मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग १

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग १ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 1 - Marathi Katha - Page 2

असेच दिवसांमागुन दिवस जात होते. एके रात्री घरी खुप उशिरा परतलेल्या अमोलची त्याच्या बेजबाबदार वागण्याबद्दल खरडपट्टी काढत असतानाच अशोकरावांच्या छातीत एक जीवघेणी कळ उठली आणि छाती हाताने दाबुन धरत ते खाली कोसळले. प्रिया आणि अमोलने त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये भरती केले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आणि सरदेशमुख परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. वडील गेल्यामुळे प्रिया एकदम एकाकी पडली. तिचा आधारच मोडून पडला होता. घराची आणि व्यवसायाची जबाबदारी अचानक तिच्या एकटीच्या शिरावर पडली.

वाईटातुन एक चांगली गोष्ट घडली ती ही, की अमोल आपल्या वडीलांच्या जाण्याने प्रचंड हादरला होता. वडीलांच्या मृत्यूला अप्रत्यक्षपणे आपणच जबाबदार असल्याची बोच त्याच्या मनाला लागली होती आणि नकळत त्याच्यातील उडाणपणा जाऊन तो एका जबाबदार मुलासारखा वागू लागला. घरात आणि व्यवसायात तो आता लक्ष घालु लागला होता. आपल्या लहान बहिणीच्या सल्ल्याने तो व्यवसायाचे कसब आत्मसात करू लागला होता. अमोलला हीच जाणीव अशोकराव जीवंत असताना झाली असती तर किमान ते सुखाने तरी गेले असते. पतीच्या मृत्यूला आपले आंधळे पुत्रप्रेमही तितकेच जबाबदार होते याची खंत सुशीलाबाईंचे अंतःकरण पिळवटुन टाकत होती. अशोकरावांचा अकाली मृत्यू घरातील प्रत्येक सदस्याला हादरवून गेला होता. प्रत्येकजण त्या दुःखातुन सावरण्यासाठी एकमेकाला मदत करत होता. त्या दुःखद घटनेमुळे नकळत ते तिघेही एकमेकांच्या जास्तच जवळ आले होते.

अशोकरावांच्या मृत्यूला आता तीन महिने उलटुन गेले होते. “जन पळभर म्हणतील हाय हाय!” या उक्तीनुसार सरदेशमुख परिवार सर्व काही विसरून आपल्या दैनंदिन कामात व्यग्र झाला. अमोल आपल्या लहान बहिणीच्या खांद्याला खांदा लावून मेहनत घेत होता. हळू हळू तोही तयार होत होता. असेच एक दिवस एक माणूस त्यांच्या दुकानात आला. त्यावेळी प्रिया नोकरांच्या मदतीने स्टोअरमध्ये ठेवलेल्या वस्तुंची मोजदाद करत होती. अमोल काऊंटर सांभाळत होता. त्या माणसाने आपल्याजवळ एक सुंदर नक्षीकाम केलेला शेकडो वर्ष जुना सहा फुटी शिसवी आरसा असल्याचे सांगितले. अमोलने प्रियाला तो कस्टमरसोबत एक जुना आरसा बघण्यासाठी त्याच्या घरी जात असल्याचे सांगितले. तिनेही त्याला संमत्ती दर्शवली. नीट विचारपुर्वक व्यवहार कर असे सांगुन ती पुन्हा कामात व्यग्र झाली.

अमोलने एका नोकराला काऊंटर सांभाळायला सांगितले व दोन नोकरांना सोबत घेऊन तो बाहेर पडला. बराच वेळ गाडी चालवल्यावर ते सर्व एका जुनाट वाड्याजवळ आले. जंगलाच्या रस्त्याला इतका मोठा वाडा असेल असे अमोलला स्वप्नातही वाटले नव्हते. डोळे वासुन तो मोठा वाडा पाहत होता. वाड्याच्या गेटमधून त्याची गाडी आत शिरताच अचानक त्याला त्याच्या मनावर कसलेतरी दडपण जाणवू लागले. कोणीतरी दबक्या आवाजात त्याला हाक मारत आहे, त्या वाड्याकडे बोलवत आहे असे वाटू लागले. पण त्याच वेळी ‘त्या क्षणाला तिथून निघुन जा!’ असे त्याचे मन त्याला ओरडून सांगु लागले. पण तो कुजबुजणारा आवाज आणि जुना आरसा पाहण्याचे कुतूहल त्याला त्याच्या मनाविरुद्ध त्या वाड्याकडे खेचत होते.

अमोलला सुधारण्याच्या नादात अशोकराव अचानक निवर्तले. पण तो सुधारला, हे ही नसे थोडके. धोक्याची सूचना देत असलेल्या अंतर्मनाला डावलून अमोल आरसा पाहायला जातो. तो आरसा पाहिल्यावर अमोलची काय प्रतिक्रिया होते ते आता पुढे वाचुया...