लग्न पहावे करुन

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३१ ऑक्टोबर २०१५

लग्न पहावे करुन - मराठी कथा | Lagna Pahave Karun - Marathi Katha

शेवटी अमेयची दहावी सुरु व्हायच्या काही महिने आधी सुहासरावांनी लोणावळ्याचा फ्लॅट भाड्याने देऊन पुण्याला शिफ्ट व्हायचे ठरवले. थोडी फार ओळख आणि पैसे दाबून त्यांनी अमेयची एका शाळेमध्ये आणि आश्विनीची एका कॉलेज मध्ये एडमिशन करून दिली. पुण्यामध्ये सोमवारपेठेत त्यांच्या धाकट्या भावाचा तीन बेडरूम्स हॉल आणि किचन असलेला १४०० sq feet चा मोठा फ्लॅट रिकामाच होता. तो मुंबईत मुलुंड मध्ये स्थायिक झाला होता त्यामुळे काही भाडे ठरवून त्याने सुहासरावांच्या पुण्यातील वास्तव्याची सोय आपल्या रिकाम्या फ्लॅट मधे करुन दिली. पुढील काही वर्ष ठिक गेली. सुहासरावांचा पुण्यातही चांगला जम बसला, सोबत लोणावळ्याला विकलेल्या पॉलिसीजच्या नुतनिकरणापासून मिळणारे कमीशन होतेच. ते लोणावळ्यात आणि पुण्यात दोन्ही शहरात ये जा करून आपला व्यवसाय वाढवू लागले. पण म्हणतात ना, दुर्दैव हे काही लोकांच्या पाचवीलाच पुजलेले असते. सगळे चांगले सुरु असताना अचानक सुहासरावांना अर्धांगवाताचा झटका आला आणि त्यांची डावी बाजु लुळी पडली. बोलणे हेच भांडवल असलेला त्यांचा व्यवसायही या झटक्या बरोबर लुळा पडला. नवीन पॉलिसीधारक बनणे बंद झाल्यामुळे कमाई घटली. भरीत भर म्हणून आश्विनीचे ग्रॅज्युएशनही काही पुरे होईना. तिच्या मार्च ऑक्टोबर अशा वाऱ्या सुरुच होत्या.

बारावी नंतर अमेयने MCA ला ऍडमिशन घेतली होती. आपले पाहिले प्रेम क्रिकेटला तिलांजली देऊन तो अभ्यासावर खुप मेहनत घेऊ लागला. अलकाबाईंनी हिंमत न हारता निव्वळ हौस म्हणुन शिकुन घेतलेले शिवणकाम व्यवसाय म्हणुन सुरु केले. रात्रंदिवस लोकांचे ब्लाऊज आणि ड्रेस शिऊन त्यांची पाठ दुखायची, पाय सुजायचे पण त्यांनी कधी तक्रार नाही केली. आपल्या परीने त्या घरखर्चाला हातभार लावतच होत्या. वाईटात चांगले म्हणुन आश्विनीचे शिक्षण अर्धवट असुनही एक दिवस अचानक जातीतीलच एका उच्चशिक्षित मुलासोबत तिचे लग्न जमले. गोडबोले कुटुंबियांसाठी हा एक सुखद धक्काच होता. आपल्याला जेवढे शक्य होईल तितका खर्च करून सुहासरावांनी आश्विनीचे लग्न व्यवस्थितपणे लावून दिले. एका मोठ्या जवाबदारीतून ते मोकळे झाले होते. पुढे अमेयने MCA चांगल्या मार्कानी पास होत एका MNC कंपनीत जॉब मिळवला आणि गोडबोले कुटुंबाची विस्कटलेली घडी हळू हळू पुन्हा बसु लागली.

अमेय आता पंचवीस वर्षाचा युवक झाला होता. चांगला कमवतही होता. अलकाबाईंना त्याच्या लग्नाचे वेध लागले आणि सुरु झाले अमेयसाठी वधुसंशोधन! अनेक मुली पाहिल्या त्यातुन एक मुलगी त्यांच्या आणि अमेयच्या पसंतीस उतरली. मुलीकडच्यांनाही अमेय पसंत पडला. दोघे संसाराची स्वप्न पाहु लागले. आता साखरपुड्याची बोलणी करणार इतक्यात मुलीकडुन नकार कळवला गेला. कारण काय तर मुलगा व्यसनी आहे आणि मुलाचे चारित्र्यही ठीक नाही अशी आम्हाला बातमी लागली आहे म्हणे. गोडबोले कुटुंबियांना यावर हसावे की रडावे तेच कळेना, कारण अमेय एक निर्व्यसनी मुलगा होता आणि मुळातच थोडा अंतर्मुख असल्यामुळे स्वत:हुन कोणत्या मुलीशी बोलायचाही नाही. मग चारित्र्य खराब असण्याचा तर प्रश्नच नव्हता. पुढे कोणातरी मार्फत कळले की अमेय ट्रेकिंगला त्याच्या काकांबरोबर जात असे आणि त्या मुलीला ती स्वत: ट्रेकिंगला गेली असता त्या ग्रुपमधील एका मुलाने अमेय बद्दल वाईट साईट सांगुन तिचे त्याच्याबद्दलचे मत खराब केले होते. त्या मुलावर विश्वास ठेऊन कोणतीही शहानिशा न करता त्या मुलीच्या घरच्यांनी नकार कळवला होता.