम मध्ये शिरला व त्याच्या हातातील भाला कनिष्कच्या मस्तकाला भेदत आर पार गेला. त्यासरशी कनिष्कने एक करूण किंकाळी फोडली. कनिष्कने उपभोगलेल्या स्त्रियांचे आत्मे, जे त्याने आपले गुलाम बनवले होते ते सगळे एक एक करून मुक्त झाले.

अमोलच्या पाठोपाठ आलेला कनिष्क, बंगल्याभोवतीचे सुरक्षाचक्र भेदून बंगल्यात प्रवेश करू शकत नाही. श्रीनिवास प्रिया सोबत प्लॅन करून कनिष्कला ट्रॅप करतो व भाल्याने त्याच्या मस्तकात छेद करतो. कनिष्कला पूर्णपणे नष्ट करणे श्रीनिवासला शक्य होते का? प्रिया कायमची मुक्त होते का? ते आता पुढे वाचूया.