मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग १

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग १ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 1 - Marathi Katha

शेकडो वर्षे आरशात कैद असलेल्या एका राजाच्या अतृप्त आत्म्याला, प्रिया सरदेशमुख अनावधानाने मुक्त करते आणि सुरु होतो वासनेचा जीवघेणा खेळ. त्या आत्म्याच्या तावडीतून तिच्या सुटकेची रहस्यमयी कहाणी म्हणजेच मिरर - मिरर अ टेल ऑफ टेरर.

प्रिया, नावाप्रमाणेच सर्वांना प्रिय असणारी पंचवीस वर्षांची एक चुणचुणीत आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाची सुंदर युवती. आरसपानी सौंदर्य लाभलेली आणि सदैव हसतमुख असणारी प्रिया, आपल्या लाघवी बोलण्याने सर्वांचेच मन जिंकुन घेत असे. तिच्या वडीलांचे अँटिक वस्तुंचे खरेदी - विक्रीचे मोठे दुकान होते. जुन्या वाड्यांचे किंवा घरांचे जेव्हा लिलाव होत असत तेव्हा त्यातील मौल्यवान वस्तु ते खरेदी करत आणि आपल्या दुकानात विकायला ठेवत असत. लोक देखील त्यांच्याकडे आपल्याकडील वस्तु तारण ठेवायला किंवा विकायला येत असत. केवळ वस्तु पाहण्यासाठी आलेल्या माणसालाही आपल्या गोड बोलण्याने काही ना काही विकत घ्यायला लावण्याचे तिचे कसब वाखाणण्याजोगे होते.

तिच्या या गुणाला पारखुन तिचे शिक्षण पुर्ण झाल्यावर तिच्या वडीलांनी आपल्या पिढीजात व्यवसायाची सुत्रे आपल्या मोठ्या मुलाच्या, अमोलच्या हाती न देता प्रियाच्या हातात दिली होती. कोणती गोष्ट किती किमतीत खरेदी केली पाहिजे आणि ती विकून त्यातून किती फायदा कमावता येईल याची उपजत जाण प्रियाला आपल्या वडीलांकडुन वारशात मिळाली होती. क्वचितच त्यांना एखाद्या व्यवहारात नुकसान होत असे. दोन - तीन वर्षातच प्रियाने या धंद्यातील खाचा खोचा शिकुन घेतल्या. आता मोठे व्यवहारही ती न घाबरता एकटीने करू लागली होती. जुन्या वस्तुंबद्दलचे तिचे ज्ञान आणि सखोल माहिती समोरच्याला तोंडात बोट घालायला लावत असे. वस्तु खरी आहे की नकली हे ती सहजतेने सप्रमाण सिद्ध करत असे.

प्रियाचा भाऊ अमोल, हा सुरवातीपासुनच थोडासा खुशाल चेंडू वृत्तीचा होता. भरपेट खायचे, जिम मध्ये व्यायाम करायचा आणि बुलेटवर मित्रांसोबत गावभर हिंडायचे एवढाच काय तो त्याला छंद होता. तो केवळ वडीलांच्या धाकामुळे दुकानात प्रियाला मदत करत असे. वडील एखाद्या व्यवहारासाठी दुकानाबाहेर पडले की अमोल बुलेटला किक मारून गायब झालाच म्हणुन समजा. अशोक सरदेशमुखांनी साम, दाम, दंड, भेद सर्व प्रकार वापरून पाहिले पण अमोलच्या स्वभावात आणि वृत्तीमध्ये काडीचा फरक पडला नाही. सुदैवाने तो त्याच्यापेक्षा कर्तृत्ववान असलेल्या धाकट्या बहिणीचा द्वेष करत नव्हता, हीच काय ती त्यांच्यासाठी जमेची बाजू होती. उलट तिच्यावर त्याचा खुप जीव होता आणि तो तिच्यासाठी काहीही करायला तयार असायचा. कामात मात्र त्याचे लक्ष लागत नसे त्यामुळे अशोकराव त्याच्यावर कोणतीही जबाबदारी टाकायला कचरत असत.

अमोलच्या जागी आपल्याला दुसरीही मुलगीच असती तर बरे झाले असते असे त्यांना राहुन राहुन वाटत असे. काही बोलायला गेले तर त्यांच्या पत्नी सुशीलाबाई दरवेळी अमोलला पदराआड करत असत याचा त्यांना खुप राग येत असे. त्यांच्या लाडाने तो अधिकच बिघडत चालला होता, हे त्यांच्या लक्षातच येत नव्हते. अशाने त्याला त्याच्या जबाबदारीचे भान कधी येणार हा विचार अशोकरावांना अस्वस्थ करत असे. अठ्ठावीस वय झालेल्या अमोलला अजुन लहान आहे, येईल समज असे त्या कसे म्हणु शकतात याचे अशोकरावांना नवल वाटत असे. पिता - पुत्रामध्ये या मुद्द्यावरून सतत शीतयुद्ध सुरु असे. अमोलच्या काळजीने अशोकरावांना रात्र रात्र झोप लागत नसे पण प्रियाकडे पाहुन ते स्वतःची समजुत काढत असत की त्यांच्यामागे तिच त्यांच्या व्यवसायाला आणि घराला समर्थपणे सांभाळेल.

कथेतील नायिका आणि तिच्या कुटुंबाची ओळख तर झाली, बाकीची पात्रेही कथा पुढे सरकेल तशी समोर येतीलच. अमोल सुधारतो का? त्याला त्याच्या जवाबदारीची जाणीव होते का ते आता पुढे वाचुया...