मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ३

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २१ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ३ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 3 - Marathi Katha - Page 2

त्याच्या अंगरक्षकांनी राणीच्या शयनकक्षाबाहेर उभ्या असलेल्या पहारेकऱ्यांना केव्हाच यमसदनी धाडले होते. राजा यशवर्धन मद्याच्या अंमलाखाली गाढ झोपी गेला होता. बाजुलाच त्याची प्रिय पत्नी रुपगर्विता राणी रूपमती झोपली होती. शयनकक्षाचा दरवाजा उघडुन राजा कनिष्क आत शिरला व त्याच्या अंगरक्षकांनी पहारेकऱ्यांची जागा घेतली. शांतपणे झोपलेल्या राणी रुपमतीला पाहुन राजा कनिष्कचे मन चाळवले व तो राणीच्या शरीराशी लगट करू लागला. आपला पती असावा असे समजुन राणी रुपमतीही त्याला प्रतिसाद देऊ लागली. इतक्यात राजा कनिष्काचा हात लागुन पलंगाशेजारी ठेवलेल्या मेजावरचा रत्नजडित पेला खाली पडला त्याने राजा यशवर्धनची झोप चाळवली आणि तो झोपेतच जाबडला, “कोण आहे?”

आपल्या पतीचा आवाज विरुद्ध बाजुने आल्याचे ध्यानात आल्यावर राणी रूपमती एकदम गडबडली आणि तिच्या लक्षात आले की ती ज्याला आपला पती समजत होती तो कोणी दुसराच आहे. “हा कनिष्क तर नव्हे?” या विचाराने तिच्या शरीरातुन भीतीची एक थंड लहर सरसरत गेली. आणि तिने पुर्ण ताकदीने राजा कनिष्कला आपल्यावरून ढकलून दिले. त्या अनपेक्षित धक्क्याने राजा कनिष्क पलंगावरून खाली कोसळला आणि त्याच्या धक्क्यामुळे पलंगा शेजारी ठेवलेले ते छोटे मेज त्याच्यावर ठेवलेल्या फळांच्या चषकासकट आडवे झाले. मोठ्या आवाजाने राजा यशवर्धनाची झोप खाडकन उघडली आणि त्याने बाजुला असलेल्या दिव्याची ज्योत मोठी केली. दिव्याच्या प्रकाशात त्याला कट्यार उपसलेली आपली राणी आणि जमिनीवर पडलेला राजा कनिष्क दिसला.

त्याने पलंगाला असलेली गुप्त कळ दाबताच हत्यारबंद शिपायांची तुकडी तिथे आली. दरवाजावरील अंगरक्षकांना कंठस्नान घालुन त्यांनी राजा कनिष्कला बंदी बनवले. राणी रुपमतीने घडलेला प्रसंग सांगण्यासाठी आपले ओठ विलग केले पण राजा यशवर्धनाने इशाऱ्यानेच तिला थांबवले आणि शिपायांना राजा कनिष्कला नेऊन काळ कोठडीत डांबण्यास सांगितले. राजा कनिष्क रागाने चवताळुन राणी रुपमतीच्या अंगावर धाऊन जायचा प्रयत्न करू लागला पण शिपायांनी त्याला घट्ट धरून ठेवले आणि फरफटत शयनकक्षाबाहेर घेऊन गेले.

ते तिथुन गेल्यावर राणी रूपमती राजा यशवर्धनाच्या पायावर कोसळली आणि रडत म्हणाली, “मला माफ करा महाराज, मला वाटले की तुम्ही आहात म्हणुन अनावधानाने माझ्या हातुन हा गुन्हा घडला.” राजाने तिला खांद्यांना धरून उठवले आणि आपल्या छातीशी धरले व म्हणाला, “रडू नका महाराणी, यात तुमची काहीच चुक नाही. आज सकाळी ज्या नजरेने कनिष्क तुमच्याकडे पाहत होता ते मी पाहिले होते आणि मला खात्री होती की तो काही ना काही प्रमाद नक्की करणार. म्हणुन मी मद्य पिण्याचे नाटक केले होते आणि खबरदारी म्हणुन हत्यारबंद शिपायांची तुकडी तयार ठेवली होती. आणि मला अपेक्षित होते तेच झाले.”

गाढ झोपलेल्या राणी रुपमतीशी कनिष्क लगट करू लागतो. त्याचवेळी पडलेल्या पेल्याच्या आवाजाने जागा झालेला राजा यशवर्धन पहारेकऱ्यांकरवी राजा कनिष्कला अटक करवतो. कनिष्कच्या गुन्ह्याबद्दल राजा यशवर्धन त्याला कोणती कठोर शिक्षा देतो ते आता पुढे वाचूया...