मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ४

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २४ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ४ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 4 - Marathi Katha - Page 3

आरसा विकणाऱ्या माणसाला सोबत घेऊन अमोल आपल्या घरी पोहोचला, श्रीनिवास त्याची वाटच पाहत होता. अमोलला पाहताच तो त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, “मिस्टर अमोल, एक प्रॉब्लेम झालाय. डॉक्टर कुलकर्णींच्या क्लिनिक मधुन प्रिया गायब झाली आहे.” “काय? अशी कशी गायब झाली? तुम्ही तिला शोधलेत का? पोलीस कम्प्लेंट तरी केलीत का?” अमोलने आगतिक होत विचारले. “त्याचा काही उपयोग नाही कारण माझ्या असिस्टंटना ई.एम.एफ रिडरवर कनिष्क क्लिनिक मध्ये उपस्थित असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यानेच तिला आपल्या सोबत कुठल्यातरी अज्ञात स्थळी नेलंय.” श्रीनिवास शांतपणे म्हणाला.

त्याबरोबर अमोलचा संय्यम सुटला आणि तो जवळ जवळ श्रीनिवासच्या अंगावर ओरडलाच, “मग तुम्ही इतका वेळ काय केलेत? माझी वाट पाहत बसला होतात का? कुठे घेऊन गेला असेल तो प्रियाला? काय हाल केले असतील त्याने तिचे, ईश्वरालाच ठाऊक?” “कदाचित मला माहित आहे, तो तिला कुठे घेऊन गेला असेल ते!” गोपाळच्या या वाक्यावर सगळ्यांच्या नजर त्याच्याकडे वळल्या. तो कोण आहे आणि त्याला हे कसे माहित असे श्रीनिवासने विचारताच, गोपाळ म्हणाला; “मी गोपाळ, मीच सरदेशमुखांना तो आरसा विकला होता. या सगळ्याला जवाबदार मीच आहे. यशवर्धन राजाच्या शेवटच्या वंशजांकडे मी नोकरी करत होतो. नोकरीला लागल्यापासून मला वाड्यात सगळीकडे वावर करता येत होता फक्त एक खोली होती की जीथे जायला मला मज्जाव होता. त्यामुळे त्या खोलीत नक्की काय आहे ते पाहण्याची उत्सुकता मला स्वस्थ बसू देत नव्हती...”

“...काही दिवसातच मला वाड्याची पुरती माहिती झाली. कुठे काय आहे हे सगळे मला माहित झाले होते. आणि एके दिवशी तशी संधी मला मिळाली. राजे उदयभान आपल्या परिवारासह एका लग्नसमारंभासाठी परगावी गेले होते. वाड्यामध्ये दोनचार नोकर आणि मी याव्यतिरिक्त आणखी कोणीच नव्हते. रात्री वाड्यात सामसुम झाल्यावर राजे उदयभान यांच्या कपाटाची चावी त्यांच्या उशीखालुन मिळवली आणि कपात उघडले. चोरकप्प्यात ठेवलेली एक चावी मला मिळाली. ती घेऊन मी चोरपावलांनी त्या खोली जवळ गेलो आणि हळुच दरवाज्याला लावलेले कुलुप उघडले...”

“...आत मिट्ट काळोख होता. लाईट लावल्यास कोणाच्या तरी लक्षात आले असते म्हणून मी माझ्याकडे असलेली बॅटरी सुरु केली. खोलीत एक आरसा सोडला तर बाकी खोली रिकामीच होती. मी कुतूहलाने त्या आरशापाशी गेलो आणि त्याच्यावर घातलेले पांढरे कापड दूर केले आणि त्या आरश्यावरील कोरीव काम पाहत स्वतःशीच विचार करत होतो की या आरशात असे काय आहे की ज्यामुळे याला एवढ्या कडेकोट बंदोबस्तात ठेवले आहे? एवढ्यात त्या आरशामध्ये एक भयानक चेहरा दिसु लागला. तो पाहताच मी घाबरून मागे सरकलो आणि तिथुन निघुन जाणार एवढ्यात मला माझ्या नावाने हाक मारलेली ऐकु आली...”

अमोल घरी पोहोचतो तेव्हा त्याला प्रिया गायब झाल्याचे कळते व तो भडकतो. गोपाळ कनिष्कच्या संपर्कात कसा येतो याची हकीकत सांगू लागतो.