मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ४

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २४ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ४ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 4 - Marathi Katha - Page 2

इकडे क्लिनिकमध्ये डॉक्टर कुलकर्णीनी प्रियाचे पुर्ण चेकअप केले आणि त्या सुशीला सरदेशमुख यांच्या समोर येऊन बसल्या. त्या काय सांगतात याची सुशीलाबाई आतुरतेने वाट पाहत होत्या. एक मोठा उसासा सोडून डॉक्टर कुलकर्णी म्हणाल्या, “हे बघा मिसेस सरदेशमुख, मी काय सांगते ते लक्षपुर्वक ऐका, बातमी वाईट आणि चांगली अशी दुहेरी आहे. तुम्ही मुळात घाबरून जाऊ नका. वाईट बातमी ही की प्रियावर अत्याचार झाला आहे. गेल्या चौवीस तासात प्रियाने खुप सोसले आहे. चांगली बातमी ही की क्रुरतेचा कळस झाला असुनही प्रिया त्यातुन सावरली आहे. तपासणीत मला सीमेनचे अंश कुठेच आढळले नाहीत, त्यात तिचे पिरियड्स येऊन वीस दिवस होऊन गेल्यामुळे ती प्रेग्नंट होण्याची शक्यता ९९% निगेटिव्ह आहे...”

“...तिच्या शरीरावर खुप मारहाणीच्या खुणा आहेत पण ती फास्ट रिकव्हर करते आहे. अशा परिस्थितीत एखादी मुलगी कोलमडून पडली असती पण प्रिया मनाने खंबीर आहे त्यामुळे ती यातून लवकर बाहेर पडेल. पण त्यासाठी आपल्या सर्वाना, खास करून तुम्हाला आणि अमोलला विशेष प्रयत्न करावे लागतील. तिचे मन चांगल्या गोष्टीत रमेल, ती खुश राहील, घडून गेलेल्या प्रकारची तिला कोणत्याच प्रकारे आठवण होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. वाटल्यास तिला कुठे तरी दुसरीकडे घेऊन जा जेणेकरून तिचे मन रमेल आणि ती लवकरात लवकर नॉर्मल होईल.”

सुशीलाबाईंचे डोळे अखंड पाझरत होते, गदगदलेल्या स्वरात त्या डॉक्टर कुलकर्णींसामोर हात जोडत म्हणाल्या, “माझी प्रिया पुन्हा पहिल्यासारखी होईल ना डॉक्टर?” यावर डॉक्टर कुलकर्णी उत्तरल्या, “थोडा वेळ लागेल पण ती नक्की ठीक होईल, तुम्ही काळजी करू नका. मुख्य म्हणजे तिच्या समोर अशा रडत राहू नका जेणेकरून तिला या वाईट प्रसंगाची आठवण होत राहील. तुम्ही खुश राहा मग ती पण यातून लवकर बाहेर पडेल.” सुशीलाबाईंनी आपले डोळे पुसले आणि एकदम त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव पसरले. “पण त्या कनिष्कचे काय? तो तर माझ्या प्रियाच्या जीवावर उठलाय!” सुशीलाबाईंच्या आवाजात चिंता डोकावत होती. “तुम्ही त्याची काळजी नका करू. श्रीनिवास आणि अमोल आहे ना त्याची काळजी घायला?” डॉक्टर कुलकर्णी उत्तरल्या.

“अगं बाई! या भानगडीत मी अमोलला विसरूनच गेले. तो आहे कुठे?” सुशीला बाईनी विचारले, तशा कुलकर्णी मॅडम म्हणाल्या, “मी श्रीनिवासला सांगितलं होतं त्याला कॉन्टॅक्ट करायला. आत्ताच त्याचा कॉल येऊन गेला. अमोल तासाभरात घरी पोहोचतोय. तुम्ही प्रियाला घेऊन घरी जा. काही वाटलंच तर मला फोन करा. जाताना ही औषधे सोबत घेऊन जा. मी रात्री क्लिनिक बंद केल्यावर एखादी चक्कर मारेन.” प्रियाला बोलावण्यासाठी सुशिलाबाईनी हाक मारली पण काहीच रिप्लाय आला नाही. प्रिया न सांगता कुठेतरी गायब झाली होती.

डॉक्टर कुलकर्णी, प्रियाला तपासतात व तिच्यावर अत्याचार झाल्याचे सुशीलाबाईंना सांगतात. त्या सुशीलाबाईंना दिलासा देतात पण त्या कनिष्क पासून प्रियाला कसे वाचवावे या विवंचनेत पडतात. प्रियाला घरी नेण्यासाठी त्या हाक मारतात पण प्रिया गायब झालेली असते.