मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ५

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ५ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 5 - Marathi Katha - Page 2

त्यावर गोपाळने परत आपली शंका काढली. “अरे चला काय? या काळोखाचे काय करणार? मला काळोखाची भीती वाटते.” “आमच्याकडे हे हेड माऊंटेड सर्च लाईट्स आहेत ना, मग अंधाराची भीती कसली?” जयेश म्हणाला. “अरे वा! तुम्ही तर फुल तयारीनेच आला आहात. बेटा गोपाळ! आज काही खरे नाही बाबा तुझे!” गोपाळच्या या उद्गारांवर सगळेच हसले. त्यामुळे वातावरणातील ताण थोडा कमी झाला. रमेश म्हणाला, “ते तर आम्हाला रहावेच लागते, केव्हा काय परिस्थिती येईल हे सांगता थोडेच येते? सश्याच्या शिकारीला जाताना वाघाच्या शिकारीच्या तयारीने जावे म्हणतात ते काही उगाच नाही.” “ससा आणि वाघाबद्दल तर माहीत नाही पण आज कनिष्क माझी शिकार मात्र नक्की करणार असे दिसतंय.” गोपाळच्या या वाक्यावर पुन्हा एकदा सर्वांमध्ये खसखस पिकली.

आम्ही सर्व आहोत ना सोबत? चल आता, जास्त बहाणे नको शोधत बसू असे म्हणुन जयेश त्याला ओढत त्या अंधाऱ्या रस्त्याकडे नेऊ लागला. त्याचवेळी जयेशच्या हातातील ई.एम.एफ रिडर वर बिप वाजू लागली आणि काही कळायच्या आत गोपाळला जोराचा धक्का बसला आणि तो हवेत उडाला त्याच्या गळ्यातली रुद्राक्षाची माळ बाजुला फेकली गेली आणि तो त्या तळघराच्या भिंतीवर आदळून जमिनीवर खाली कोसळला. त्या प्रकाराने सगळेच भांबावले. “गद्दार!” कनिष्कचा आवाज त्या तळघरात घुमला. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच गोपाळच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या आणि कनिष्कच्या आत्मा वेगाने त्या तळघरातून बाहेर निघून गेला.

जे घडले ते इतके अचानक आणि विलक्षण वेगाने घडले होते की क्षणभर कोणाला काही समजलेच नाही. दोन मिनिटांपूर्वी विनोद करणाऱ्या गोपाळचे शरीर आता केवळ रक्ता मांसाचा चिखल बनले होते. त्या प्रकाराने सर्वच हादरले. गोपाळने मस्करीत बोललेले वाक्य खरे ठरले होते. राजे उदयभान, त्यांचे संपुर्ण कुटुंब आणि वाड्यातील निरपराध नोकर चाकरांना आपल्या स्वार्थासाठी आगीच्या भक्ष्यस्थानी देणाऱ्या गोपाळला त्याच्या पापाची शिक्षा मिळाली होती. त्या तळघरात एकदम भयाण शांतता पसरली होती. इतक्यात प्रियाचा खूप क्षीण झालेला आवाज अमोलच्या कानांवर पडला आणि तो धावतच कनिष्क ज्या रस्त्याने बाहेर आला होता त्या रस्त्याने आत शिरला. पाठोपाठ जयेश आणि रमेश ही धावले. साधारण शंभर एक मीटर आत गेल्यावर त्यांना एक मोठी मोकळी जागा दिसली. तिथे त्यांना एका मोठ्या चौथऱ्यावर मरणासन्न अवस्थेत पडलेली प्रिया दिसली.

अमोलने धावत जाऊन प्रियाला सावरले. तिची अवस्था पाहून त्याचे डोळे भरले आणि त्याचवेळी संतापाने त्याच्या मुठी आवळल्या गेल्या. त्याला स्वतःचाच राग येऊ लागला. काय उपयोग आपल्या या तगड्या शरीराचा आणि ताकदीचा जर आपण आपल्या बहिणीच्या अब्रूचे रक्षण करू शकत नसू तर? कोणी मनुष्य असता तर त्याने त्याला उभा चिरला असता पण त्याची गाठ होती एका वासनांध आत्म्याशी. कनिष्कच्या अमानवीय ताकदीपुढे त्याची मानवी ताकद अगदीच तुच्छ होती.

जयेश आणि रमेश तो भाला शोधू लागले. बराच वेळ शोधूनही तो भाला त्यांना कुठेच आढळला नाही. तेव्हा "आधी प्रियाला इथून घरी घेऊन जाऊ, नंतर भाल्याचे काय ते बघू" असे म्हणुन अमोलने प्रियाला आपल्या हातांमध्ये उचलले आणि वळला तोच त्या चौथऱ्यावरील फरशी कर्कश्य आवाज करत बाजुला सरकली आणि सर्च लाईटच्या प्रकाशात त्या भाल्याचे धारधार पाते चमकले. ते पाहताच त्या तिघांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. प्रियाला उचलताना नकळत एक गुप्त कळ दाबली गेली आणि इतकी वर्ष त्या फरशीखाली आपले इप्सित साध्य करण्यासाठी वाट पाहत असलेला तो भाला दुग्गोचर झाला.

कनिष्कचा नाशास कारणीभुत ठरणारे शास्त्र तर सापडले होते पण अजून बरेच काम बाकी होते. श्रीनिवास आणि त्याचे असिस्टंट्स त्याच कामात गुंतले होते. तळघरातून प्रियाला सोबत घेऊन अमोल आणि श्रीनिवासचे दोन्ही असिस्टंट बाहेर पडताना गोपाळच्या चिंधड्या झालेल्या शरीराकडे पाहून हळहळले, पण शोक करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. भस्मसात झालेल्या त्या वाड्यातील काही अर्धवट जळलेली लाकडे गोळा करून त्यावर गोपाळचे तुकडे त्यांनी रचले आणि तिथेच त्याला भडाग्नी दिला.

ज्या वाड्याला गोपाळने आगीच्या स्वाधीन केले होते त्याच वाड्याच्या तळघरात गोपाळ सरणावर चढला होता याहून मोठा दैवदुर्विलास तो कोणता? अमावस्या सुरु व्हायची वेळ जवळ येत होती. त्यामुळे गोपाळचे कलेवर तसेच जळते सोडून ते तिथून तातडीने मार्गस्थ झाले. वाड्यातून बाहेर पडताच जयेशने श्रीनिवासला भाला मिळाला असल्याचे सांगितले, त्याबरोबर श्रीनिवासच्या चेहऱ्यावर एक हलके स्मित झळकले. त्याने कनिष्कसाठी एक सापळा रचला होता. सरदेशमुखांच्या बंगल्याभोवती त्याने एक सुरक्षा चक्र निर्माण केले होते. जेणेकरून कनिष्कला त्या बंगल्यात प्रवेश करण्यापासून रोखता यावे.

चेष्टा मस्करी करणाऱ्या गोपाळच्या शरीराच्या कनिष्क चिंधड्या करतो व तिथुन निघुन जातो. गोपाळच्या मृतदेहास भडाग्नी दिल्यावर मरणासन्न अवस्थेतील प्रियाला घेऊन अमोल व दोघे असिस्टंट भाला सोबत घेऊन अमोलच्या घराकडे निघतात. ते घरी पोहोचतात का? कनिष्कचा आत्मा नष्ट होतो का? ते आता वाचूया...