लग्न पहावे करुन

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३१ ऑक्टोबर २०१५

लग्न पहावे करुन - मराठी कथा | Lagna Pahave Karun - Marathi Katha

अमेयच्या पाठोपाठ कौस्तुभही दारातुन बाहेर गेला. कॉरिडोअर पार करून ती व्यक्ती लिफ्टच्या बंद दारातुनही आरपार गेलेली दिसली तसा अमेयही लिफ्ट कडे जाऊ लागला. लिफ्ट तळमजल्यावर होती पण दाराचे लॉक खराब झाल्याने ते कधीही उघडत असे. लिफ्ट सुरु असताना मधेच चुकुन कोणी दार उघडले की ती आहे तिथे बंद पडून लॉक व्हायची मग जो पर्यंत कोणी स्क्रु ड्रायव्हरने ते लॉक उघडत नाही तोपर्यंत आतील माणसे लिफ्टमधेच अडकुनच राहायची. लिफ्ट मधुन हाक मारली की कोणी ना कोणी येऊन लॉक उघडायचे. त्यामुळे बिल्डिंगच्या रहिवाश्यांनाही याची सवय झाल्याने ती दुरुस्त करण्याचीही कोणी तसदी घेतली नव्हती. अमेयने लिफ्टचे दार उघडले आणि तो आत पाऊल टाकणार इतक्यात कौस्तुभने त्याला मागे खेचले, नाहीतर अमेय पाच मजले खोल असलेल्या त्या लिफ्टच्या खड्यात पडला असता. कौस्तुभने मागे खेचल्यावर अमेय भानावर आला पण त्याला काहीच आठवेना की तो तिथे कसा आणि का आला. मग कौस्तुभ अमेयसह घरात परतला. कोणताही अनर्थ घडु नये म्हणुन त्याने आतुन कुलुप लावले. सकाळी लवकर उठलेल्या अलकाबाई दरवाजाला आतुन घातलेले कुलुप पाहुन आश्चर्यचकीत झाल्या. सकाळी कौस्तुभ कडुन सगळा वृत्तांत कळल्यावर सगळ्यांनाच अमेयची काळजी आणि कौस्तुभचे कौतुक वाटले. पण ही तर सुरवात होती.

अमेयने कंपनी बदलली. या कंपनीत मार्च एंडिंगमुळे अमेयला घरी परतायला रात्रीचे दोन तर कधी तीनही वाजायचे. असाच एकदा रात्री घरी परतत असताना बावधन क्रॉस केल्यावर अमेयच्या कारला डाव्या बाजुने जोराचा झटका बसला आणि काही कळायच्या आत कार उजव्या बाजुला आडवी घासत रस्ता पार करून मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन आदळली. सुदैवाने समोरून कोणतीही गाडी येत नव्हती नाहीतर मोठा अपघात झाला असता. सिटबेल्ट लावलेला असल्यामुळे अमेयला एक जोराचा झटका बसण्यापलीकडे काहीच झाले नाही. पण तो पुरता हादरला होता. कार मधुन उतरून त्याने पाहिले तर रस्त्यावर कारच्या टायरचे काळे आडवे पट्टे उमटले होते परंतु रस्त्यावर किंवा आजुबाजुला चिटपाखरूही नव्हते. आपल्याला भास झाला नाही याची त्याला खात्री होती पण तिथे कोणीच न दिसल्यामुळे तो चक्रावला होता. त्याला कारच्या डाव्या दरवाजावर हाताच्या आकाराचे दोन मोठे डेंट पडलेले दिसले. जणू काही कोणीतरी प्रचंड ताकदीने आपल्या हातांनी त्याच्या कारला ढकलले होते. विचारांच्या तंद्रीत तो कारमधे बसला तसे त्याला साइड विंडोवर मानव सदृश्य हातांचे ठसे दिसले पण बोटांचा आकार खुपच निमुळता आणि लांब होता. झाला प्रकार तर्काच्या पलीकडला होता. अमेय घरी पोहोचला तो अंगात ताप घेऊनच.

दोन दिवस तापात काढल्यावर झालेला प्रकार त्याने घरी सांगितला. ते सर्व ऐकुन सर्वच हवालदिल झाले. लागोपाठ अमेयवर काही ना काही संकटे येतच होती. आपल्याच मुलाच्या मागे हे सर्व का लागले आहे या चिंतेने सुहासरावांची तब्येत खालावली. लग्नाची तारीख दिड महीन्यानंतरची निघाल्यामुळे गोडबोले कुटुंबाची खुप धांदल उडाली होती. सुहासराव आजारी असल्यामुळे अमेयलाच सर्व आपल्या खांद्यावर घ्यावे लागले. पत्रिकांची ऑर्डर देण्यासाठी म्हणुन संध्याकाळी तो अप्पा बळवंत चौकात जाऊन येतो सांगुन बाहेर पडला. अलकाबाई आणि सुहासराव लग्नातील मानपानाबद्दल बोलत बसले होते आणि इतक्यात टेलिफोनची घंटी वाजली. फोनवर एक अनोळखी इसम होता, त्याने अलकाबाईंना धमकी दिली की, “आरती जोशी बरोबर तुमच्या अमेयच्या लग्नाच्या नाद सोडून द्या नाहीतर अमेयला कुठे गायब करुन टाकीन याचा पत्ता पण लागणार नाही. बऱ्या बोलाने हे लग्न मोडा नाहीतर याचे परिणाम गंभीर होतील. पत्रिका छापायला गेलाय ना तो? सुखरूप घरी कसा पोहोचतो तेच बघतो मी! आरतीचे माझ्यावर प्रेम आहे पण तिच्या बापामुळे ती नाइलाजाने या लग्नाला तयार झाली आहे. पण मी हे होऊ देणार नाही. आरती फक्त माझी आहे”. एवढे बोलून फोन कट झाला.