मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग १

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग १ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 1 - Marathi Katha - Page 3

त्या वाड्याच्या करकरत उघडणाऱ्या अवाढव्य दरवाजातुन ते चौघे आत गेले. वाडा आतुन बहुतांश जळुन गेला होता. आतमध्ये कोणतेच सामान नसल्याचे पाहुन अमोल बुचकळ्यात पडला. त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव ओळखून तो माणूस त्याला म्हणाला, “माझ्या साहेबांनी हा वाडा जुना आणि जीर्ण झाल्यामुळे सोडायचा निर्णय घेतला होता पण वाडा सोडण्याच्या आदल्या रात्रीच वाड्यात मोठी भीषण आग लागली आणि त्या आगीत साहेब, त्यांचे कुटुंब, नोकर व सर्व सामान जळुन गेले. फक्त एक आरसा कसा काय तो वाचला आहे. त्या दिवशी मी कामानिमित्त बाहेर होतो त्यामुळे सुदैवाने वाचलो. माझी नोकरी तर गेली, आता हा आरसा विकुन जे काही पैसे मिळतील ते घेऊन आपल्या गावी जाऊन राहायचा माझा विचार आहे”.

“आपण व्यवहार फायनल करू म्हणजे मी माझ्या गावी जायला मोकळा. थोडेफार कमी पैसे दिलेत तरी चालेल पण हा आरसा तुम्ही आजच्या आज घेऊन जा.” वाड्यात घडलेली दुर्घटना आणि त्या माणसाला आरसा विकायची असलेली प्रचंड घाई पाहुन अमोलच्या मनाने परत धोक्याची सुचना दिली. पण तिच्याकडे दुर्लक्ष करून अमोलने तो आरसा दाखवण्याची विनंती केली. अमोलला जिन्याने वर नेत त्या माणसाने एका बंद रुमसमोर आणले. तो आरसा आत आहे तुम्ही पाहुन खात्री करून घ्या, मी खाली आहेच असे म्हणुन तो माणूस जिना उतरून खाली गेला पण. त्याचे वागणे अमोल आणि त्याच्या नोकरांना संशयास्पद वाटले. नोकरांनी अमोलला परत चलण्याबद्दल सुचवले पण जर आरसा खरोखर मौल्यवान असेल तर कमी किमतीत विकत घेऊन चांगला नफा मिळवता येईल असा विचार करून अमोलने त्या रूमचा दरवाजा ढकलला.

दरवाजा उघडेना म्हणून अमोल व त्याच्या नोकरांनी थोडा जोर लावला. तो दरवाजा त्यांच्या डोळ्यादेखत खाली कोसळला आणि जळकट हवेचा भपकारा व काजळी त्या तिघांच्या नाकात शिरली आणि तिघेही खोकू लागले. श्वास सुरळीत झाल्यावर अमोलने त्या रूमच्या आतमध्ये नजर टाकली. सगळीकडे आगीच्या ज्वाळांनी भस्मसात झालेल्या वस्तुंच्या राखेचे ढीग पडले होते. अमोलसकट त्या दोन्ही नोकरांचीही नजर त्या आरशाला शोधत होती. लवकरात लवकर तो आरसा घेऊन तिथुन बाहेर पडावे असा विचार मनात रुंजी घालत असल्यामुळे त्या नोकरांनी अमोलला घाई करण्यास सुचविले, तसे अमोल पुढे झाला. आत गेल्यावर एका कोपऱ्यात त्याला कपड्याने झाकुन ठेवलेले काही तरी दिसले. आकारावरून तो तोच आरसा असावा असा त्याने तर्क लावला. अमोल त्या आरशाच्या दिशेने जाऊ लागला. त्याचे नोकर सगळीकडे नजर फिरवत सावधपणे आपल्या मालकाच्या मागुन जाऊ लागले.

अचानक सर्वात शेवटी असलेल्या नोकराची पॅन्ट कशाला तरी अडकली आणि पायाला ओढ जाणवल्यामुळे त्याने खाली पहिले. त्याची पॅन्ट एका सापळ्यांच्या बोटांना अडकली होती आणि नोकराच्या पुढे जाण्यामुळे राखेच्या ढिगातून तो सापळा बाहेर खेचला गेला होता. त्या सापळ्याला पाहताच तो नोकर तोंडावर उलटा हात धरून बोंब मारू लागला. अमोलने त्याला कसाबसा शांत केला आणि ते आरशाच्या दिशेने पुढे सरकु लागले. वाड्यातील एकुण एक चीज वस्तू जळून गेली असताना हा आरसाच कसा काय वाचला? आणि त्याच्यावरील हा कपडा एवढ्या भीषण आगीत कसा काय टिकला? असा विचार करत अमोलने त्या आरशावरील कपडा बाजूला केला. शिसवी लाकडापासुन बनवलेल्या फ्रेमवर केलेले अप्रतिम असे कोरीवकाम पाहुन अमोलच्या तोंडुन नकळत निघुन गेले, “अमेझिंग”. दिड ते दोन इंच जाडीचा तो आरसा अगदी नवा असल्यासारखा भासत होता. ना कुठे तुटफूट झाली होती ना पारा उडाला होता. काचेची चमक अचंबित करणारी होती आणि लाकडावरील कोरीवकाम तर अप्रतिम होते. झाडे, प्राणी, वेली, फळे, फुले अशा विविध गोष्टी त्या फ्रेमवर कोरल्या होत्या. अमोलने स्वतःचे प्रतिबिंब त्या आरशात पहिले आणि पाहतच राहिला. पिळदार शरीरयष्टी असलेला मुळचा देखणा अमोल त्या पुर्णाकृती आरशात जास्तच रुबाबदार दिसत होता.

पुर्णपणे भस्मसात झालेल्या त्या वाड्यात केवळ तो आरसा आणि त्याच्यावरील कापड तेवढाच काय तो वाचला होता? त्या आरशाभोवती एवढे गुढ निर्माण झाले असताना अमोल तो विकत घेतो का? त्या आरशाबद्दल त्याला काय माहिती मिळते ते आता पुढे वाचुया...