मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ३

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २१ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ३ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 3 - Marathi Katha

पुर्वार्ध: आपण पाहिले की प्रियाची लैंगिक छळवणुक करणाऱ्या कनिष्कच्या आत्म्याच्या बंदोबस्तासाठी डॉक्टर कुलकर्णी त्यांच्या ओळखीतल्या एका पॅरानॉर्मल एक्स्पर्टला बोलावतात. कनिष्क सुशीलाबाईंच्या शरीरात प्रवेश करतो आणि श्रीनिवास राजाध्यक्षांवर हल्ला करतो. कनिष्कचा कसा बंदोबस्त करायचा याचा विचार करत असताना श्रीनिवासला त्याच्या आजोबानी सांगितलेली गोष्ट आठवते ज्यात कनिष्कचा उल्लेख झालेला असतो. श्रीनिवासचे वडील देवव्रत राजाध्यक्ष, कनिष्क मुक्त झाल्याचे कळताच चिंताक्रांत होतात आणि पिढी दर पिढी ऐकत आलेली कनिष्कची कथा सांगू लागतात. पुढे चालू...

आरशाचा पुर्व इतिहास:
सरदेशमुख राहत असलेल्या गावावर फार वर्षापुर्वी यशवर्धन राजाचे राज्य होते. त्याची राणी रूपमती ही नावाप्रमाणेच रूपवान होती. तिच्या सौंदर्याचे वर्णन करताना मोठमोठ्या कवींनाही शब्द अपुरे पडायचे. राजा यशवर्धनला आपल्या सुंदर अशा पत्नीचा अभिमान वाटायचा. तो तिच्या सर्व इच्छा पुर्ण करायचा आणि तिला खुश ठेवण्यासाठी काहीही करायची त्याची तयारी असायची. राणीच्या सौंदर्याची माहिती दूर दूर पसरली होती. राणीचे अधुन मधुन दर्शन व्हावे या हेतुने आजुबाजुच्या राज्याच्या राजांनी राजा यशवर्धनशी मैत्रीपुर्ण संबंध ठेवले होते.

राणीवर वक्र दृष्टी असलेल्यांची काही कमी नव्हती पण राजा यशवर्धनपुढे कुणाचेही काहीच चालत नव्हते. राणी रूपमतीही देखील एक पतिव्रता स्त्री होती त्यामुळे राजाच्या अपरोक्ष राणीचे मन जिंकणे ही एक अशक्य गोष्ट होती. राजा कनिष्क हा राणी रूपमती वर वक्र दृष्टी ठेवणाऱ्यांच्या यादीत सर्वात वर होता. त्याने राजा यशवर्धनशी मैत्री करून त्याच्याशी संबंध वाढवले तो सतत राजा यशवर्धनला आणि राणीला किमती भेटवस्तु पाठवत असे. राजा यशवर्धनसोबत शिकारीला जात असे. त्याने राजा यशवर्धनाचा विश्वास संपादन केला.

असेच एकदा राजा कनिष्क उंची वस्त्राभुषणे, हिरेजडित अलंकार वगैरे घेऊन राजा यशवर्धनच्या भेटीला त्याच्या राज्यात आला. राजा यशवर्धन आणि राणी रुपमतीने त्याचे स्वागत केले. राजा कनिष्क राणी रुपमतीचे सौंदर्य, तिचे मधाळ हास्य आणि प्रमाणबद्ध गोरे शरीर पाहुन पुरता कामज्वराने घायाळ झाला होता. काहीही करून तिचा उपभोग घ्यायचाच असा विचार त्याच्या मनात तरळुन गेला. त्याच्या मनातील भाव काही क्षणासाठीच त्याच्या चेहेऱ्यावर उमटले पण चाणाक्ष राणीने ते बरोबर टिपले. राजा कनिष्कचा दिखावेपणा आणि त्याच्या आड असलेला त्याचा दुष्ट मनसुबा तिने ओळखला. त्यावेळी राजदरबारात शोभा नको म्हणुन तिने त्या गोष्टीकडे कानाडोळा केला, पण याचा राजा कनिष्कने चुकीचा अर्थ घेतला. राणी आपल्यावर लट्टू आहे असे समजुन तो मनात मांडे खाऊ लागला.

राजा कनिष्कचा यथोचित आदरसत्कार केल्यावर राजा यशवर्धनने काही दिवस पाहुणचार घेण्याविषयी त्याला गळ घातली. आंधळा मागतो एक डोळा अन देव देतो दोन असेच राजा कनिष्कला झाले. थोडे आढेवेढे घेत त्याने राजा यशवर्धनचे म्हणणे स्विकारले. रात्री यथेच्छ मदिरापान व जेवण झाल्यावर राजा कनिष्क आपल्या शयन कक्षात गेला पण त्याला झोप काही लागेना. वासनेने त्याचे मन व्याकुळ झाले होते. मद्याचा अंमल चढल्यामुळे त्याची सारासार विवेकबुद्धी नष्ट झाली होती. मध्यरात्रीच्या सुमारास तो वासनेने धुंद झालेल्या मस्तवाल वळुसारखा राणी रुपमतीच्या महालाच्या दिशेने मार्गक्रमण करू लागला.

राजा यशवर्धनाच्या पत्नीवर वाईट नजर ठेऊन असलेला राजा कनिष्क, उंची भेटवस्तू देऊन राजा यशवर्धनाशी मैत्रीचे नाटक करतो. त्याचा पाहुणचार स्वीकारून रात्री राणी रूपमतीच्या महालाकडे जाऊ लागतो. तो आपल्या दुष्ट मानसुब्यात यशस्वी होतो का ते आता पुढे वाचूया...