मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ३

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २१ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ३ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 3 - Marathi Katha - Page 4

त्या रात्री राजा व राणी दोघांना एकक्षणही झोप लागली नाही. राजा यशवर्धनच्या कानात सतत कनिष्कचे शेवटचे शब्द घुमत होते, मी परत येईनऽऽऽ, मी परत येईनऽऽऽ! डोळे फुटण्याआधी कनिष्कची नजर राणी रुपमतीवरच रोखलेली होती. त्या नजरेतील धग तिला बेचैन करत होती. खरंच तो परत आला तर काय होईल? या विचाराने ती नखशिखांत घाबरली होती.

अख्खी रात्र तळमळत काढल्यावर पहाटे पहाटे दोघांना झोप लागली. इतक्यात कनिष्कचा भाऊ कुलदीप भावाच्या खुनाचा बदल घेण्यासाठी, राज्यावर आक्रमण करण्यासाठी येत असल्याची बातमी गुप्तहेरांकरवी यशवर्धन राजापर्यंत पोहोचली. तो खडबडुन जागा झाला. त्याने युद्धाच्या तयारीचे आदेश सोडले. तीन दिवसांनी कुलदीप, राज्याच्या वेशीपर्यंत येऊन पोहोचला. त्याने दुतामार्फत राजा यशवर्धनाने विश्वासघाताने आपल्या भावाला मारल्याबद्दल शरण यावे आणि त्याच्या राणीला आपल्या स्वाधीन करावे, अन्यथा त्याच्या राज्यावरून गाढवाचा नांगर फिरवला जाईल असा संदेश धाडला.

यावर कनिष्कनेच मैत्रीच्या मुखवट्याखाली आपल्या पत्नीवर वाईट नजर ठेवुन लांच्छनास्पद कृत्य केल्याबद्दल त्याला योग्य तो दंड दिला गेला आहे, त्यात विश्वासघाताचा प्रश्नच येत नाही. आता त्याचा भाऊही त्याच्याच पावलावर पाऊल ठेऊन जर राज्यात प्रवेश करत असेल तर त्याने परत जावे अन्यथा त्यालाही त्याच्या भावाकडे पाठवण्यात येईल असा उलट जवाब पाठवला.

शेवटी युद्धाला तोंड फुटले. दहा दिवस घनघोर युद्ध झाले. त्यात कुलदीप मारला गेला, त्याचे उरले सुरले सर्व सैन्य कत्तल केले गेले. राजा यशवर्धन विजयी होऊन परतला आणि नगरात आनंदी आनंद झाला. हे युद्ध तर राजा यशवर्धन जिंकला, पण ‘आता जे अघटित घडणार होते त्यासाठी तोच काय कोणीच तयार नव्हत.’

युद्धाने थकलेला राजा यशवर्धन आपल्या प्रिय पत्नी समवेत श्रमपरिहारासाठी आपल्या राजउद्यानात विहार करत होता. तलावात नौकानयन करत असताना राणी रूपमती पाण्यात हात घालुन आपल्या पतीवर पाणी उडवीत होती. तिच्या सुंदर चेहऱ्यावरचे खट्याळ भाव पाहुन राजा यशवर्धनही आपला थकवा विसरून तिच्याशी क्रीडा करत होता. संध्याकाळ होत आली होती. पाणी उडवण्यासाठी राणी रूपमती नौकेतुन खाली वाकली आणि अचानक तिला पाण्यात कनिष्कचा चेहरा दिसला. तो पाहताच तिच्या चेहऱ्यावरचे खट्याळ भाव आणि हास्य लोप पावले आणि त्याची जागा भयाने घेतली. आपली शंका खरी तर नाही ना ठरणार? या विचाराने तिला कापरे भरले.

अचानक तिच्यात आलेला बदल राजा यशवर्धनाने टिपला होता. काळजीने त्याने तिला विचारले, “काय झाले महाराणी? तुम्ही अचानक अशा घाबऱ्या घुबऱ्या कशामुळे झालात?” यावर राणीने तिला पाण्यात कनिष्कचा चेहरा दिसल्याचे सांगितले. तेव्हा तिला भास झाला असेल असे सांगून राजाने तिचे मन पुन्हा रमवायचा प्रयत्न केला पण त्यात त्याला अपयश आले. शेवटी ते दोघे आपल्या महालात परत आले, राणी रुपमतीला अंगात कणकण जाणवु लागल्यामुळे राजवैद्याला बोलावण्यात आले. त्याने दिलेल्या वनौषधींचा काढा घेऊन राणी निद्राधीन झाली.

कुलदीपचा त्याच्या सर्व सैन्यानिशी खात्मा केल्यावर राजा यशवर्धन आपल्या पत्नीसह राजउद्यानात श्रमपरिहार करत असताना राणीला कनिष्कचा चेहरा पाण्यात दिसतो आणि भीतीने तिला ताप भरतो. खरंच कनिष्क परत येतो का? तो आपला बदला घेतो का? ते आता पुढे वाचूया...