मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग १

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग १ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 1 - Marathi Katha - Page 5

रात्री नऊ वाजता दुकान बंद करून दोन्ही भावंडे घरी परतली. जेवण तयार होते त्यामुळे त्यांच्या आईने दोघांना पटकन फ्रेश होऊन जेवायला येण्यास सांगितले. अमोल पाचच मिनिटात आला पण पंधरा मिनिटे झाली तरीही प्रिया खाली न आल्यामुळे सुशीलाबाईंनी अमोलला तिला हाक मारण्यास सांगितले. दोन - तीन हाका मारून सुद्धा प्रियाने प्रतिसाद न दिल्यामुळे, तो जिना चढुन तिच्या रूममध्ये गेला. प्रिया भान हरपून त्या आरशाचे अवलोकन करत असलेली त्याला दिसली. त्याच्यावरील सुंदर कोरीव कामावरून आपली नाजुक बोटे फिरवताना आपला मोठा भाऊ आपल्या पाठीमागे उभा आहे याचेही तिला भान उरले नव्हते. ती बारकाईने त्या आरशाचे निरीक्षण करत होती. अमोलने आवाज दिल्यावर प्रिया एकदम दचकलीच. मग स्वतःला सावरत म्हणाली, “थँक्स दादा, इतकी सुंदर भेट दिल्याबद्दल! किती सुंदर कोरीवकाम आहे याच्यावर! विश्वास नाही बसत की हा आरसा शेकडो वर्ष जुना आहे म्हणून. अगदी नवीन असल्यासारखा वाटतोय. आपले नशीबच म्हणायचे की राजा यशवर्धनाच्या काळातील हा मौल्यवान आरसा आपल्याला मिळाला तोही नाममात्र किमतीत. अरे याची किंमत हजारात नाही लाखात आहे लाखात, आहेस कुठे?”

“खरंच त्या काळच्या कारागीरांना मानले पाहिजे. प्रगत तंत्रज्ञान नसताना देखील किती सुंदर बारीक काम केलंय त्यांनी!” भान हरपुन ती त्या आरशाबद्दल बोलत होती. आपल्या बहिणीला याआधी कधी एवढे उत्तेजित झालेले अमोलने पहिले नव्हते त्यामुळे आपण हा आरसा विकत घेऊन एकदम योग्य काम केले असा विचार त्याच्या मनात तरळून गेला. तेवढ्यात सुशीलाबाईंची हाक कानावर आली आणि ते दोघेही भानावर आले. आरशावरील पडदा तसाच जमिनीवर सोडून ते दोघे जेवायला खाली गेले. जाता जाता प्रियाची नजर त्या आरशाकडे गेली आणि एक चेहरा त्या आरशात तरळून गेला. आपल्याला भास तर नाही ना झाला या विचारात प्रिया, अमोल पाठोपाठ डायनिंग हॉल मध्ये गेली.

प्रियाच्या आरशाला झालेल्या स्पर्शामुळे आरशात बंदिस्त असलेल्या कनिष्कच्या आत्म्याला नवी उमेद मिळाली होती. स्त्री सुखासाठी आसुसलेला कनिष्कचा आत्मा प्रियाला आकर्षित करून आपली मुक्तता करून घेण्यासाठी कोणता उपाय करता येईल याचा विचार करू लागला. रात्री जेवण झाल्यावर शतपावली न करता प्रिया थेट आपल्या रूममध्ये आली आणि तिची नजर आरशातील आपल्या प्रतिबिंबावर पडली. आज नव्यानेच ती स्वतःला पाहत होती. तिला तिच्या सौंदर्याची आज नव्याने ओळख होत होती. एकटक ती आपल्या प्रतिबिंबाकडे पाहत होती. कोणत्याही पुरुषाला वेड लावेल असे तिचे सौंदर्य होते. इतकी वर्ष केवळ आपला व्यवसाय वाढवण्याचाच विचार सतत तिच्या मनात असायचा. पण आज अचानक तिला आपल्या आयुष्यात कोणीतरी देखणा युवक यावा आणि त्याने आपल्याला प्रेमाच्या वर्षावात चिंब भिजवुन टाकावे असे वाटू लागले.

नकळत ती कॉलेज मध्ये तिच्या मागे मागे असणाऱ्या मुलांचे चेहरे आठवु लागली. तिचेही आता लग्नाचे वय झाले होते. अशोकराव जीवंत असते तर एव्हाना त्यांनी तिच्यासाठी स्थळ पाहायला सुरवातही केली असती. अमोलकडुन तशी अपेक्षा करण्यात काही अर्थ नव्हता. शेवटी एक उसासा सोडत ती झोपण्याच्या तयारीला लागली. गुलाबी रंगाचा तलम रेशमी गाऊन तिने परिधान केला आणि आरशातील आपल्या प्रतिबिंबाला ‘गुड नाईट’ म्हणत ती पलंगावर पहुडली. एसी सुरु नसतानाही तिच्या रूमचे तापमान थोडे कमी झाल्याचे तिला जाणवले. तिची नाजुक काया थंडीने शहारली आणि तिने पलंगावरील मऊ ब्लॅंकेट आपल्या अंगावर ओढले.

इतका पुरातन आणि सुंदर असा आरसा अत्यंत अल्प किंमतीत मिळाल्यामुळे प्रिया खुप खुश होते. आरशाबद्दल ती अमोलशी भरभरून बोलते. कनिष्कच्या प्रभावामुळे त्या आरशात पाहिल्यावर तिला तिच्या सौंदर्याची जाणीव होते आणि तिच्या मनात आपल्या लग्नाचे विचार घोळू लागतात. पुढे काय घडते ते आता पुढे वाचुया...