मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ३

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २१ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ३ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 3 - Marathi Katha - Page 7

त्या तेजस्वी साधुने कनिष्क आरशात कैद झाल्यावर राजा यशवर्धनाची भेट घेतली. आरशाच्या पाठीमागे संस्कृत मध्ये दोन मंत्र लिहिले असुन एका मंत्राच्या उच्चारणामुळे कनिष्क पुन्हा बाहेर येऊ शकतो; आणि दुसऱ्या मंत्राच्या उच्चारणाने त्याला त्या काचेत कैद करता येऊ शकते हे कळताच राजाच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव उमटले. चिंताक्रांत आवाजात तो म्हणाला, “कनिष्कला कैद करण्याऐवजी नष्ट केले पाहिजे होते. आणि जर कैद केले तर त्याला मुक्त करू शकणाररा मंत्र आरशामागे कशासाठी लिहिला आहे? कुणी कनिष्कला मुक्त केले तर तो काय संकट आणेल याची आपणास जाणीव नाही काय?” या राजाच्या प्रश्नावर त्या साधुने सांगितले, “आपली काळजी अगदी योग्य आहे महाराज. पण मुळात आत्म्यास नष्ट करता येऊ शकत नाही.”

“कनिष्कच्या आत्म्याने ज्या स्त्रियांचे शोषण केले व त्यांना मृत्यू आला, त्यांच्या आत्म्यांना त्याने आपले गुलाम बनवले आहेत. त्यामुळे तो खुप सामर्थ्यशाली झाला आहे. तुर्तास तरी माझ्याजवळ राजा कनिष्कला नष्ट करण्याचा उपाय नाही. त्यामुळे माझ्या हयातीत मला उपाय सापडला तर मी त्याला नष्ट करेनच. माझ्या पश्चात जर का अन्य कोणाला यावर उपाय सापडला तर त्याला आधी कनिष्कला आरशाच्या कैदेतुन मुक्त करावे लागेल, आणी नंतरच तो त्याला नष्ट करू शकेल. जोपर्यंत कनिष्क या आरशात कैद आहे तोपर्यंत काहीच भीती नाही. माझ्या आणि माझ्या वंशजांशिवाय इतर कोणालाही या आरशाला किंवा त्यावरील पडद्याला नष्ट करता येणार नाही परंतु खबरदारी म्हणुन या आरशाला सुरक्षित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.”

“दोन्ही मंत्र संस्कृतमध्ये आहेत आणि फक्त संस्कृत वाचता येणारी एखादी कुमारीच त्याचे उच्चारण करू शकेल असा उपाय केला आहे. राज्यातील स्त्रिया संस्कृत शिक्षित नाहीत आणि कोणतीही स्त्री त्याला मुक्त करण्याचा विचार पण करणार नाही. तशी सुचना देखील आरशाच्या मागे बनवलेल्या एका कप्यामध्ये ठेवलेल्या भुर्जपत्रावर लिहिली आहे. संस्कृत भाषेचे ज्ञान असलेला आणि सात्विक प्रवृत्तीचा कोणताही चारित्र्यवान पुरुष किंवा कुमारी स्त्री त्याला केवळ मंत्राच्या उच्चरणाने पुन्हा या आरश्यात कैद करू शकेल. तुर्तास त्याला नष्ट करणे शक्य नसल्यामुळे केवळ कैद केले आहे. त्यावरही उपाय सापडेलच. चिंता नसावी.”

यावर थोडा विचार करून राजा यशवर्धन म्हणाला, “ठीक आहे. तुम्ही उपाय शोधा पण तोपर्यंत या आरशाच्या सुरक्षेची जवाबदारी मी तुमच्यावर सोपवतो.” त्या साधुने आनंदाने ती जवाबदारी स्वीकारली. अशा तऱ्हेने वासनांध कनिष्कचा आत्मा त्या आरशामध्ये कैद झाला. त्या साधुला कनिष्कला नष्ट करण्याचा उपाय सापडण्याआधीच अकाली मृत्यू आल्यामुळे पुढे आपल्या पुर्वजांकडुन पिढी दर पिढी त्या आरशाचे संरक्षण केले गेले. केवळ संस्कृत जाणणारी एक कुमारीच कनिष्कला त्या आरश्याच्या कैदेतुन मुक्त करू शकत असल्यामुळे ते निर्धास्त राहिले. पुढे राजा यशवर्धनाच्या पिढीतील एका राजाने तो आरसा त्याचा राणीच्या हट्टापायी आपल्याकडुन स्वतःच्या ताब्यात घेतला, आणि आपल्या घराण्याकडुन त्या आरश्याचे संरक्षण करण्याची जवाबदारी काढुन घेण्यात आली.

“नुकतीच राजा यशवर्धनाची शेवटची पिढी आगीत भस्मसात झाल्याचे कळले. पुढे त्या आरश्याचे काय झाले ते माहीत नाही. आता तु सांगतो आहेस की कनिष्क मुक्त झाला आहे. हे योग्य नाही झाले. जे काम आपल्या पुर्वजांनी अपुर्ण सोडले होते ते आता आपण पुर्ण केले पाहिजे. त्या कनिष्कला यावेळी केवळ बंदिस्त नाही तर नष्ट केले पाहिजे.” देवव्रत राजाध्यक्ष प्रचंड चिंतीत झाले होते. त्या आरशाचे आणि त्यावरील श्लोकांचे काही फोटो आहेत, तुम्हाला यात काही आढळते का ते पहा. असे म्हणत श्रीनिवासने आपल्या मोबाईल मधील ते फोटो आपल्या वडीलांना दाखवले.

कनिष्कचा आत्मा खुप शक्तिशाली असल्यामुळे त्याला केवळ कैद केले आहे आणि भविष्यात त्याला नष्ट करण्याचा उपाय सापडल्यास त्याला प्रथम आरशातून मुक्त करावे लागणार असल्यामुळे ते मंत्र आरशामागे लिहिल्याचे साधू सांगतो. श्रीनिवासने दाखवलेल्या फोटोत देवव्रत राजाध्यक्षांना काय आढळते ते पुढे वाचूया...