MarathiMati.com - Android App on Google Play Store

करणी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० जून २०१५

करणी - मराठी कथा | Karni - Marathi Katha - Page 3

हंबीर रावांना त्यांचा डोळ्यासमोर शंकरच्या शवावर धाय मोकलून रडत असलेले आबा पाटील आणि माई दिसल्या आणि एक असुरी चमक त्यांच्या डोळ्यात निर्माण झाली. बरोबर १२ वाजता त्यांनी शंकर पाटील असे म्हणुन मुठ मारली त्याबरोबर त्या मृत कोंबड्याच्या चोचीतून एक आर्त किंकाळी बाहेर पडली आणि त्याच्या रक्ताचे शिंतोडे सर्वत्र उडाले. काम पूर्ण झाले होते आणि एक सैतानी समाधान हंबीररावांच्या चेहऱ्यावर पसरले. शंकर मेला की आबा पाटील जिवंत असुन नसल्यासारखे होतील मग सर्व लोक केवळ आपल्यालाच मान देतील, इतके साधे गणित त्यांनी मांडले होते. दादु गुरवाच्या हातावर ५०,००० रुपये ठेवुन याबद्दल कुठे वाच्यता केल्यास त्याच्या पुर्ण कुटुंबास ठार मारण्याची धमकी देण्यास ते विसरले नाहीत. पुढची आवराआवर करेपर्यंत रात्रीचे १२:३० वाजले होते.

आपले काम आटपून हंबीरराव आणि सखाराम कोणाला संशय येणार नाही याची काळजी घेत अमावास्येच्या दाट काळोखात निद्राधीन गावात गुपचुप दाखल झाले आणि हळूच आपल्या वाड्याकडे मार्गस्थ झाले. लवकरच आबा पाटलाच्या वाड्यात सनई ऐवजी ‘राम नाम सत्य है’ चे स्वर घुमतील असा विचार मनात येताच हंबीररावांच्या ओठावर एक सैतानी हसु पसरले. "आबा पाटील, तुझ्या नाशाला आता फक्त तीस दिवस बाकी राहिलेत. आपल्या पोराच्या प्रेताला खांदा द्यायला तयार हो!", असे पुटपुटत ते आपल्या वाड्याच्या पायऱ्या चढु लागले.

इकडे आबा पाटलांच्या वाड्यावर दिवसभराच्या कामाने थकल्यामुळे शंकर आपल्या पलंगावर गाढ झोपला होता. अचानक वेदनेने त्याचा चेहरा पिळवटला; जणु काही कोणी त्याच्या छातीत एक जोरदार ठोसा मारला होता. कळ जिरेपर्यंत थोडा वेळ गेला. तो थोडा सावरतो न सावरतो तोच त्याच्या पोटात मुरडा उठल्यासारख्या पण जीवघेण्या वेदना झाल्या, त्यामुळे तो शौचालयात गेला. शौचाला न होता गरम रक्ताच्या चिळकांड्या मागील भिंतीवर उडाल्या. काही गरम आणि चिकट जाणवल्यामुळे त्याने वळून पहिले, तर मागे रक्ताचे थारोळे पसरले होते. ते पाहून त्याला भोवळच आली. थोड्या वेळाने तो सावरला व स्वतःला साफ करून उभा राहायचा प्रयत्न करू लागला पण त्यांच्या पायातील बळच गेले होते, उभे राहाणे पण त्याला शक्य होत नव्हते. कसे बसे रांगत खुरडत तो आपल्या पलंगापाशी आला व त्यावर आडवा झाला. आपल्याला अचानक असे काय झाले याचा विचार करता करता बर्‍याच उशिरा त्याला झोप लागली.

MarathiMati.com - Android App on Google Play Store