मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग २ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 2 - Marathi Katha - Page 2

“कोण आहेस तु? का छळतोयस माझ्या लेकीला? तु इथून निघुन जा. माझ्या लेकीच्या केसाला पण मी धक्का लागु देणार नाही.” सुशिलाबाई कडाडल्या. त्यामुळे भडकलेल्या कनिष्कने आपले हिडीस रूप त्यासर्वांसमोर प्रकट केले. त्याला पाहताच सर्वांची बोबडीच वळली. सोबत आलेल्या नोकरांनी तर केव्हाच सुबाल्या केला होता (पळुन गेले होते). आजच्या आधुनिक जगात हे आत्मा, भुत वगैरे अस्तित्वात असते यावर त्यांच्यापैकी कोणाचाच विश्वास नव्हता पण कनिष्कला पाहताच सर्वांची मतीच गुंग झाली होती. कनिष्कच्या ज्या देखण्या रूपावर प्रिया भाळली होती तोच चेहरा आता इतका बिभत्स आणि भयानक दिसत होता की अचेतन पडलेली प्रिया तिथुन दूर जाण्यासाठी शरीरातील उरली सुरली ताकद गोळा करून दरवाज्याच्या दिशेने सरकु लागली. इतक्यात काही समजण्याआधीच हवेचा एका जोरदार लोट इतर सर्वांना दरवाज्याबाहेर लोटू लागला. त्याचा जोर एवढा प्रचंड होता की त्यांच्या पैकी कोणाचाच टिकाव लागला नाही आणि ते दरवाज्याबाहेर ढकलले गेले.

सावरून ते परत रूममध्ये जाण्याआधीच बाहेर पळण्याच्या प्रयत्नात असलेली प्रिया आत खेचली गेली. “आई, दादा मला वाचव!” हे प्रियाचे शब्द सरदेशमुखांच्या त्या प्रशस्त बंगल्यात घुमले आणि त्या पाठोपाठ दरवाजा बंद झाला. जणु काही प्रियाच्या रुमने तिला गिळंकृत केले होते. प्रिया, प्रिया! असे हाका मारत अमोल आणि सुशिलाबाई दरवाजा ठोठावू लागले पण नंतर काही प्रियाचा आवाज ऐकु आला नाही. प्रियाच्या रूममध्ये भयाण शांतता पसरली. झाल्या प्रकाराने सर्वचजण प्रचंड हादरले होते. प्रियाच्या काळजीने सुशीला बाईंच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. मुलीच्या काळजीने ती माउली टाहो फोडत होती. “अमोल माझ्या प्रियाला वाचव रे! तिला परत आण. तो सैतान माझ्या प्रियाचे हाल हाल करेल रे! माझी पोरगी, काय रे हे तिच्या नशिबी आले?” सुशीला बाईंचा आक्रोश पाहावत नव्हता. कुलकर्णी मॅडम डॉक्टर असुनही सुन्न झाल्या होत्या. काय बोलावे, काय करावे तेच त्यांनाही सुचेना. प्रियाला वाचवण्यासाठी लवकरात लवकर हालचाली करणे आवश्यक आहे हे त्यांनी ताडले. थोड्या वेळाने भानावर आलेल्या कुलकर्णी मॅडमनी सुशीलाबाईंना धीर दिला आणि त्यांच्या ओळखीच्या एका पॅरानॉर्मल एक्स्पर्टना फोन लावला.

डॉक्टर कुलकर्णीनी पॅरानॉर्मल एक्स्पर्ट श्रीनिवास राजाध्यक्ष यांना घडलेल्या प्रकाराची फोनवर थोडक्यात माहिती दिली आणि सरदेशमुखांचा पत्ता दिला व त्या आपल्या क्लिनिकला निघुन गेल्या. दुपारी ठीक तीन वाजता त्या सरदेशमुखांच्या बंगल्यावर परतल्या त्यांच्या पाठोपाठ रुबाबदार व्यक्तिमत्व लाभलेला एक देखणा तरुण आपल्या पॅरानॉर्मल टीम सोबत आवश्यक ते साहित्य जसे इ.एम.एफ. रीडर, इ.व्ही.पी रेकॉर्डर, डिजिटल थर्मामीटर, हॅण्डहेल्ड अँड स्टॅटिक डिजिटल व्हिडीओ कॅमेरा, थर्मोग्राफिक इन्फ्रारेड मोशन सेन्सर्स, नाईट व्हिजन व्हिडीओ कॅमेरा, डिजिटल ऑडिओ रेकॉर्डर आणि लॅपटॉप्स घेऊन तिथे आला. श्रीनिवासने घोस्ट हंटिंग मधील पहिली स्टेप सुरु केली ती म्हणजे माहिती गोळा करणे. डॉक्टर कुलकर्णी आणि सुशीलाबाईंशी झालेल्या चर्चेतुन त्याला कळले की तो आत्मा कनिष्क नावाच्या कोणा राजाचा होता, जो प्रियाचा लैंगिक छळ करत होता. याचा अर्थ तो प्रकार पॅरानॉर्मल सिडक्शन अँड अब्युझचा होता. तो आत्मा चांगलाच शक्तिशाली होता. तसेच येत्या अमावास्येला तो प्रियाला आपल्या सोबत घेऊन जाण्याच्या तयारीत होता म्हणजेच प्रियाच्या आयुष्याला धोका होता. हाती असलेला वेळ फार कमी होता, अवघा एक दिवस, कारण दुसऱ्या दिवशी रात्री अमावस्या सुरु होणार होती. श्रीनिवास राजाध्यक्षच्या चेहऱ्यावर काळजी पसरली.

कारण पॅरानॉर्मल सिडक्शन अँड अब्युझ या प्रकारात व्हिक्टीम वाचण्याची शक्यता फार कमी असते. वासनेने पिसाळलेला अतृप्त आत्मा आपल्या झाडाचा (व्हिक्टिमचा) जीव घेऊनच थांबतो, त्यानंतर नवा बळी आणि पुढेही हे अघोरी सत्र सुरूच राहाते. त्या शक्तीशी निपटण्यासाठी केवळ मॉडर्न टेक्निकच नव्हे तर आध्यात्मिक मदतही लागेल हे श्रीनिवास राजाध्यक्ष जाणुन होता. त्याच्याकडील गॅजेट्सनी तो आत्म्याचे अस्तित्व पाहू शकत होता, पण त्याला वश करण्यासाठी त्याची साधना, मंत्र तंत्र याचीच जास्त गरज पडणार होती. त्याच्या पिढ्यानपिढ्या हेच काम साधनेच्या जोरावर करीत असल्यामुळे त्याच्या गाठीशी पुर्वजांचे अनुभव, लहानपणापासून केलेली साधना आणि मॉडर्न टेकनॉलजी अशी तिहेरी ताकद होती. कोणतीही कृती करण्याआधी त्याला राजा कनिष्कची माहिती मिळवणे गरजेचे होते. ज्याच्याशी पंगा घ्यायचा त्याची सगळी माहिती हाती असल्याशिवाय कोणतीही गोष्ट केल्यास ती आपल्या अंगलट येऊ शकते हे तो अनुभवाने जाणत होता. का कुणास ठाऊक त्याला राहुन राहुन राजा कनिष्क हे नांव आपण कुठे तरी वाचले किंवा ऐकले आहे असे वाटत होते.

प्रियाच्या आईच्या बोलण्याने भडकलेला कनिष्क स्वतःचे मुळ रूप दाखवतो, आणि सर्वाना प्रियाच्या रूमच्या बाहेर ढकलून देतो. डॉक्टर कुलकर्णी पॅरानॉर्मल एक्सपर्ट श्रीनिवास राजाध्यक्ष्यला फोन करतात. तो आपल्या सहकाऱ्यांसह आधुनिक उपकरणे सोबत घेऊन येतो आणि सर्व परिस्थिती समजावून घेऊ लागतो. श्रीनिवास राजाध्यक्षचा कनिष्कशी सामना होतो तेव्हा काय घडते ते आता वाचुया...