लग्न पहावे करुन

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३१ ऑक्टोबर २०१५

लग्न पहावे करुन - मराठी कथा | Lagna Pahave Karun - Marathi Katha

फोनवरील धमकी ऐकुन अलकाबाई मटकन खालीच बसल्या. अमेय नुकताच तापातुन उठलेला, सुहासरावांची तब्येत ही अशी आणि त्यावर आलेली ही धमकी ऐकुन अलकाबाईंच्या पायातील त्राणच निघुन गेले. अलकाबाईंना आता अमेयची खुप काळजी वाटु लागली. त्या अमेयला सारखा फोन लावत होत्या पण तो उचलत नसल्याने त्या आणखीनच बेचैन झाल्या. इकडे अमेय बाईक वरुन शनिवार वाड्याजवळ पोहोचला आणि रास्तापेठेतुन चौकात येत असलेल्या एका टेम्पो चालकाला अचानक रस्त्यात एक काळी आकृती उभी राहिलेली दिसली. तिचा भयानक चेहरा पाहुन त्याने करकचुन ब्रेक लावला पण त्यामुळे टेम्पो स्लिप झाला आणि चौकात सिग्नलला थांबलेल्या अमेयच्या बाईकला त्याने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की अमेय हवेत चेंडुसारखा उडाला आणि जवळ पास दहा पंधरा फुट दूर जाऊन पडला. इतरही चार पाच बाईक्स, एक रिक्शा आणि एक कार त्या टेम्पोच्या धक्याने अपघातग्रस्त झाल्या. अमेय रस्त्यात बेशुद्ध पडला होता. त्याच्या डोक्याला मार बसला होता, जागो जागी खरचटले होते. अमेयच्या सुदैवाने त्याची ऑफिस मधील एक सहकर्मी ‘नेहा’ त्याचवेळी तिथुन जात होती. तिने तो एक्सीडेंट पाहिला आणि अमेय रस्त्यावर पडलेला दिसताच ती पटकन तिथे आली. अजिबात वेळ न दवडता तिने ट्रॅफिक हवालदार व इतर पादचाऱ्यांच्या मदतीने अमेयला रिक्षात घालुन ससुनला नेले. अमेयला एडमिट केल्यावर तिने अमेयच्या फोनवरून त्याच्या घरी फोन करून ही धक्कादायक बातमी दिली.

नेहा कडुन अमेयच्या अपघाताची बातमी कळताच गोडबोले कुटुंबावर दु:खाचे आभाळच कोसळले. अलकाबाईंना वाटणारी भीती खरी ठरली होती. नेहा कडुन फोनवर सगळा वृत्तांत कळताच अलकाबाईंना रडुच कोसळले. लगबगीने त्या सुहासरावांबरोबर ससुन हॉस्पिटलला पोहोचल्या. नेहाने त्यांना अमेयला ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्याचे सांगितले. तिने तिच्या वडीलांना फोन करून आधीच कळवल्यामुळे तेही तिच्या आई सोबत ससुनला पोहोचले होते. त्यांनी आपल्या ओळखीच्या जोरावर अमेयच्या उपचारांवर डॉक्टर विशेष लक्ष्य देतील याची तजवीज केली होती. नेहाच्या कुटुंबियांनी खुप धीर दिल्यामुळे अलकाबाई आणि सुहासरावांना नेहाचा आणि तिच्या कुटुंबाचा खुप आधार वाटला. दोन तासांनी अमेयचे ऑपरेशन पुर्ण झाले पण तो अजुन शुद्धीवर न आल्यामुळे डॉक्टरांनी त्याला भेटण्यास सर्वांना मनाई केली. नेहाच्या वडीलांनी आपण हॉस्पिटल मध्ये थांबत असुन सर्वांना घरी जाण्यास सांगितले. अलकाबाई ऐकायला तयार नव्हत्या पण त्यांनी त्यांची समजूत घातली की अमेय आता धोक्याच्या बाहेर आहे आणि तसेही तो शुद्धीवर आल्याशिवाय त्याला भेटता येणार नव्हते त्यामुळे सगळ्यांनी तिथे थांबायची काहीच गरज नव्हती. ते स्वतः तिथे थांबले तर काही प्रॉब्लेम झाल्यास तो दूर करण्यास तेच जास्त सक्षम आहेत. शेवटी नेहा आणि तिची आई त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी सोबतीला येतो म्हणाल्यावर त्या तयार झाल्या. तसेच नेहाच्या वडीलांना काही वाटल्यास लगेच फोन करायला सांगुन त्या घराकडे निघाल्या.

घरी पोहोचल्यावर नेहाने पटकन चौघांचा स्वयंपाक बनवला व अमेयच्या आई वडीलांना व स्वतःच्या आईला जेवायला वाढले. कसे बसे दोन घास पोटात टाकुन अलकाबाई व सुहासराव पानावरून उठले. जेवणानंतर लगेचच त्यांनी नेहाच्या वडीलांना फोन करून सर्व काही ठीक असल्याची खात्री करून घेतली. अलकाबाईंनी नेहाला तिच्या वडीलांसाठी जेवणाचा डबा घेऊन पाठवले. परत आल्यावर तिने अमेय ठीक असुन काळजीचे कारण नाही असे सांगितले तेव्हा कुठे अलकाबाईंच्या जीवात जीव आला. नेहाने सांगितले की अमेय कडुन त्याच्याबाबतीत घडत असलेल्या विचित्र घटनांबद्दल तिला सगळी माहिती अमेय कडुन मिळाली होती. तिच्या वडीलांना तिने याबद्दल सर्व सांगितले होते आणि त्यांनीही त्यांच्या माहितीतील एका सिद्ध पुरुषांच्या कानावर हा विषय घातला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार कोणीतरी जाणुन बुजुन अमेयला त्रास देण्यासाठी त्याच्या मागे एक दुष्ट शक्ती लावली आहे आणि तीच या सगळ्याला कारणीभुत आहे. हे ऐकताच अलकाबाईंना संध्याकाळी आलेल्या फोनची आठवण झाली. अलकाबाईंच्या मनातील आरती बद्दलच्या मायेची जागा नकळत द्वेषाने घेतली. ‘नाही लग्न करायचे तर स्पष्ट सांगायचे माझ्या मुलाच्या जीवावर कशाला उठायचे?’ त्या रागाने फणकारत उद्गारल्या.