मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ४

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २४ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ४ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 4 - Marathi Katha - Page 4

“...मी मागे वळलो आणि बॅटरीच्या उजेडात त्या खोलीत चौफेर नजर फिरवली पण कोणीच दिसले नाही. मला भास झाला असावा असे समजून मी दरवाज्याच्या दिशेने वळणार एवढ्यात परत माझ्या नावाची हाक ऐकु आली. आरश्याच्या दिशेने आवाज आल्याने बॅटरीचा झोत मी आरश्याच्या दिशेने फिरवला तर पुन्हा तोच भयानक चेहरा दिसला. तोच मला हाक मारत होता. मी भीतीने पुरता गारठलो होतो. तिथुन पळून जाणार एवढ्यात त्याने मला पुन्हा हाक मारली आणि आपल्या जवळ बोलावले. भीत भीतच मी त्याच्या जवळ गेलो. त्याने मला सांगितले की त्याला शेकडो वर्षे त्या आरश्यात कैद केले होते आणि त्याला तिथुन बाहेर पडायचे होते. त्यासाठी एका कुमारिकेची गरज होती जीला त्या आरशामागे लिहिलेला संस्कृत मधील मंत्र वाचता येईल. आणि जर का मी त्याला त्या आरशातून मुक्त होण्यासाठी मदत केली तर तो मी जे मागेन ते मला देईल...”

“...मला वाटले की तो अल्लादिनच्या गोष्टीतल्या जीनसारखा एखादा जीन वगैरे असावा. तो मला मालामाल करेल म्हणून मी तयार झालो. संस्कृत वाचता येणारी एखादी कुमारी त्या खोलीत घेऊन येणे जरा कठीणच होते त्यामुळे मी काय करावे असा विचार करत होतो. इतक्यात त्यानेच मला सुचवले की दुसऱ्या दिवशी जेव्हा उदयभान राजे आपल्या परिवारासह परत येतील तेव्हा रात्री सगळे झोपल्यावर मी वाड्याला आग लावावी त्यात सर्व जळुन मरतील, मग मी त्या कुमारिकेला वाड्यावर घेऊन यावे आणि तिच्याकडून आरशामागील मंत्र म्हणवून घ्यावा आणि पुढचे तो पाहुन घेईल...”

“...कर्मधर्म संयोगाने एके दिवशी तुमच्या दुकानासमोरून जाताना मला एक मुलगी संस्कृत मध्ये स्तोत्र म्हणत दुकानात देवाच्या फोटोसमोर उदबत्ती लावताना दिसली आणि माझा शोध संपला. ठरल्याप्रमाणे मी रात्री वाड्याला आग लावली त्यात राजे उदयभान त्यांचा परिवार आणि सर्व नोकर चाकर जळुन मरून गेले. दुसऱ्या दिवशी मी त्या मुलीला वाड्यात आणुन तिच्याकडुन तो मंत्र म्हणवून घेऊन त्या जिनची मुक्ती करून घ्यावी या इराद्याने जेव्हा सरदेशमुखांच्या दुकानात आलो तेव्हा मला ती मुलगी दिसली नाही पण अमोल सरदेशमुख भेटले. बोलता बोलता माझी नजर त्यांच्या मागे असलेल्या एका फोटो फ्रेमवर गेली जिच्यात अमोल सरदेशमुख, ती मुलगी आणि एक वयस्क जोडपे होते...”

“...त्यांना संशय येऊ नये म्हणुन मी त्या मुलीबद्दल काही विचारले नाही. प्रत्यक्षात आणि फोटोतही त्या मुलीच्या गळ्यात मला मंगळसुत्र आढळले नव्हते. त्यामुळे ती कुमारिका असावी तसेच चेहेऱ्यातील साम्यामुळे ती त्यांची बहीण असावी असा मी अंदाज बांधला. त्यांचे जुन्या वस्तुंचे खरेदी विक्रीचे दुकान असल्यामुळे तो आरसा तिच्यापर्यंत पोहोचेल अशी मला आशा वाटली. आणि मी स्वस्तात व्यवहार निपटवून तो आरसा त्यांना विकला...”

“...त्याच दिवशी सुट्टी घेऊन गावी गेलेला वाड्यातील एक जुना नोकर माझ्या घरी येऊन मला भेटला. त्याने मला त्या आरशाबद्दल विचारले. मी मला काही माहित नसल्याचे सांगितले. तेव्हा त्याने मला त्या आरश्यात बंदिस्त असलेल्या आत्म्याविषयी सांगितले. आणि मला माझी चुक उमगली. पण मी केलेली चुक सुधारण्यासाठी काहीच करू शकत नसल्यामुळे मी गप्प बसणेच योग्य समजलो...”

कनिष्क, गोपाळला वाडा पेटवून द्यायला सांगतो, व संस्कृत वाचता येणाऱ्या एका कुमारिकेला शोध घ्यायला सांगतो. गोपाळला संस्कृत मध्ये श्लोक म्हणत असलेली प्रिया दिसते आणि तो तिला वाड्यावर नेण्याचे ठरवतो. जुन्या नोकरांकडून आरशात बंदिस्त असलेल्या कनिष्क बद्दल कळण्यावर गोपाळला आपली चुक उमगते.