मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ३

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २१ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ३ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 3 - Marathi Katha - Page 6

नाहीऽऽऽ! राजा यशवर्धन दुःखातिरेकाने ओरडला. “कनिष्क, तु माझ्या प्रिय पत्नीला माझ्यापासून हिरावून नेलंस, मी तुला सोडणार नाही.” त्यावर कनिष्क त्याला म्हणाला, “मी जीवंत असताना पण माझ्याशी दोन हात करायची तुझ्यात हिंमत नव्हती. मला साखळदंडांनी बांधुन, मी निशस्त्र असताना तू भ्याडपणे माझ्यावर वार केलास. आता तर मी एक आत्मा आहे. ना तु मला साखळदंडानी बांधु शकतोस, ना माझ्यावर तलवार चालवू शकतोस आणि ना तु माझे डोळे फोडू शकतोस. तु फक्त एक गोष्ट करू शकतोस. षंढासारखा माझ्या नावाने बोटं मोडू शकतोस.” राजा यशवर्धनाला खिजवत कनिष्क म्हणाला.

“तुझी राणी तर गेली, आता माझा बदला मी तुझ्या महालातील स्त्रियांची अब्रु लुटून घेणार. नंतर तुझ्या संपुर्ण राज्यातील स्त्रिया माझ्या वासनेच्या बळी जातील, आणि हे रोज घडणार.” त्यानंतर बराच वेळ कनिष्कचे गडगडाटी हास्य त्या महालात घुमत होते. कनिष्क निघुन जाताच वातावरणातील गारवा आणि राजा यशवर्धनाच्या शरीरावरील दबावही नाहीसा झाला. राजा धावतच आपल्या राणीजवळ गेला पण राणी रुपमती केव्हाच राजा यशवर्धनाला कायमचे एकटे सोडून गेली होती. तिच्या मृतदेहावर राजा ने पांघरूण टाकले आणि तिचा हात हातात घेऊन रडू लागला.

अचानक दरवाजे उघडले गेले आणि राजसैनिक आता शिरले. आपल्या राणीच्या मृतदेहाजवळ राजाला रडताना पाहुन ते हवालदिल झाले. राणीच्या मृत्यूची बातमी हा हा म्हणता सगळीकडे पसरली. सर्व जनता आणि राणीच्या सौंदर्याने घायाळ झालेले राजे महाराजे दुःखाच्या सागरात बुडाले. राणीचा अंत्यसंस्कार झाल्यावर दुसऱ्या दिवशी कनिष्कने आपल्या वासनेची बळी राजाच्या धाकट्या भावाच्या पत्नीला बनवल्यावर राजा यशवर्धन भानावर आला. एकामागुन एक राजस्त्रियांवर कनिष्क अत्याचार करत सुटला होता आणि त्याला कसे आवरावे या विचाराने राजा यशवर्धन चिंतीत झाला होता.

कनिष्कच्या वासनेची सातवी बळी गेल्यावर राजाने दवंडी पिटली की जो कोणी कनिष्कचा बंदोबस्त करेल त्याला तो अर्धे राज्य बक्षीस देईल. अनेक राज्यातुन मांत्रिक, तांत्रिक, भगत वगैरे आले पण कोणालाच यश आले नाही आणि त्यातील बरेचसे स्वतःच जीवानिशी गेले. शेवटी तिसावा बळी गेल्यावर एक तेजस्वी साधु त्या राज्यात आला. तो साधु म्हणजे आपल्या राजाध्यक्ष घराण्याचे पुर्वज, ज्यांचे आपण वंशज आहोत. त्यांनी कनिष्कचा बंदोबस्त करण्याची तयारी दर्शविली व अर्धे राज्य वगैरे नको पण या संकटातून सर्वांची सुटका केल्यास कायमस्वरूपी राजाश्रय मिळावा अशी विनंती केली.

राजा यशवर्धनाने ती विनंती आनंदाने मान्य केली. त्यांनी आपल्या कार्यासाठी एक मोठा सहा फुटी शिसवी आरसा बनवून घेण्यास राजाला सांगितले. कारागीर कामाला लागले, आणि त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन महिन्याभरातच एक पुर्णाकृती सुंदर आरसा बनवला. महालातील सर्व राजस्त्रियांना त्या साधुने एकाच शयन कक्षात झोपण्यास सांगितले व त्या शयन कक्षात त्याने तो आरसा बसवण्याची व्यवस्था केली. रात्री जेव्हा कनिष्क अदृश्य रूपात तिथे आला, त्याने त्या राजस्त्रियांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण एकाही स्त्रीच्या तो जवळ जाऊ शकला नाही.

कुंकवाने घातलेल्या मोठ्या मंडळात गळ्यात रुद्राक्षांची माळ धारण केलेल्या त्या सर्व राजस्त्रिया सुरक्षित होत्या. ते पाहुन कनिष्कचा संताप अनावर झाला आणि तो आपल्या दृश्य रूपात आला. त्याबरोबर त्या आरशावरील शुभ चिंन्हांनी युक्त पडदा दूर झाला. पाठोपाठ त्या आरशावर लिहिलेल्या पहिल्या मंत्राच्या उच्चारणाचा धीर गंभीर स्वर त्या शयनकक्षात घुमला आणि आरशावर लिहिलेल्या त्या मंत्राची अक्षरे उजळली. त्या साधुकडून काही गूढ मंत्राचे आवर्तन होऊ लागले तसे कनिष्क त्या आरशाकडे खेचला जाऊ लागला. कनिष्क सुटण्याचा खुप प्रयत्न करू लागला पण तो निष्फळ ठरला.

कनिष्क त्या आरशाजवळ पोहोचताच, काचेचा घनपणा नाहीसा झाला आणि ती प्रवाही बनली व कनिष्क त्या काचेमध्ये ओढला गेला. कनिष्क काचेतून आत जाताच ती काच पूर्ववत झाली. लगेचच त्या साधुने आरशावर लिहिलेल्या दुसऱ्या मंत्राचे उच्चारण करताच आरशावर लिहिलेल्या दुसऱ्या मंत्राची अक्षरे उजळली आणि कनिष्क त्या काचेत कैद झाला. तो कोणाच्याही दृष्टिपथास पडू नये यासाठी त्या मंतरलेल्या पडद्याने तो आरसा पुन्हा व्यवस्थित झाकला गेला. कनिष्क कैद जरी असला तरी पडदा दूर होताच त्या आरशात पाहणाऱ्या व्यक्तीला आपल्या शक्तीच्या जोरावर संमोहित करून आपली सुटका करून घेण्यासाठी उपाययोजना करू शकु नये यासाठी ते आवश्यक होते..

कनिष्कच्या आत्म्याचा बंदोबस्त करणाऱ्याला अर्धे राज्य बक्षीस देण्याची दवंडी पिटवली जाते. श्रीनिवास राजाध्यक्षचे पूर्वज आपल्या मंत्रसामर्थ्याने आणि अक्कल हुशारीने त्याला एका आरशामध्ये कैद करतात. कनिष्कल मुक्त करू शकणारा मंत्र ते आरशाच्या मागे का लिहितात ते आता वाचूया...