मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ३

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २१ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ३ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 3 - Marathi Katha - Page 3

दुसऱ्या दिवशी राजदरबार भरवला गेला, राजा यशवर्धन आणि राणी रूपमती सिंहासनावर बसले होते आणि समोर साखळदंडामध्ये बंदिस्त उभा होता राजा कनिष्क. जमिनीत रोवलेल्या लाकडी खांबाला राजा कनिष्कला मजबुतीने बांधण्यात आले होते. अमात्य चंद्रसेन यांनी राजा कनिष्कने केलेल्या गुन्ह्याची दरबारातील मान्यवर, इतर राजे महाराजे आणि जनतेला माहिती दिली. राजा यशवर्धनाला प्रजा आणि इतर राजांसमोर एक उदाहरण ठेवायचे होते की राणी रुपमतीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची काय अवस्था होऊ शकते.

त्याने राजा कनिष्कला खुप भयंकर शिक्षा ठोठावली. सर्वप्रथम राजा कनिष्कचे दोन्ही हात तोडण्यात आले. जीवघेण्या वेदनांमुळे राजा कनिष्क किंचाळत होता. पण कोणतीही दयामाया न दाखवता नंतर त्याचे दोन्ही पायही तोडण्यात आले. कनिष्कच्या शरीरातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. स्वतःच्याच रक्ताच्या चिखलात बरबटलेला राजा कनिष्क त्या लाकडी खांबावर लटकलेल्या अवस्थेत मरणप्राय यातनांनी तडफडत होता. थोड्या वेदना कमी झाल्यावर कनिष्कने मान वर करून राणी रूपमतीकडे वासना आणि सुडाने भरलेल्या विखारी नजरेने पाहिले आणि कुत्सित हसला.

ते पाहताच राजा यशवर्धनच्या संतापाचा उद्रेक झाला आणि तप्त लाल झालेल्या शिगा राजा कनिष्कच्या डोळ्यात खुपसण्यात आल्या. लोण्याच्या गोळ्यात शिराव्या तशा त्या शिगा कनिष्कचे डोळे फोडत आरपार झाल्या. वेदनातिरेकाने कनिष्क किंचाळत होता. ते पाहुन जमलेल्या सर्व लोकांच्या अंगावर काटा उभा राहिला. कनिष्काची अवस्था पाहणे शक्य न झाल्यामुळे अनेकांनी आपले डोळे झाकुन घेतले तसे राजा यशवर्धन गरजला, “कोणीही आपले डोळे बंद करायचे नाहीत. महाराणीवर वाईट नजर ठेवणाऱ्याची काय अवस्था होते हे सगळ्यांनी बघणे गरजेचे आहे. खबरदार जर कोणी डोळे बंद केलेत तर! त्याचीही हीच अवस्था होईल!”

वेदनांनी तडफडणारा राजा कनिष्क, राजा यशवर्धनाला म्हणाला, “यशवर्धन! तु माझा जीव घेतलास तरी हरकत नाही पण मी तुझ्या राणीचा उपभोग घेण्यासाठी परत येईनंच. रूपमती! मी तुला सोडणार नाही. तुला तुझ्या पतीसमोर भोगल्याशिवाय माझा आत्मा शांत होणार नाही. मी परत येईन.” ते ऐकताच रागाने बेभान झालेल्या राजा यशवर्धनाने सिंहासनावरून उडी मारली आणि कनिष्कच्या समोर उभा राहिला. “नीच, तुझी ही हिंमत?” असे म्हणत तलवारीच्या एका वारात राजा कनिष्कचे मस्तक धडा वेगळे केले.

ते मस्तक गडगडत राजा यशवर्धनाच्या पायापाशी आले. तसे राजा यशवर्धनाने त्याला लाथेने दूर उडवले. कनिष्कच्या धडातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. राजा यशवर्धनाचा राग अजूनही शांत झाला नव्हता. त्याने कनिष्कच्या धडा पूर्ण ताकदीने लाथ मारली. ती लाथ एवढी जबरदस्त होती की कनिष्कचे धड बांधलेला तो लाकडी खांब मोडला आणि कनिष्कच्या धाडसकट सहा फुट लांब जाऊन पडला.

कनिष्कच्या छातीवर पाय देऊन त्याच्या रक्ताने माखलेली आपली तलवार उंचावून राजा यशवर्धन गरजला, “कनिष्क, तु येच परत. तुझ्या आत्म्याची याहून दुरावस्था नाही केली तर राजा यशवर्धन नांव नाही सांगणार.” जमलेल्या सर्व लोकांकडे एक विजयी नजर टाकत राजा यशवर्धन दमदार पावले टाकत आपल्या महालाकडे निघाला. राणी रुपमतीने कनिष्कच्या कलेवराकडे एकवार पाहिले आणि आपल्या पतीच्या पाठोपाठ दरबारातून तिही निघून गेली.

राजा यशवर्धन कनिष्कला अत्यंत वेदनादायी मृत्युदंड देतो पण मारता मारता कनिष्क मृत्यूनंतरही परत येऊन राजा यशवर्धन समोर त्याच्या पत्नीचा उपभोग घेण्याची वल्गना करतो. कनिष्कचा वध केल्यावर पुढे काय काय घडामोडी घडतात? हे आता पुढे वाचूया...