मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग १

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग १ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 1 - Marathi Katha - Page 6

आरशामध्ये पलंगाचे आणि त्यावर झोपलेल्या प्रियाचे विलोभनीय प्रतिबिंब पडले होते. प्रियाचा डोळा लागतो न लागतो तोच आरशामध्ये कनिष्कचा चेहरा दिसु लागला. तो प्रियापर्यंत पोहोचु शकत नव्हता पण त्याने आपले कुटील खेळ सुरु केले. प्रियाला कामुक स्वप्ने पडू लागली. आपल्या स्वप्नात एक देखणा राजबिंडा तरुण आपल्यासोबत प्रणय करत असल्याचे तिला दिसत होते. तो तरुण दुसरा कोणी नसुन कनिष्कच होता. स्वप्न तुटताच ती जागी झाली तेव्हा रात्रीचे तीन वाजले होते. तिचा उर धपापत होता आणि ती खोल उष्ण उच्छवास सोडत होती. हे असले स्वप्न आपल्याला आजच कसे पडले? याचे तिला आश्चर्य वाटले. महत्प्रयासाने तिने आपल्या श्वासावर ताबा मिळवला. पाणी पिण्यासाठी तिने हात पुढे केला तर पाण्याचा जग आपसुक तिच्याकडे सरकला. आपल्याला भास तर नाही ना झाला असा विचार करत ती डोळे चोळू लागली. भासच असेल असे म्हणुन तिने चांदीच्या भांड्यातील पाणी पिण्यास सुरवात केली. आपल्या सभोवती कुणाचे तरी अस्तित्व असल्यासारखे तिला जाणवु लागले.

तिने सभोवार नजर टाकली पण काहीच दिसले नाही. पण हवा तिच्या केसांना हलकेच उडवत होती तिच्या शरीराभोवती फेर धरल्यासारखा स्पर्श करून जात होती. प्रियाला हे सगळे जरा विचित्र वाटू लागले होते. तिच्या मनात थोडी भीतीही निर्माण झाली. अंगावर ब्लॅंकेट ओढून ती पुन्हा झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागली. डोळे मिटताच परत तिला कनिष्कचा चेहरा दिसु लागला. तसे तिने पटकन डोळे उघडले. ती स्वत:शीच बोलु लागली, “कोणाचा चेहरा आहे हा? राजा यशवर्धनाचा तर नव्हे? त्याचा आरसा आपल्याकडे आल्यामुळे तर हे होत नसेल?” त्या विचाराबरोबर तो आरसा थरथरल्यासारखे तिला जाणवले. “शीऽऽऽ बाई! आज काय सारखे सारखे भास होत आहेत मला?” ती स्वतःशीच म्हणाली.

डोक्यात उठलेल्या प्रश्नांच्या थैमानाने ती वेडीपिशी झाली. न राहवुन तिने आपल्या अंगावरील ब्लॅंकेट दूर केले आणि लाईट लावला. ती पुन्हा त्या आरशाकडे गेली. तो आरसा मोठ्या कौशल्याने एका स्टॅन्डवर बसवला होता. जेणेकरून जरी तो मोठा व वजनदार असला तरी कोणी सामान्य माणूसही आपल्याला हवे तसे त्या आरशाला वळवु शकत होता. ती पुन्हा बारकाईने त्या आरशाचे निरीक्षण करू लागली. तिला माहीत होते की आरशावर कुठे तरी काही तरी नक्कीच लिहिले असले पाहिजे. खुणा, चिन्हे किंवा काहीतरी माहिती एखाद्या सांकेतिक भाषेत कुठेतरी लिहिली असणारच याची तिला खात्री होती. ती अधीरतेने त्या आरशावर शोधु लागली. तिची अधीरता काचेत बंदिस्त असलेल्या कनिष्कला सुखावत होती.

आपली योजना यशस्वी होणार याची त्याला खात्री पटली. मुक्ती आता त्याच्यापासुन अगदी काही क्षणांवर येऊन ठेपली होती. प्रिया आरशाच्या केवळ पुढच्या भागावरच लक्ष केंद्रित करत होती तिला आरशाच्या मागे जाण्यासाठी उद्युक्त करणे आवश्यक होते. अचानक तो आरसा नव्वद अंशात पुढे झुकला आणि त्याच्या पाठीमागे कोरलेल्या अक्षरांकडे प्रियाचे लक्ष वेधले गेले. आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. “आय गॉट इट!” म्हणत तिने आरसा सरळ केला आणि त्याच्या पाठीमागे गेली. कोरलेल्या अक्षरांना वाचायचा प्रयत्न करू लागली. तिच्या लक्षात आले की ती अक्षरे म्हणजे संस्कृत मध्ये लिहिलेले दोन श्लोक आहेत पण त्यांचा अर्थ काय आहे हे ते श्लोक वाचल्यावरच कळणार होते. एवढ्यात तिचे लक्ष आरशामागे खुबीने बनवलेल्या एका चोर कप्प्याकडे गेले. नक्कीच यात काहीतरी अमुल्य वस्तु किंवा काहीतरी माहिती लपवलेली असली पाहिजे असा विचार तिच्या मनात आला.

प्रियामार्फत आरशातून आपली सुटका व्हावी यासाठी कनिष्क कुटील डाव खेळू लागतो. कामुक स्वप्नांमुळे पुरती बेचैन झालेली प्रिया आरशाचे बारकाईने निरीक्षण करू लागते. आरशावर तिला दोन संस्कृत श्लोक व एक गुप्त कप्पा आढळतो. काय असते त्या कप्प्यात? कनिष्कची आरशातून मुक्तता होते का ते आता पुढे वाचुया...