करणी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० जून २०१५

करणी - मराठी कथा | Karni - Marathi Katha - Page 5

कामानिमित्त गावाबाहेर गेलेला दादु गुरव गावात परत आला तेव्हा त्याला धाकले पाटील आजारी असुन, आता काही वाचत नाहीत असे गावकर्‍यांनी सांगितले. तेव्हा आल्या पावली दादु गुरव आबांना भेटायला वाड्यावर गेला. शुंन्यात नजर लावून बसलेल्याला आबांना पाहुन त्याला खुप वाईट वाटले. त्यांच्या जवळ जाऊन त्याने धाकल्या मालकांची विचारपूस केली तेव्हा आबांनी त्याला शंकरला होत असलेल्या त्रासाबद्दल सर्व काही सांगीतले, ते ऐकल्यावर तो चपापला. आपला संशय दूर करण्यासाठी त्याने आबांना विचारले की, ‘कधी पासून होतंय असं?’ ‘अमावास्येपासून!’ असे उत्तर ऐकल्यावर तो हादरलाच. आपली शंका खोटी ठरावी अशी देवाजवळ प्रार्थना करत त्याने आबांना विचारले की, ‘आबा, धाकल्या मालकांचे नाव शंकर पाटील तर नाही?’ आबा होय म्हणताच, तो स्वतःच्याच तोंडात मारून घेऊन लागला आणि स्वतःला शिव्या देवू लागला. आबांना कळेना तो असे का करतोय. त्यांनी त्याला विचारल्यावर तो त्यांना म्हणाला, ‘आबा, नदीच्या पुरात बुडणाऱ्या माझ्या पोराला वाचवायला तुम्ही तुमच्या जीवाचापण विचार नाही केलात आणि मी दळभद्री तुमच्या मुलाच्या जिवावर उठलो. मला माफ करा’ आणि तो ढसाढसा रडू लागला.

त्याची वाक्य कानात शिरताच आबा नखशिखांत हादरले, त्याला गदागदा हलवून ते गरजले. ‘काय केलयस तु माझ्या शंकरला?’ रडत रडत दादु गुरवाने सगळे काही आबांना सांगितले. शंकरच्या लहानपणापासून त्यांना धाकले मालक म्हणत आलो त्यामुळे त्यांच्या खर्‍या नावाचे मला विस्मरण झाले. अजाणतेपणी माझ्या हातून ते घडले, मला माफ करा. आबांच्या मस्तकात हंबीररावाबद्दल तिडीक गेली. त्यांनी दादुला आपल्या मुलाला वाचवण्यास सांगितले तेव्हा दादु गुरव म्हणाला, ‘केवळ हंबीररावच त्याला वाचवू शकतात. त्यांना मुठ उठवावी लागेल आणि तसे केले तरच शंकर वाचेल. वेळ फार थोडा आहे, उद्याच अमावास्या आहे. मुठ उठवली नाही तर उद्याच्या अमावास्येला शंकर मरेल’, असे सांगताच रामराव आपली बारा बोअर ची बंदुक लोड करून हंबीररावाच्या वाड्याकडे निघाले. त्याच्या वाड्याच्या दरवाजावर लाथ घालून आबा गरजले, ‘हंबीरराव बाहेर ये.’ आबांची गर्जना ऐकताच हंबीरराव आपल्या कुटुंबासोबत बाहेर आला. ‘माझ्या पोराने काय घोडं मारलं तुझं म्हणुन तू त्याच्या जीवावर उठलास?’ आबांचा रुद्रावतार पाहुन हंबीररावची बोबडीच वळली. आबांनी हंबीररावाच्या छातीवर बंदुकीची नळी टेकवताच तो त्‌... त्‌... प्‌... प्‌... करू लागला. यातले मला काहीच माहीत नाही असे तो बोलणार इतक्यात त्याची नजर दादु गुरवाकडे गेली आणि तो काय समजायचे ते समजला. आत्ताच्या आत्ता मुठ उठव नाही तर तुझ्या घरादारावरून गाढवाचा नांगर नाही फिरवला तर आबा पाटील म्हणुन नांव नाही सांगणार; असे आबांचे उद्गार ऐकताच आता आपली धडगत नाही हे जाणुन तो सर्वांसह आपल्या जुन्या पडक्या वाड्याच्या तळघरात आला. दादु गुरवाने त्याला मुठ उठवायचा विधी सांगीतला. हंबीररावाने दादुच्या सांगण्याप्रमाणे विधी करताच इकडे शंकरने डोळे उघडले. दादु गुरवाने मुठ उठल्याची खात्री देताच, आबा पाटील लगबगीने आपल्या वाड्यावर परतले. आबांनी आपल्या लाडक्या शंकरला पोटाशी धरताच त्यांच्या डोळ्यातुन आनंदाश्रु वाहु लागले.