मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग १

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग १ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 1 - Marathi Katha - Page 4

स्वतःतच हरवलेल्या अमोलच्या कानात कोणी तरी सतत कुजबुजत होते, “ही संधी सोडू नकोस! हा आरसा विकत घे!” इतका सुंदर आरसा लवकरात लवकर आपला बनवण्यासाठी अमोल प्रचंड आतुर झाला होता. तो अवजड आरसा त्या कपड्याने झाकुन आपल्या दोन्ही नोकरांच्या मदतीने त्याने खाली आणला. “काय अपेक्षा आहे तुमची?” अमोलने त्या माणसाला विचारले. “पाच हजार.” तो माणूस उत्तरला. इतके सुंदर कोरीवकाम केलेल्या आणि एकदम नवा दिसणाऱ्या त्या आरशाचे कोणीही हसत हसत तीस हजार देईल आणि हा वेडा पाच हजार मागतोय असा विचार अमोलच्या मनात आला. अजून थोडा स्वस्तात मिळतो का ते पाहु असा विचार करून अमोल म्हणाला, “पाच हजार मलाच मोठ्या मुश्किलीने मिळतील आणि या एवढ्या मोठ्या आरशाला गिऱ्हाईक मिळणेही कठीण आहे. किती दिवस विकायला लागतील कोणास ठाऊक? दुकानातील जागाही अडून बसेल. मी जास्तीत जास्त तीन हजार देऊ शकेन.” अजिबात घासाघीस न करता तो माणूस चालेल म्हणाला. “डील” असे म्हणून अमोलने त्याच्याशी हात मिळवला आणि त्याला तीन हजार रुपये दिले.

तोपर्यंत अमोलच्या नोकराने पावती करून तिच्यावर रिसिव्हडचा शिका मारून त्या माणसाची सही आणि पत्ता घेतला. आरशाला उचलुन आपल्या गाडीत ठेवल्यावर दोन्ही नोकर त्याला पॅकिंग लावु लागले. पैसे मोजुनही न घेता त्या माणसाने खिशात घातले आणि तिथुन लगबगीने जाऊ लागला. त्याची सुरवातीपासुन सुरु असलेली घाई अमोलला चांगलीच खटकली होती त्याने त्या माणसाला अडवले. “या आरशाच्या इतिहासाबद्दल काही सांगा ना!” असे त्याने त्या माणसाला म्हणताच उत्तरादाखल तो एवढेच म्हणाला, “हा आरसा राजा यशवर्धनाच्या पिढ्यांनी आजवर सांभाळला आहे. या हवेलीत राजाची शेवटची पिढी जळुन खाक झाली. मी नोकर माणूस, या आरशाला मी नाही सांभाळू शकणार म्हणून हा विकुन आपल्या गावी चाललो आहे. मला एवढेच माहित आहे, मला जाऊ द्या.” असे म्हणुन तो माणूस लगबगीने निघुन गेला सुद्धा.

इतका सुंदर आरसा कवडीमात्र भावात मिळाल्यामुळे अमोल खुश झाला होता. खुशीतच तो आरसा घेऊन आपल्या दुकानात परतला. आल्या आल्या त्याने तो आरसा पाहण्यासाठी आपल्या बहिणीला बोलावले. उत्तम स्थितीतील तो आरसा केवळ तीन हजार रुपयांमध्ये मिळवल्यामुळे प्रिया खुश होईल असे अमोलला वाटले. पण प्रियाच्या चेहऱ्यावरील भाव पाहुन तो विचारात पडला. आपण मौल्यवान समजून एखादा सामान्य आरसा आणला की काय? गेले बहुतेक तीन हजार रुपये पाण्यात! असा विचार त्याच्या मनात आला. प्रियाने त्याला तो आरसा कुठे मिळाला? असे विचारले तेव्हा त्याने झालेला सगळा प्रसंग तिला सांगितला. तसे तिलाही आश्चर्य वाटले. काही तरी गडबड आहे असे तिचे मन तिला सांगत होते. पहिल्यांदाच तिला एखाद्या वस्तुविषयी अशी विचित्र भावना होत होती.

ती रागावू नये म्हणून अमोलने तो आरसा तिच्यासाठी भेट म्हणून घेतल्याचे सांगितले व तो घेण्यासाठी तिला गळ घालू लागला. शेवटी तिने त्याचा हट्ट मान्य केला व आरसा आपल्या रूममध्ये हलवण्यास सांगितले. का कुणास ठाऊक तिचे मन मात्र बेचैन झाले होते. आरसा पाहिल्यापासुन प्रिया सतत त्याचाच विचार करत होती. त्या आरशाबद्दल आपल्याला एवढे कुतुहल का वाटत असावे हेच तिला समजेना. कधी एकदा घरी जाऊन तो आरसा पाहाते असेच तिला झाले होते. पण त्याचवेळी तिचे मन तिला धोक्याची सुचना देखील देत होते त्यामुळे ती जास्तच संभ्रमित झाली होती.

आपल्या बहिणीच्या चेहऱ्यावरील भाव पाहून संभ्रमित झालेला अमोल तिने रागावू नये म्हणुन राजा यशवर्धनाच्या काळातील प्राचीन आरसा तिलाच भेट देतो. त्या आरशामुळे प्रियाच्या आयुष्यात कोणते वादळ येते ते आता पुढे वाचुया...