करणी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० जून २०१५

करणी - मराठी कथा | Karni - Marathi Katha - Page 2

सर्व काही छान चालले होते पण चांगल्या बरोबर वाईट, सुष्टा बरोबर दुष्ट या चालीवर त्या देवमाणसावर जळणारे, त्यांना सतत पाण्यात पाहाणारे आणि त्यांच्या अपरोक्ष त्यांच्या विरोधात कट कारस्थाने रचणारे हंबीरराव पाटील हे आबा पाटलांच्या अगदी विरुद्ध स्वभावाचे होते. वरकरणी ते आबांचे हितचिंतक असल्याचे दाखवत पण मनातून केवळ त्यांचे अहित चिंतत. आबांना गावात मिळणारा मान पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जायची पण त्यासाठी आबांनी किती कष्ट घेतले, लोकोपयोगी किती कामे केली या गोष्टी त्यांच्या खिजगणतीतही नव्हत्या. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही हे त्यांच्यासारख्या स्वार्थी आणि दुष्ट माणसाच्या लक्षात येण्याएवढी त्यांच्या बुद्धीची कुवत नव्हती. त्यांना फक्त आबांचे यश दिसत होते. या मत्सारातूनच त्यांच्या मनात एक अत्यंत खालच्या पातळीची भयंकर योजना आकार घेऊ लागली होती. एक महिन्यापासून तयारी सुरु असलेल्या योजनेला प्रत्यक्षात उतरवण्याचा दिवस आज आला होता.

ती अमावस्येची रात्र होती. गोपनीयतेच्या दृष्टीने, त्यांनी त्यांच्या पूर्वजांनी आपल्या रंगेल स्वभावाचे शौक पुरवण्यासाठी गावाबाहेर बांधलेल्या एका पडक्या वाडयाच्या तळघराला आपल्या कामासाठी निवडले. आपला विश्वासू नोकर सखारामला सोबत घेऊन रात्री ११ वाजता ते वाड्यापाशी पोहोचले. लागणारे सर्व साहित्य सोबत घेऊन दादू गुरव त्यांची वाट पाहात बसला होता. त्याला विधीसाठी शंकरच्या सहा वस्तु हव्या होत्या. सखारामच्या पत्नीवर, शेवंतावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यासाठी तिने आबांच्या वाड्यात घरकाम करणाऱ्या सगुणाला आपलेसे करून आबांच्या वाड्यात काम मिळवले होते. हळूहळू शंकरचा विश्वास जिंकून त्याची सर्व कामे तिने आपल्याकडे घेतली. आता तिला शंकरच्या व्यक्तिगत वस्तु मिळवणे सहज शक्य होते. शंकरचा हातरुमाल, त्याची कापलेली नखे, जुने पायमोजे, त्याची अत्तराची बाटली आणि दाढीचे वापरलेले ब्लेड तिने मिळवले आणि आपल्या नवर्‍याकडे सुपूर्द केले. आता एकच वस्तु मिळवायची राहिली होती ती म्हणजे शंकरचे केस. शंकरच्या न्हाव्याला बोलण्यात गुंतवून सखारामने शंकरच्या कटिंग नंतर मोठ्या युक्तीने त्याचे केस लंपास केले होते.

दादु गुरवाने, कुंकवाने जमीनीवर एक वर्तुळ काढले आणि त्यात दोन विरुद्धमुखी त्रिकोण काढले. तयार झालेल्या सहा त्रिकोणात पिंडाला तयार करतात तसले तांदळाच्या पीठाचे सहा गोळे ठेवले. मग त्या गोळ्यांवर त्याने शंकरच्या सहा वस्तु ठेवल्या व त्या सर्व वस्तुंवर सहा धारीवाली लिंब ठेवली. त्यावर काळी हळद, कुंकु व काळे उडीद वाहीले. सोबत आणलेल्या उलटया पिसाच्या कोंबड्याची मान धारधार सुरीने चिरून त्याचे रक्त मंत्र म्हणत त्या सर्व वस्तूंवर शिंपडले. तो मेलेला कोंबडा त्याने वर्तुळाच्या मधोमध ठेवला. नंतर हंबीररावांना त्याने दक्षिणेकडे तोंड करून वर्तुळाजवळ बसावयास सांगितले. त्याने हंबीररावास सावध केले की एकदा का मुठ मारली की ती उठवता येणार नाही आणि जर का उठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे स्वत:चेच नुकसान होऊ शकते. तेव्हा अजून एकदा विचार करा आणि मगच मुठ मारा. पण आबांना धडा शिकवण्याच्या अघोरी इच्छेने हंबीररावांच्या बुद्धीवर पडदा पडला होता. योग्य अयोग्य यात फरक करण्याची ताकद ते गमावुन बसले होते; त्यांना दिसत होता फक्त बदला. तेव्हा त्यांनी गुरवाचा सल्ला धुडकावून लावला आणि आपले काम पुर्ण करण्यास सांगीतले. गुरवाने त्यांना मुठीमध्ये धारीवाले एक लिंबु घेऊन ज्याच्यावर करणी करायची आहे त्याचे नांव घेऊन त्या कोंबड्याच्या कलेवरावर (मृतदेहावर) मुठ मारण्यास सांगीतले म्हणजे पुढच्या अमावास्येला तो तडफडून मरेल.