मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग २ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 2 - Marathi Katha - Page 3

श्रीनिवास राजाध्यक्ष, डॉक्टर कुलकर्णी आणि सुशीलाबाईंशी चर्चा करत असताना, अचानक प्रियाच्या रूमचा दरवाजा उघडला. ते पाहताच सुशिलाबाई गडबडीने जिना चढून जाऊ लागल्या, श्रीनिवासने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत त्या प्रियाच्या रूममध्ये शिरल्या होत्या. आणि इथेच घात झाला. त्या आत शिरताच दरवाजा बंद झाला आणि कनिष्कचा आत्मा सुशीलाबाईंच्या शरीरात शिरला. डॉक्टर कुलकर्णी, श्रीनिवास राजाध्यक्ष आणि त्यांची टीम प्रियाच्या दरवाज्याजवळ पोहोचली. श्रीनिवासने हळूच दरवाजा ढकलला. करकर आवाज करत तो दरवाजा उघडला. सर्वांनी आतमध्ये नजर टाकली. प्रिया तिच्या पलंगावर बेशुद्धावस्थेत पडली होती आणि सुशिलाबाई केस मोकळे सोडलेल्या अवस्थेत तिच्या डोक्याजवळ बसल्या होत्या. त्या तिच्याकडे एकटक पाहत तिला कुरवाळत होत्या. “मिसेस सरदेशमुख! आर यु ओके?” असे म्हणत डॉक्टर कुलकर्णी सुशीलाबाईंकडे जाऊ लागल्या पण श्रीनिवास राजाध्यक्षने त्यांना अडवले. त्याबरोबर सुशीलाबाईंनी मान वळवुन त्यांच्याकडे पहिले आणि डॉक्टर कुलकर्णींच्या मनात धस्स झाले.

सुशीलाबाईंच्या चेहऱ्यात अमुलाग्र बदल झाला होता. त्यांच्या डोळ्यातील काळा भाग नाहीसा झाला होता आणि त्यांचे डोळे पुर्णपणे पांढरेफटक पडले होते. मान वाकडी करत त्या डॉक्टर कुलकर्णी बाईंकडे पाहत दात विचकत विचित्र हसल्या. त्यांचा तो अवतार पाहताच डॉक्टर कुलकर्णी प्रतिक्षिप्त क्रियेने चार पावले मागे सरकल्या. सुशीलाबाई पुढे सरकणाऱ्या श्रीनिवासला पाहुन पुरूषी आवाजात भेसूर किंचाळल्या, “श्रीनिवास राजाध्यक्ष, बरे झाले तु इथे आलास? तुझ्या पुर्वजांमुळे मी या आरशात शेकडो वर्षे बंदिस्त होतो पण आता मी बाहेर आलोय. तुझ्या पुर्वजांकडून मी बदला नाही घेऊ शकलो पण तुला मारून मी माझा बदला पुर्ण करेन.” आणि सुशिलाबाई श्रीनिवासचा गळा पकडण्यासाठी पुढे धावल्या. श्रीनिवासने आपल्याकडील इन्फ्रारेड लाईट त्यांच्या चेहऱ्यावर सोडला त्याबरोबर त्या किंचाळत पलंगाच्या मागे जाऊन लपल्या.

इन्फ्रारेड लाईटमुळे कनिष्कला सुर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांनी भाजल्यासारख्या वेदना झाल्या होत्या त्यामुळे तो आणखीनच चिडला. श्रीनिवासने आपल्या गळ्यातील रुद्राक्षांची माळ सुशीलाबाईंच्या अंगावर फेकली. ती माळ त्यांच्या अंगावर पडताच कनिष्क किंचाळत त्यांच्या शरीरातून बाहेर पडला आणि श्रीनिवासला धक्का मारत निघुन गेला. त्याबरोबर नुकतीच कॉलेज पासआऊट झालेली आणि थ्रिलची आवड असलेली, श्रीनिवास राजाध्यक्षची २१ वर्षाची एक असिस्टंट 'दिव्या', सुशीलाबाईंकडे धावली. तिने सुशीलाबाईंना सावरले. थोड्याच वेळात सुशिलाबाई भानावर आल्या पण त्यांचे सर्व शरीर जड झाले होते, आणि डोके कमालीचे दुखत होते. डॉक्टर कुलकर्णीनी त्यांची नाडी तपासली आणि त्यांना डोकेदुखी वरची एक गोळी दिली आणि पाणी पाजले. थोड्याच वेळात सुशीलाबाईंना हुशारी वाटू लागली.

लगेच डॉक्टर कुलकर्णीनी प्रियाला तपासले. तिची नाडी खुप मंद झाली होती, तिला तातडीने ट्रीटमेंटची गरज होती त्यामुळे त्यांनी प्रियाला आपल्या क्लिनिकमध्ये हलवण्यास सांगितले. श्रीनिवास राजाध्यक्षांनी आपले दोन असिस्टंट विकास आणि सुरेश त्यांच्या सोबत पाठवले. सुशिलाबाई देखील हट्टाने त्यांच्यासोबत गेल्या. ते सगळे गेल्यावर श्रीनिवासचे इतर सहकारी कामाला लागले, त्यांनी आपली हायटेक उपकरणे रूममध्ये सेट करायला सुरवात केली. हॅण्डहेल्ड अँड स्टॅटिक डिजिटल व्हिडीओ कॅमेरा प्रियाच्या पलंगासमोर लावला गेला. इ.एम.एफ रीडर दरवाज्याजवळ बसवला गेला. थर्मोग्राफिक इन्फ्रारेड मोशन सेन्सर्स सर्व रूममध्ये बसवले गेले. सोबत नाईट व्हिजन व्हिडीओ कॅमेरा पण सेट केला गेला. कोणत्याच उपकरणामध्ये कनिष्कच्या अस्तित्वाची रिडिंग्स मिळाली नाहीत पण इतर अनेक नवीन रिडिंग्स मात्र मिळत होती. याचे श्रीनिवासला आश्चर्य वाटले.

सुशीलाबाईंच्या अंगात शिरलेला कनिष्क श्रीनिवास वर हल्ला करतो पण तो अयशस्वी ठरतो. डॉक्टर कुलकर्णी प्रियाला आपल्या क्लिनिकमध्ये हलवण्यास सांगतात. श्रीनिवासचे सहकारी आपली उपकरणे प्रियाच्या रूममध्ये सेट करू लागतात. कनिष्कबद्दल श्रीनिवासकडून कळल्यावर त्याचे वडील काय प्रतिक्रिया देतात ते आता वाचुया...