मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ५

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ५ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 5 - Marathi Katha

पुर्वार्ध: मागील भागात आपण पाहिले की, प्रियाला कनिष्कपासून कसे वाचवता येईल याचा विचार करत असताना अमोलच्या लक्षात येते की तो आरसा आपल्या घरात आल्यापासून हा सगळा त्रास सुरु झाला आहे. तो दुकानातून आरसा विकणाऱ्या माणसाचा पत्ता मिळवतो व त्याला गाठून त्याच्याकडून सर्व गुढ समजुन घेतो. डॉक्टर कुलकर्णी प्रियाला तपासून सुशीलाबाईंशी बोलत असताना अचानक क्लिनिक मधुन प्रिया गायब होते. गोपाळ आरशाचे रहस्य सर्वांसमोर उघड करतो. त्याबरोबर श्रीनिवासला सर्व गोष्टींची सांगड लागते आणि तो ते सर्वांना समजावून सांगतो. नंतर अमोल, गोपाळ आणि श्रीनिवासचे दोन सहकारी त्या वाड्याच्या दिशेने जायला निघतात. पुढे चालू...

अमोल, गोपाळ आणि ते दोन असिस्टंट त्या जळक्या वाड्यापाशी आले तेव्हा बरीच रात्र झाली होती. त्यांनी वाड्याच्या गेट मधुन आत पाय टाकताच दिवाभितांचे (वटवाघळांचे) घुत्कार वातावरणात घुमू लागले. थंडगार हवेच्या झोताने त्यांच्या अंगावरचे केस ताठ झाले. आपल्या आसपास कोणाचे तरी अस्तित्व त्यांना जाणवत होते. समोर असलेला तो भयाण वाडा आ-वासून आपल्याला गिळायचीच वाट पाहत आहे असे वाटू लागल्यामुळे गोपाळ वाड्यात जायला कचरू लागला, तसे अमोलने त्याला धीर दिला.

प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आपल्याला हे दिव्य करावेच लागेल अशी स्वतःची समजुत घालुन गोपाळ पुढे सरसावला. सोबत असलेल्या रमेश आणि जयेशनी ई.एम.एफ रिडरवर रिडिंग्स चेक केली. आजुबाजुला बर्‍याच अमानवीय शक्ती घोटाळत असल्याचे ती दर्शवत होती पण कनिष्कचा कुठेच मागमुस नव्हता. त्या जळक्या वाड्याच्या दरवाजातून अमोल आत शिरला, पाठोपाठ भीतीने गळपटलेला गोपाळ आणि त्याच्या मागे रमेश व जयेशही आत शिरले. तोच मोठा चित्कार करत वटवाघळांचा एक मोठा थवा त्यांच्या डोक्यावरून फडफडत गेला. अमोल पटकन खाली वाकला पण दचकून मागे कोसळायच्याच बेतात असलेल्या गोपाळला मागे उभ्या असलेल्या रमेशने वेळीच सावरले.

अमोलच्या म्हणण्यानुसार तळघरात जाणारा रस्ता दाखवण्यासाठी गोपाळ आता पुढे आला व सर्व त्याच्या मागे चालू लागले. जसजसे ते तळघरात जाणारा जिना उतरू लागले तसतसे ई.एम.एफ रिडर वर मिळणारे कनिष्कचे सिग्नल जास्त तीव्र होऊ लागले. रमेशने ही गोष्ट अमोलच्या निदर्शनास आणून दिली. गळ्यातील रुद्राक्ष माळा चाचपून पाहत अमोलने गोपाळला न घाबरता पुढे चालण्यास सांगितले. जिना उतरून ते चौघे तळघरात पोहोचले आणि कनिष्कचा चिडलेला आवाज त्यांच्या कानावर पडला.

आपला अंदाज खरा ठरल्याने गोपाळला आनंद झाला पण त्याच बरोबर आता पुढे काय होणार या विचाराने त्याच्या अंगावर काटा आला. अल्ट्रा व्हायोलेट किरणांचा मारा करणाऱ्या गन्स घेऊन रमेश आणि जयेश पुढे सरसावले. त्यांच्या अंदाजापेक्षा ते तळघर बरेच मोठे दिसत होते. आत शिरल्यावर त्यांना डाव्या बाजुला एक, उजव्या बाजुला एक आणि समोर एक असे तीन अंधारलेले रस्ते दिसले.

“अरे हे तळघर कसले ही तर गुहाच आहे आणि हे तीन रस्ते आत कुठवर गेले असतील देव जाणे. पूर्वीच्या लोकांना प्रत्येक गोष्ट गुंतागुंतीची करण्याची काय हौस होती कुणास ठाऊक! आता कसे शोधणार प्रियाला? आणि तो भाला पण नक्की कुठे लपवला असेल याचीही काही कल्पना नाही. त्यात भरीस भर म्हणुन इथे लाईटही नाही. काळोखात काय कप्पाळ शोधणार आपण! आणि आता तो कनिष्क पण चवताळलेला असेल. आज मी पक्का मरणार बहुतेक!” गोपाळचा त्रासिक आवाज त्या शांततेत घुमला.

त्याबरोबर अमोल म्हणाला, “कदाचित हे तिन्ही रस्ते एकमेकांशी कनेक्टेड असतील पण आपण वेगवेगळे जाण्यापेक्षा दोघा-दोघांचा ग्रुप बनवू आणि आधी या दोन रस्त्यांनी जाऊन प्रियाला शोधू. ज्या ग्रुपला प्रिया सापडेल त्याने तिला घेऊन इथेच यायचे जर का नाही सापडली तर सर्व मिळून ह्या तिसऱ्या रस्त्याने जाऊन शोधू.” “पण काही अडचण आल्यास एकमेकांशी संपर्क कसा साधणार? मोबाईलला तर रेंजच नाही” गोपाळने आपली शंका व्यक्त केली.

त्यावर रमेश म्हणाला, "त्याच्यावर पण उपाय आहे. आमच्याकडे ही अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्ह्ज प्रोड्युस आणि रिसिव्ह करणारी मशिन्स आहेत. जर काही अडचण आलीच तर यांच्यामार्फत आपण एकमेकांकडे मदतीसाठी सिग्नल पाठवू शकतो. “गुड आयडिया! चला तर मग.” असे म्हणून अमोलने गोपाळ व जयेशला डाव्या बाजुच्या रस्त्याने जाण्यास सांगितले आणि स्वतः रमेश सोबत उजव्या बाजुच्या रस्त्याने निघाला.

अमोल, गोपाळ व दोन असिस्टंट्स त्या वाड्यापाशी येतात. तळघरात गेल्यावर त्यांना तीन रस्ते दिसतात. दोन दोनच्या ग्रुपमध्ये ते प्रियाला शोधायला निघतात. प्रिया सापडते का? कनिष्कचे काय होते ते ते आता वाचूया...