लग्न पहावे करुन

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३१ ऑक्टोबर २०१५

लग्न पहावे करुन - मराठी कथा | Lagna Pahave Karun - Marathi Katha

रात्री तिने आपल्या भावाला झाला प्रकार फोन करुन कळवला. तसा त्याने तिला उपाय सांगितला, “दोन दिवसांवर अमावस्या आहे तेव्हा अमावस्येच्या रात्री भाताच्या दोन मुदी घेऊन त्यावर दही आणि काळे उडीद घालून अमेयच्या डोक्यापासून पायापर्यंत असे सात वेळा फिरवून पत्रावळीत काढ. रात्री दोननंतर ती पत्रावळ एखाद्या तीठ्यावर ठेऊन त्यावर दोन मुठी गुलाल आणि एक काळी बाहुली ठेव आणि अमेयवरुन धारीवाले लिंबु एकवीस वेळा उतरवून त्या लिंबाचे तीन तुकडे करून तीन दिशांना फेक नंतर त्या अमानवीय शक्तीस तिला चढवलेला भोग घेऊन अमेयला सोडण्यास विनंती कर आणि कोणाशी न बोलता घरी परत येऊन दोघांनीही आंघोळ करा”. सुहासरावांचा या सगळ्या प्रकारावर विश्वास नसल्यामुळे अमेयच्या आईने त्यांच्याकडे काही न बोलता सगळे झोपल्यावर अमेयच्या मामाने सांगितल्याप्रमाणे सर्व तयारी केली व रात्री २ वाजल्यानंतर अमेयला घेऊन घराजवळील एका तीठ्यावर जायला निघाली. अमेयमध्ये आता बदल जाणवु लागला होता. तो तीठ्यावर जायला विरोध करू लागला पण त्याला जबरदस्तीने ओढत ती तीठ्यावर घेऊन आली. तिथल्या वातावरणातील तणाव तिला जाणवू लागला. तिथे पोहोचताच अमेय आणखीनच उग्र झाला. तिने भावाने सांगितल्याप्रमाणे पटकन गुलाल व काळी बाहुली त्या मुदी ठेवलेल्या पत्रावळीवर टाकली आणि अमेयवरून एकवीस वेळा लिंबु उतरवण्याचे दिव्य कार्य सुरु केले. चढवलेले भोग घेण्यासाठी तिथे जमलेल्या आत्म्यांचे अस्तित्व तिला जाणवत होते. तिला दरदरुन घाम सुटला होता. कसेबसे एकवीस वेळा लिंबु उतरवून तिने त्याचे तीन भाग केले आणि तीन दिशांना फेकले व भोग स्विकारुन आपल्या मुलाला सोडण्याची त्या अनामिक शक्तीला विनंती केली. त्या शक्तीने अमेयला सोडून आपल्यासाठीचा भोग भक्षण करण्यास सुरवात करताच अमेय शुद्धीवर आला. एवढ्या रात्री आई आणि तो दोघेच त्या सुनसान तीठ्यावर असल्याचे लक्षात येताच तो प्रचंड घाबरला. पत्रावळीतील भोग अधाशासारखे खाणाऱ्या त्या पिशाच्चाला पाहुन तर त्याची बोबडीच वळली. आईचा हात धरून तो तिला घराच्या दिशेने ओढु लागला.

अमेयची आई काही न बोलता अमेय सोबत घरी निघाली. सुदैवाने त्यांना वाटेत कोणी भेटले नाही पण बिल्डिंगचा राऊंड मारून गेटवर परत आलेल्या वॉचमनने त्या दोघांना गेटमधुन आत शिरताना हटकलेच. अमेय काही बोलणार इतक्यात त्याच्या आईने त्याच्या तोंडावर हात धरुन वॉचमनला न पाहिल्यासारखे करत बिल्डिंग मधे प्रवेश केला. घरात शिरून दार लावल्यावरच तिला हायसे वाटले. आश्विनी आणि सुहासराव गाढ झोपेत होते त्यामुळे वायफळ प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम टळल्याचा तिला आनंद झाला. अमेयला आंघोळीस जाण्यास सांगुन नंतर तिनेही आंघोळ केली आणि झोपी गेली. सकाळी अमेय बराच नॉर्मल वाटत होता, न खळखळ करता शाळेतही गेला त्यामुळे आपला मुलगा आता त्या दुष्टचक्रातुन बाहेर पडल्याची तिची खात्री पटली. तिने आपल्या भावाला सर्व वृत्तांत सविस्तर सांगितला तसा त्यालाही आनंद झाला. काही दिवस बरे गेले पण एका रात्री अमेयला परत काही तरी दिसले आणि तो प्रचंड घाबरला. त्याला चांगलाच ताप भरला होता. त्याच्या आईने दोन मुठीत समुद्री मीठ घेऊन ते अमेय वरून सात वेळा उतरवले आणि संडासात फ्लश केले तसा तो नॉर्मल झाला. हा प्रकार आता दर अमावस्या पौर्णिमेला घडू लागल्यावर मात्र तिने सुहासरावांच्या मागे तो फ्लॅट सोडून दुसरीकडे राहायला जायचा लकडा लावला.