करणी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० जून २०१५

करणी - मराठी कथा | Karni - Marathi Katha - Page 4

रोज सकाळी ५ वाजता उठून तालमीत जाणारा शंकर ८:३० वाजले तरी उठला नव्हता. आबा पाटील आपल्या शिरसत्याने ५:३० ला उठून दोन तासाची आपली नित्याची रपेट मारून परत आले व प्रातर्विधी उरकून त्यांनी योगा व प्राणायाम केला. सुशीलाबाई पण ५:३० ला उठून आपल्या नित्याच्या कामात गढुन गेल्या. रोज सकाळी ८ वाजता तालमीतून परत आल्यावर शंकर आणि आबा सोबतच न्याहारी घेत असत पण आज ८:३० वाजुन गेले तरी त्याचा काही पत्ता नाही म्हणुन त्यांनी सुशीलाबाईंना आवाज दिला. ‘शंकर आला नाही अजुन!’ यावर त्यांनी काही कल्पना नाही म्हणुन सांगितले आणि त्याच्या खोलीत आहे का ते पाहून येते म्हणाल्या. त्यांना थांबवत आबा म्हणाले, ‘राहु दे, मी स्वतःच जाऊन बघतो तोवर तुम्ही न्याहारी वाढायला घ्या.’ आणि ते शंकरच्या खोलीपाशी गेले. एकदम एक कुबट सडका वास त्यांच्या नाकात शिरला आणि अभावितपणे त्यांचा हात त्यांच्या नाकावर गेला. हा कसला वास म्हणुन त्यांनी शंकरच्या खोलीचे दार ढकलले तर पुर्वीच्याच वासाचा त्यांना एक प्रचंड भपकारा आला. आतील दृश्य पाहून त्यांचे काळीज गलबलले आणि ते मोठ्याने ओरडले, ‘शंकर’, त्यांचा भयचकित झालेला आवाज ऐकून सुशीलाबाई धावतच तेथे आल्या. समोरचे दृश्य पाहून त्यांना भोवळच आली.

शंकर जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात वेडावाकडा पडला होता. त्यांच्या मागुन धावत आलेल्या सगुणा आणि शेवंताने (साखरामची पत्नी) त्यांना सावरले. शंकरची अवस्था पाहुन त्याही मनातुन चरकल्या. इतर गडी माणसांच्या मदतीने आबांनी शंकरला उचलून पलंगावर ठेवले आणि तुकारामाला लगेच डॉक्टरला घेऊन येण्यास सांगितले. शंकरच्या बाजुला बसून ते त्याला हाका मारू लागले पण शंकर कडून प्रतिसाद मिळत नव्हता, तो पूर्णपणे बेशुद्धीत होता. आपल्या लाडक्या मुलाची ही अवस्था पाहुन एरव्ही काही झाले तरी पाषाणासारखे मजबूत राहणारे रामराव कोलमडून पडले होते. डॉक्टरांनी शंकरला तपासले पण त्यांना काहीच निदान झाले नाही. मुळव्याध असावा असा निष्कर्ष त्यांनी काढला आणि काही गोळ्या व मलम देवून शंकरसाठी पथ्यपाणी सांगितले. ‘काही वाटलेच तर फोन करा आणि दोन दिवसांनी येऊन मला दाखवा’, असे सांगुन ते निघुन गेले. आज आठवडा झाला पण शंकरच्या परिस्थितीत काहीच सुधारणा झाली नव्हती रोज त्याला रक्त पडत होते, दिवसेंदिवस तो कृश होत चालला होता. हळूहळू साऱ्या गावात शंकरच्या आजारपणाची बातमी पसरली. लोक त्याला पाहायला येत, सोबत अंगारा धुपारा आणत. शंकरची अवस्था पाहुन हळहळत आणि आबांना निरनिराळे उपाय सुचवत. जो जे सांगेल ते ते आबा करत होते, पाण्यासारखा पैसा खर्च करत होते पण शंकरची परिस्थिती सुधारायचे काही नाव घेईना. आज तीन आठवडे झाले होते, शंकर म्हणजे फक्त हाडांचा एक सापळा बनुन उरला होता. त्याच्या घशातून सतत घरघर आवाज येत राहायचा. श्वासाबरोबर त्याची अस्थि-पंजर छाती वरखाली व्हायची तेवढीच काय ती त्याच्या जिवंत असल्याही ग्वाही देत होती. शंकरचे पोट अक्षरशः पाठीला टेकले होते, पोटात अन्नच टिकत नव्हते. डॉक्टरांनी देखील आता हात वर केले. आता सर्व देवाच्या हातात आहे असे सांगीतल्यावर मात्र आबांचा धीर खचला. आबांची अवस्था पाहुन हंबीररावांना मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.