लग्न पहावे करुन

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३१ ऑक्टोबर २०१५

लग्न पहावे करुन - मराठी कथा | Lagna Pahave Karun - Marathi Katha

अमेय नावाच्या एका तरुणाच्या आयुष्यात लग्न ठरताना कशी जीवघेणी संकटे आली आणि त्यातुन तो कसा सुखरूप बाहेर पडला याची भयचकित करणारी कहाणी.

गोडबोले दांपत्याला दोन मुलं होती. एक मुलगा आणि एक मुलगी असे छोटे चौकोनी कुटुंब. मोठी आश्विनी तर धाकटा अमेय. सुहासराव एक LIC Agent होते तर त्यांच्या पत्नी सौ. अलका या गृहिणी होत्या. लोणावळ्याला त्यांचा एक छोटा फ्लॅट होता. छान दिवस चालले होते. खाऊन पिऊन सुखी कुटुंब होते. सुहासराव स्वभावाने खुप हौशी होते तर सौ. अलका विनोदी स्वभावाच्या होत्या. किरकिर न करता येईल तो दिवस मजेत घालवावा एवढे साधे तत्व पाळुन दोघे नवरा बायको आपल्या मुलांना मोठ्या मायेने वाढवत होते. खिशाला परवडेल ती सगळी हौसमौज होत होती. मुलांमध्ये आश्विनी जितकी बडबडी आणि अवखळ होती अमेय तितकाच अबोल आणि शांत होता. आश्विनी अभ्यासात थोडी कच्ची होती पण अमेय मात्र खुप हुशार, कायम नंबरात येणारा. क्रिकेटचे त्याला भारी वेड होते. रोज न चुकता तो लोणावळा क्रिकेट असोसिएशनच्या ग्राउंडवर तो प्रॅक्टिस करायला जात असे. सर्व काही छान चालु होते पण म्हणतात ना की आपण विचार करतो एक नियतीच्या मनात काही भलतेच चालु असते.

काही दिवसांपासून अमेयला भास होऊ लागले होते. कोणीतरी सतत आपल्यावर नजर ठेऊन आहे असे त्याला वाटायचे. हळूहळू या भासांचे रुपांतर भितीत होऊ लागले. तो एकटे राहायला घाबरू लागला. झोपेतुन दचकुन उठायचा. एकटक शुन्यात नजर लावून पाहात बसायचा. पुढे पुढे तर शाळेत एकटे जाण्याच्या विचारानेच त्याच्या पोटात गोळा यायचा. त्याची शाळा बुडू लागली. अभ्यासावर याचा परिणाम झाला नसता तर नवलच म्हणायचे. सुहासराव सकाळी बाहेर पडायचे ते रात्री उशीरा घरी परतायचे त्यामुळे अमेयच्या आईलाच घरातील व घराबाहेरील सर्व कामे बघावी लागायची. शाळेतून अमेयच्या अनुपस्थिती बद्दल पत्र आल्यावर मात्र तिने सगळा विषय एका रात्री सुहासरावांच्या कानावर घातला. नववीतील मुलाचे असे घाबरणे जरा विचित्रच होते. त्यांनी या विषयावर अमेयशी रविवारी बोलायचे ठरवले आणि झोपेच्या अधीन झाले.

‘अमेय!’ सुहासरावांची हाक कानावर पडताच पाठमोरा बसलेला अमेय एकदम दचकलाच. भितीने त्याची छाती वेगात वर खाली होत होती. त्याची ती अवस्था पाहुन सुहासराव चिंतीत झाले. त्यांनी त्याला जवळ बसवुन प्रेमाने त्याची विचारपुस सुरु केली. इतके दिवस मनात सुरु असलेली घुसमट अमेयने वडीलांसमोर मोकळी करायला सुरवात केली. “त्या दिवशी दुपारी ग्राऊंड मध्ये क्रिकेट खेळताना एका मुलाने सिक्स मारल्यामुळे लांब गेलेला बॉल आणण्यास मी गेलो होतो. बराच वेळ शोधल्यावर मला तो बॉल एका पत्रावळीत पडलेला दिसला. त्या पत्रावळीत दही भाताच्या दोन मुदी होत्या आणि त्यावर काळे उडीद, गुलाल, सुया टोचलेली लिंब, काळी बाहुली असे बरेच काही टाकलेले होते. नेमका त्या भातात बॉल पडल्यामुळे पुरता बरबटला होता. बॉल साफ करण्यासाठी म्हणुन मी उचलला व त्या पत्रावळीला ओलांडुन कुठे कागद दिसतो का ते पाहू लागलो आणि अचानक एक काळी आकृती माझ्या अंगावर धाऊन आली. मी तोल जाऊन खाली पडलो आणि बेशुद्ध झालो. नंतर मित्रांनी तोंडावर पाणी मारल्यावर मी शुद्धीवर आलो. घरी आल्यापासून मला सतत ती आकृती दिसते, अंगावर धाउन येते, मला तिची खुप भीती वाटते. तुला सोबत घेऊन जाणार असे ती सारखे म्हणते. आधी फक्त घाबरवायची पण आता तर ती मला मारझोड करू लागली आहे”, असे म्हणुन अमेयने आपल्या पाठीवरील आणि मांडीवरील वळ दाखवले. ते पाहुन सुहासरावांच्या मनात कालवा कालव झाली. दाराआडून ऐकणारी अमेयची आई एकदम सुन्न झाली. सुहासरावांना हा काय प्रकार आहे ते समजेना. त्यांना वाटले की अमेय अभ्यास करायला नको म्हणुन काही बाही कारणं सांगतोय पण अमेयची आई कोकणातील असल्यामुळे काय प्रकार आहे ते लगेच समजली. कोणीतरी उतारा काढून ठेवला असावा आणि अमेयने नेमका त्याला स्पर्श करुन ओलांडल्यामुळे, काही तरी अमानवीय त्याच्या मागे लागले असावे. वेळीच काहीतरी उपाय केला पाहिजे हे तिने ताडले.