मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ४

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २४ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ४ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 4 - Marathi Katha - Page 5

त्याच्याकडुन मला समजले की त्या वाड्याच्या तळघरात एक भाला लपवला आहे. राजाध्यक्षांकडून त्या आरश्याची सुरक्षा काढून घेतल्यावर, त्या वेळेच्या राजाच्या पत्नीला विचित्र स्वप्ने पडू लागली तिचे सतत गर्भपात होऊ लागले. तेव्हा एका प्रचंड तपोबल असलेल्या ऋषींनी राणीच्या त्रासाचे कारण आरश्यात कैद असलेला आत्मा असल्याचे सांगितले. तेव्हा राजाने त्या आत्म्याचा पुरता बंदोबस्त करण्याची विनंती केली. त्या ऋषींनी तो आरसा महालातील एका खोलीत बंद करून टाकला. त्या खोली पुरतीच त्या आत्म्याची ताकद मर्यादित राहील असा उपाय केला. आपल्या मंत्र सामर्थ्याने त्यांनी एक दिव्य भाला निर्माण केला आणि राजाला दिला.

ते म्हणाले, “राजन, जोपर्यंत हा आरसा या खोलीत बंद आहे तोपर्यंत काही भीती नाही. पण जर का या आरश्यात बंदिस्त असलेला आत्मा भविष्यात बाहेर आला तर त्याला नष्ट करण्यासाठी हा भाला मी तुला देत आहे. हा भाला त्या आत्म्याला तेव्हाच नष्ट करू शकेल जेव्हा तो आत्मा दृश्य स्वरूपात येईल.” राजाने ऋषींना त्या आत्म्याला तेव्हाच नष्ट करण्यास विनंती केली. “त्यासाठी त्या आत्म्याला आरश्यातुन मुक्त करावे लागेल आणि कदाचित तसे करणे म्हणजे विषाची परीक्षा घेणे ठरेल. त्यामुळे तसे करण्याऐवजी हा आरसा कायम या खोलीत बंद राहील आणि त्याच्यापर्यंत कोणीही जाऊ शकणार नाही अशी व्यवस्था कर. म्हणजे भविष्यात काही अडचण येणार नाही.” असे म्हणुन ते ऋषी निघुन गेले.

राणीला होणार त्रास बंद झाला आणि तिला मुलगा देखील झाला त्यामुळे राजाला वाटले की आता काही चिंता करायची गरज नाही आणि त्याने तो भाला तळघरात एका गुप्त जागी लपवला. बाकीचा महाल काळाच्या ओघात ढासळून गेला आता फक्त हा वाडा तेवढाच उरला होता. आता तोही पार जळुन गेला आणि तो आरसा पण गायब झालाय. म्हणजे खरे संकट आता येऊ घातले आहे.

“तो मला म्हणाला, की त्याचे आणि माझे नशीब म्हणुन त्या आगीतुन आम्ही वाचलो आता परत त्या वाड्याकडे जाऊ नकोस म्हणुन सल्ला पण दिला. आणि माझी खात्री आहे की तो आत्मा त्या मुलीला घेऊन त्या वाड्याच्या तळघरातच गेला असणार. जेणेकरून त्याला कोणी शोधू शकणार नाही आणि तो आपले काम बिनबोभाट करू शकेल. आपल्याला घाई करणे आवश्यक आहे. चला मी तुम्हाला तिथे घेऊन चलतो. तेवढेच माझ्या पापाचे प्रायश्चित्त.”

राजाध्यक्षांकडून आरशाची सुरक्षा काढून घेतल्यावर त्यावेळच्या राजाच्या राणीला त्रास होऊ लागतो, एक सिद्ध ऋषी त्या आरशाला एका खोलीत बंद करून टाकतात व कनिष्कला नष्ट करण्यासाठी एक दिव्य भाला निर्माण करतात. कनिष्क प्रियाला त्या वाड्याच्या तळघरात घेऊन गेला असावा अशी शक्यता गोपाळ वर्तवतो.