लग्न पहावे करुन

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३१ ऑक्टोबर २०१५

लग्न पहावे करुन - मराठी कथा | Lagna Pahave Karun - Marathi Katha

अमेय शुद्धीत आल्याचा फोन येताच सकाळी सगळेजण दवाखान्यात पोहोचले. पण डोक्याला मार बसल्यामुळे अमेयला स्मृतिभ्रंश झालेला कळल्यावर सर्वांच्याच चेहऱ्यावर चिंता पसरली. सर्वजण अमेयशी बोलायचा, त्याला काही आठवतंय का हे जाणुन घ्यायचा प्रयत्न करू लागले. गोंधळ वाढल्यावर अमेयला त्रास होत असल्याचे निदर्शनास येताच डॉक्टरांनी सर्वांना बाहेर जाण्यास सांगुन अमेयला विश्रांती घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. आठवडाभर हॉस्पिटलमध्ये काढल्यावर अमेयला काही आठवत जरी नसले तरी बाकी त्याची प्रकृती व्यवस्थित असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला. अमेयला पाहण्यासाठी नातेवाईक येऊन जात होते. त्याची स्मृती गेल्याचे कळताच हळहळत होते. आरती आपल्या वडीलांसमवेत अमेयला पाहायला आलेली पाहताच अलकाबाईंच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्या तिला रागाच्या भरात वाट्टेल ते बोलल्या. त्यांचा राग ओसरल्यावर आरतीने रडत रडत आपले एका नरेश नावाच्या मुलावर प्रेम असल्याची कबुली दिली पण तो परजातीतील असल्यामुळे तिच्या वडीलांचा लग्नाला विरोध होता. वडीलांच्या दबावापुढे झुकून आपण या लग्नाला तयार झाल्याचेही कबुल केले. अमेयचे काही वाईट व्हावे अशी आपली इच्छा नव्हती आणि नरेश या थराला जाईल असे स्वप्नातही वाटले नसल्याचे सांगत तिने सर्वांची माफी मागितली. आपली चुक उमजताच आरतीच्या वडीलांनी तिची आणि गोडबोले कुटुंबाची माफी मागत तिथुन निघणे उचित समजले. तेव्हा आरतीला नरेशशी बोलून त्याने जे काही केले आहे ते उठवून अमेयच्या जीवाला यापुढे काही धोका होणार नाही असे तिने आश्वासन दिल्यावरच अलकाबाईंनी त्या दोघांना जाऊ दिले.

नेहा रोज सकाळ-संध्याकाळ अमेयला भेटायला येत होती. त्याचे खाणे-पिणे, त्याला काय हवे नको ते जातीने बघत होती. त्याला सर्व आठवावे म्हणुन ती सर्वांबरोबर जीव तोडून प्रयत्न करत होती. त्या सिद्ध पुरुषांकडून आणलेला अंगारा रोज अमेयच्या कपाळाला लावायची. त्यांनी सुरक्षेसाठी दिलेला ताईतही तिने अमेयच्या गळ्यात बांधला होता. अलकाबाई आणि सुहासराव कौतुकाने तिचे अमेय बरा व्हावा यासाठी चाललेले प्रयत्न पाहात होते. नेहाच्या आणि त्यांच्या अथक प्रयत्नाना शेवटी यश आलेच. अमेयची गेलेली स्मृती हळूहळू परत आली. अलकाबाईंनी मायेने नेहाला पोटाशी धरले. दोघींचे डोळे आनंदाश्रुंनी भरले होते. तिच्या नजरेतील अमेय विषयीचे प्रेम एव्हाना सर्वांनाच जाणवले होते. अमेयवरील संकटाने दोन्ही कुटुंबाना नकळत जवळ आणले होते. अलकाबाईंनी तिला जेव्हा “माझ्या अमेयला असेच आयुष्यभर सांभाळशील का?” असे विचारले तेव्हा उत्तरादाखल ती फक्त गोड लाजली. “काय अमेय, आमची मुलगी पसंत आहे ना?” असे नेहाच्या वडीलांनी अमेयला विचारताच अमेयही गालातल्या गालात हसला. ते पाहुन नेहा आणि अमेयच्या घरचे सारेच जण त्या आनंदात सहभागी झाले.

आरतीच्या वडीलांनी तिच्या लग्नाला संमत्ती दिल्यावर ती नरेशसह लग्नाची पत्रिका घेऊन आली. नरेशने आपल्या कृत्यबद्दल अमेयची आणि गोडबोले परिवाराची माफी मागितल्यावर सर्वांनी त्याला मोठ्या मनाने माफ केले आणि त्या दोघांचे तोंड गोड केले. अशा रीतीने अमेयला एवढ्या सगळ्या अग्नीदिव्यांना पार केल्यावर नेहाच्या रुपात सुयोग्य पत्नी मिळाली. म्हणतात ना शेवट गोड तर सर्वच गोड. नांदा सौख्यभरे।