लग्न पहावे करुन

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३१ ऑक्टोबर २०१५

लग्न पहावे करुन - मराठी कथा | Lagna Pahave Karun - Marathi Katha

ते लग्न मोडले म्हणुन अमेयच्या आईने ज्योतिषाला त्याची पत्रिका दाखवली. त्याने हा दोष आहे, तो दोष आहे सांगत नाना उपाय सुचवले पण काही उपयोग नाही झाला. असे करता करता अनेक ज्योतिषी झाले. जो जे उपाय सांगेल ते उपाय अलकाबाई करत होत्या पण काही उपयोग नाही. नंतर कोणीतरी वास्तुच्या ब्रम्हस्थानी शौचालय असल्यामुळे सर्व अडचणी येत असल्याचे सांगितले तसे बाथरूम मधील कमोड काढुन फक्त बाथरूम ठेवले. नंतर मात्र एक दिवस एक आरती जोशी म्हणुन मिरजेचे स्थळ चालुन आले. मुलगी साताऱ्याच्या एका शाळेत शिक्षिका म्हणुन जॉब करत होती. तिथे तीने भाड्याने एक रूम घेतली होती आणि मैत्रिणी सोबत राहत होती. दिसायला गोरी, सुंदर, स्मार्ट, वागण्यास शालीन आणि संस्कारीही वाटत होती. चेहऱ्यावरील गोड स्माइल तिच्या सौंदर्यात भरच टाकत होते. पाहाताच क्षणी ती सर्वांनाच पसंत पडली आणि गोडबोले कुटुंबीयांनी आपली पसंती कळवली सुद्धा. मुलीकडुनही होकार आला. दोन्ही घरात आनंदी वातावरण होते. बोलणी झाली, इतकेच काय सुपारीही फुटली. आरती वरचेवर अमेयला भेटायला येऊ लागली. फोनवरून सतत सुहासरावांचीही ती विचारपुस करत असे. त्यांच्या उपचारासाठी त्यांना मिरजेला येण्यासाठीही तिने आणि तिच्या वडीलांनी खुप आग्रह करुन नेले. तिथल्या डॉक्टरांच्या उपचारांनी सुहासरावांच्या तब्येतीत बराच फरक पडला होता. तिची सगळ्यांसाठीची काळजी बघुन सर्वांनाच ती अमेयसाठी योग्य वाटली. सगळे खुश होते पण हाही आनंद फार काळ टिकला नाही. अमेयच्या बाबतीत एक एक वाईट घटना घडू लागल्या.

अमेय कारने ऑफिस वरुन येत असताना कुंभार वाड्याजवळ चश्मा वर सरकवण्यासाठी त्याने आपला उजवा हात वर केला इतक्यात एक दगड सरसरत आला आणि त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर आदळला. तो दगड इतक्या जोरात हाडावर बसला होता की हातावरचे मांस निघुन रक्त येऊ लागले होते. अमेय वेदनेने कळवळला, कशीबशी कार सावरत त्याने रस्त्याच्या कडेला उभी केली. बाहेर येऊन पाहीले पण त्याला कोणीच संशयास्पद आढळले नाही. बाजुने एखादा ट्रक किंवा बस सारखे अवजड वाहन पण जाताना दिसले नाही की ज्याच्या चाकाखालुन तो दगड उडुन आला असावा अशी शंका घ्यावी. एका हाताने कार चालवत अमेय कसा बसा घरी पोहोचला. नेमका योग्य वेळी हात वर केल्याने दगड हातावर बसला होता नाहीतर डोक्यावर किंवा डोळ्यावर बसला असता तर मोठा अनर्थ झाला असता. अमेय आई बरोबर KEM मधे जाऊन आला. X-RAY मधे जरी हाडाला चिर गेलेली दिसली नाही तरी डॉक्टरनी जखमेचे ड्रेसिंग करून काही दिवस क्रेप बँडेज वापरण्याचा सल्ला दिला कारण हात चांगलाच सुजला होता. जीवावरचे हातावर निभावले यात समाधान मानुन दोघे घरी परतले. अमेय जखमी झाल्याचे कळताच आरती तातडीने त्याला बघायला आली. त्याची विचारपुस करून काळजी घेण्यास सांगुन गेली. अधुन मधुन तिचे चौकशीसाठी फोनही येत असत.

या प्रसंगाला जेमतेम आठवडा झाला असेल, घरी मुंबईचे काका काकी व भावोजींसह आश्विनीही आल्यामुळे अमेय हॉल मध्ये आपल्या चुलत भाऊ कौस्तुभ सोबत झोपला होता. रात्री साधारण दोनच्या सुमारास कोणीतरी हाक मारल्यासारखे वाटल्याने अमेयला जाग आली. काळोखात डोळे ताणुन तो पाहु लागला की कोण हाक मारतय. एवढ्यात बिन बाह्यांची पांढरी बनियन आणि लेंगा घातलेली एक व्यक्ती हॉल मधुन किचन मध्ये जाताना त्याला दिसली. यंत्रवत तो त्या व्यक्तीच्या मागे जाऊ लागला. बेसिनपाशी जाऊन ती व्यक्ती बेडरूम कडे वळली आणि गायब झाली तसा अमेय शुद्धीत आला. आपण किचन मधे कसे आलो याचा विचार करत त्याने पाण्याचा ग्लास तोंडाला लावला. बाथरूमला जाऊन आल्यावर आता तो झोपायला म्हणुन हॉल मध्ये येणार तोच पुन्हा त्याला ती व्यक्ती मुख्य दरवाजा जवळ दिसली. अमेयने “कोण आहे?” असे विचारताच ती व्यक्ती त्या बंद दारातून आरपार बाहेर निघुन गेली. तो प्रकार पाहुन अमेयला घामच फुटला. पण आपली उत्सुकता शमवण्यासाठी तो दरवाजाच्या दिशेने जाऊ लागला. लॅचचा आवाज त्या शांततेत चांगलाच घुमला. आवाजाने झोप चाळवलेल्या कौस्तुभने हा एवढ्या रात्री बाहेर कुठे चालला असे म्हणत घड्याळात बघितले. अमेय, अमेय असे म्हणे पर्यंत अमेय दार उघडुन बाहेर गेला होता.