मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ४

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २४ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ४ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 4 - Marathi Katha

पुर्वार्ध: आपण पाहिले की, राणी रुपमतीवर वाईट नजर ठेऊन राजा कनिष्क राणी रुपमतीशी गैरवर्तन करायला जातो आणि राजा यशवर्धन त्याला त्याच्या अपराधाबद्दल मृत्युदंड देतो, पण मरताना कनिष्क राजा यशवर्धनला सांगतो की तो परत येऊन त्याच्या समोर त्याच्या पत्नीचा उपभोग घेईल. कनिष्कच्या खुनाचा बदला घ्यायला आलेल्या कुलदीपचा सर्व सैन्यानिशी खात्मा केल्यावर राजा यशवर्धन व राणी रूपमती निद्राधीन असताना कनिष्कचा आत्मा तिथे येतो व आपला शब्द खरा करतो. राणी रूपमती आत्महत्या करते. कनिष्कच्या आत्म्याला राजाध्यक्ष घराण्याचे पूर्वज एका आरशामध्ये कैद करतात. भविष्यात कनिष्कच्या आत्म्याला नष्ट करण्याचा उपाय सापडल्यास कनिष्कला मुक्त करता यावे यासाठी ते आरशाच्या मागे मंत्र लिहून ठेवतात. श्रीनिवास त्या आरशाचे काढलेले फोटो आपल्या वडीलांना दाखवतो, तेव्हा कनिष्क सोबत काही इतर आत्मेही या जगात आल्याचे ते श्रीनिवासच्या निदर्शनास आणुन देतात. पुढे चालू...

वर्तमान स्थिती: या सगळ्या भानगडीत अमोलकडे कुणाचेच लक्ष नव्हते. राजाध्यक्ष येण्याआधीच तो कुठे तरी गायब झाला होता. आपल्या छोट्या बहिणीवर गुदरलेल्या प्रसंगामुळे बिचारा चांगलाच हादरला होता. दोनच दिवसात त्याच्या बहिणीची अवस्था पार बिकट झाली होती. ही नक्की काय भानगड आहे? याचा विचार करून करून त्याला वेड लागायची पाळी आली होती. प्रियाच्या काळजीने तो खुपच बेचैन झाला होता. हा कनिष्क अचानक कुठून उपटला आणि तो आपल्या बहिणीच्या मागे का लागला आहे हे त्याला समजेना. बराच वेळ विचार करत असताना अचानक त्याला क्लिक झाले की हा सगळा प्रकार तो आरसा घरात आल्यापासुन सुरु झालाय.

राजा यशवर्धनाच्या वंशावळीतील शेवटच्या वंशजाचा पुर्ण कुटुंबासह आगीत होरपळून मृत्यू होणे, त्या भीषण आगीत फक्त तो आरसाच वाचणे, नेमका त्या घरातील नोकराने तो आरसा आपल्याला विकणे, सुरुवातीपासुन त्या नोकराचे संदिग्ध वागणे या सर्वांची त्याला आता सांगड लागत होती. या सगळ्याच्या मागे नक्की हा आरसाच आहे याची त्याला खात्री पटली. एकदा आरशामागची स्टोरी समजली की या अडचणीवर उपाय शोधणे सोपे जाईल, हे त्याच्या लक्षात आले. पण इतक्या जुन्या आरशाची माहिती मिळणार कशी आणि कुठे? इंटरनेट वर शोधुन पहिले पण काही खास अशी माहिती मिळाली नाही.

विचार करून करून त्याचे डोके दुखू लागले होते आणि इतक्यात अमोलला आठवले की त्या जळक्या हवेलीतुन आरसा खाली आणल्यावर आपण त्या माणसाला पैसे दिले होते तेव्हा रिसीट वर रिसिव्हडचा शिक्का मारून सही घेतली होती. त्या रिसीटवर त्या माणसाचे नाव आणि पत्ता पण नक्कीच असेल. त्या माणसाची तो आरसा विकुन तिथुन लवकरात लवकर जाण्यासाठी चाललेली घाई अमोलला आठवली आणि तो माणुसच या रहस्यावरील पडदा उठवू शकेल याची त्याला खात्री पटली. लगेचच तो आपल्या दुकानाकडे निघाला. बिलबुक मध्ये शोधताना त्याला त्या माणसाची सही असलेली रिसीट सापडली. त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्या रिसिटवर त्या माणसाचे नाव आणि पत्ता होता. सुदैवाने तो पत्ता बाजुच्याच गावातील होता. त्याने त्या पत्याचा फोटो घेतला आणि तडक त्या माणसाच्या शोधात त्या पत्त्यावर निघाला.

तासभर गाडी चालवल्यावर अमोल त्या पत्त्यावर पोहोचला. अमोलला येताना पाहताच तो माणुस आपल्या घरातून पळून जाऊ लागला पण अमोलने त्याला शिताफीने पकडले. त्या माणसाचा गळा आपल्या मजबुत पंज्यात पकडून अमोलने त्याच्या दोन कानाखाली वाजवल्या आणि त्याला विचारू लागला “का पळतोयस? त्या आरशाबद्दल काय माहित आहे तुला? तु मुद्दाम तो आरसा मला विकलास ना? खरे काय ते सांग नाहीतर जीवच घेईन तुझा!” अमोलच्या रुद्रावताराचा अपेक्षित परिणाम त्या माणसावर झाला. “प्लिज मला मारू नका मी तुम्हाला सगळे सांगतो, पण आधी मला सोडा,” म्हणत अमोलच्या तावडीतून तो सुटण्याचा प्रयत्न करू लागला.

अमोलने त्या माणसाच्या गळ्यावरील पकड ढिली करताच तो माणुस दीर्घ श्वास घेऊ लागला. श्वास नॉर्मल झाल्यावर तो माणुस बोलू लागला आणि अमोलच्या चेहेऱ्यावरील भाव झपाट्याने बदलू लागले. राग, घृणा, आश्चर्य, आशा, आनंद, शंका अशा अनेक भावनांचे मिश्रण त्याच्या चेहऱ्यावर दिसु लागले. त्या माणसाने सगळे काही खरे खरे सांगून टाकले आणि अमोलला आपल्या बहिणीला वाचवण्याचा एक मार्ग दिसू लागला. तो आपल्या पुढच्या प्लॅनची मनात आखणी करत असतानाच त्याचा मोबाईल खणखणला. अनोळखी नंबर दिसल्यामुळे अमोल कॉल कट करणार इतक्यात अप्लिकेशनने कॉलरचे नांव दाखवले, “श्रीनिवास राजाध्यक्ष.” ते पाहताच अमोलने तो कॉल रिसिव्ह केला.

“हॅलो, अमोल सरदेशमुख! मी श्रीनिवास राजाध्यक्ष बोलतोय. मी एक पॅरानॉर्मल एक्सपर्ट आहे आणि तुमच्या बहिणीच्या केस करीत तुमच्या घरी आलोय. मला तुमच्याशी थोडे अर्जंट बोलायचे होते. तुम्ही मला लवकरात लवकर किती वेळात भेटू शकाल? हा तुमच्या बहिणीच्या जीवाचा प्रश्न आहे.” श्रीनिवास राजाध्यक्ष एका श्वासात बोलून गेला. “मी देखील त्याच कामासाठी थोडा बाहेर आलो होतो आणि माझ्या हाती खुप महत्वाची माहिती लागली आहे त्या माहितीचा आपल्याला या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढण्यासाठी खुप उपयोग होईल. मी तासाभरात घरी पोहोचतोच आहे तोपर्यंत तुम्ही सांभाळून घ्या.” एवढे बोलुन अमोलने फोन कट केला आणि त्या माणसाला आपल्या गाडीत बसण्यास सांगितले.

प्रियाला कनिष्कपासून कसे वाचवायचे याचा विचार करत असताना अमोलच्या लक्षात येते की ज्या माणसाने त्याला तो आरसा विकला तोच काही तरी मदत करू शकेल. तो त्याच्या पत्यावर जाऊन त्याला गाठतो. तो माणुस त्याला सगळी माहिती देतो. श्रीनिवास राजाध्यक्ष्यला तासाभरात भेटण्याचे काबुल करून अमोल त्याला माणसासोबत आपल्या घराकडे जायला निघतो.